Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनागेवराईच्या कोविड रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा

गेवराईच्या कोविड रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा


स्थानिक आरोग्य विभागाची धावपळ; डॉक्टर, तहसीलदारांकडून ऑक्सिजन मिळवण्यासाठी
धडपड, दुपारी एकनंतर रुग्णांचा ऑक्सिजन काही काळासाठी केला कमी

गेवराई (रिपोर्टर):- गेवराई येथील कोविड रुग्णालयामध्ये रात्रीपासून ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याने आज दुपारी अचानक ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने स्थानिक आरोग्य विभागाची धावपळ उडाली. डॉक्टर, तहसीलदार ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपड करू लागले. काही काळासाठी रुग्णांचे ऑक्सिजन कमी करण्यात आले. जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊनही ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याने स्थानिकांनी थेट आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना वस्तूस्थितीची माहिती दिली. तेव्हा जिल्हा प्रशासन गेवराईला ऑक्सिजन पुरवण्याबाबत हालचाल करू लागलं. दुपारी दोन वाजेपर्यंत गेवराईला ऑक्सिजन पोहचलेलं नव्हतं. जिल्हा आरोग्य विभाग गेवराईच्या कोविड सेंटरकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या प्रकरणी स्थानिक रुग्ण सेवा समिती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आज या गंभीर प्रश्‍नाप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार आहेत.
गेवराई येथील कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत असून ऐंशीपेक्षा अधिक रुग्णांना ऑक्सिजन लागत आहे. रात्री दिवसभराच्या ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येते. रात्रीपासून गेवराईचे आरोग्य विभाग तहसीलदार, डॉक्टर ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपड करत होते मात्र दुपारी एक वाजेपर्यंत त्यांना ऑक्सिजन मिळाले नाही. ज्या ऑक्सिजन प्लान्टवरून ऑक्सिजन येणार होते तेथून ते आले नसल्याने रात्रभर तहसीलदार खाडे, रुग्णालय अधीक्षक चिंचोले हे दवाखान्यातच होते. आज दुपारी एक वाजता तर अशी परिस्थिती निर्माण झाली की अवघे १५ ते २० मिनिटे ऑक्सिजन पुरेल एवढेच ऑक्सिजन रुग्णालयात उपलब्ध राहिले. त्यावेळी मात्र गेवराई प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली. इकडे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक गेवराईकरांच्या मागणीला दाद देत नव्हते. शेवटी काहींनी थेट आयुक्त केंद्रेकरांना फोन केला. केंद्रेकरांनी जिल्हा प्रशासनाला झापल्यानंतर बीडचे प्रशासन हरकतमध्ये आले. तोपर्यंत गेवराईच्या रुग्णालयातील उपचार घेणार्‍या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा कमी करण्यात आला होता. गेवराई रुग्णालयाला सावत्रपणाची वागणूक जिल्हा प्रशासनाकडून होत असून रुग्णालयास दोन्ही प्लान्टवरून ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी येथील डॉ. चिंचोले यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे तर या प्रकरणी स्थानिक रुग्ण सेवा समिती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार आहेत. गेवराईच्या रुग्णालयाकडे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देऊन येथील आरोग्य सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!