Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeसंपादकीयघटक पक्षांना संधी!!

घटक पक्षांना संधी!!


भाजपाची लाट ओसरु लागली. लोकांना जास्त दिवस मुर्खात काढता येत नसतं. जात,धर्माच्या नावाने निवडणुका लढवण्याचे दिवस संपले. जाती,धर्माच्या नावाने खुप राजकारण झालं. लोकांना त्याचा विट आला. कुठल्या ही गोष्टीला काही मर्यादा असतात. हिंदुत्वाचा किती ही नारा दिला तरी हिंदुत्वाने जर पोटाला भाकरच मिळत नसेल, रोजगार जात असेल, उपचाराविना तडफडून मरावे लागत असेल तर हे हिंदुत्व काय कामाचे याचा विचार आता लोक करु लागले. हिंदुत्वाच्या नावाने भाजपाने आपली दुकानदारी सुरु केली होती. दोन निवडणुका भाजपाने सहज जिंकल्या, दोन्ही लोकसभा निवडणुकीत लोकांनी भरभरुन साथ दिली. ज्या लोकांनी भाजपाला दोन वेळा मतदान केलं. तेच लोक आज भाजपाच्या नावाने बोटे मोडू लागले. उत्तरप्रदेशमध्ये स्थानिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपाला फटका बसला. योगी यांनी पदावर बसण्यापुर्वी आणि पदावर बसल्यानंतर खुप काही मोठ-मोठया घोषणा केल्या. त्यांच्या घोषणा हवेत विरल्या. उलट जनतेचं आणि राज्याचं हित जोपासण्यापेक्षा त्यांनी जाती,धर्माचं राजकारण केलं. दोन समाजात नेहमी तेढ निर्माण होत राहिल आणि समाज कायम विभाजीत होत राहिल याचाच जाणीवपुर्वक प्रयत्न केला. समाजाला विभाजीत करण्यापेक्षा त्यांनी आपल्या राज्यात चार वर्षात चांगला विकास केला असता तर आज राज्यातील लोकांना उपचाराविना मरण्याची वेळ आली नसती. तेथील स्थानिक निवडणुकीत लोकांना खोकला आणि सर्दीचे औषधे वाटण्याची वेळ पुढार्‍यावर आली. कोरोनाच्या तपासणीविना कित्येक लोक मरण पावले. काही जिल्हयात पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंत दवाखाने आहेत. इतकं दुर उपचारासाठी जाणं लोकांना शक्य आहे का? जवळ साधं सरकारी रुग्णालय नसावं का?, अशी वाईट अवस्था त्या राज्यात आहे. तेच योगी निवडणुकीत महाराष्ट्रात येवून येथील सत्ताधार्‍यांना शहाणपणाचे डोस पाजत होते. उत्तरप्रदेश सारखी अवस्था भाजपाच्या ताब्यात असलेल्या सर्वच राज्यात झालेली आहे. हाच का भाजपाचा विकास?

prakhar logo


कॉंग्रेस कमी पडली

कोणत्याही निवडणुका लढवण्यासाठी त्याला आधी तयारी करावी लागते, मेहनत घ्यावी लागते, रात्र-दिवस लोकांच्या संपर्कात राहावे लागते, तेव्हा कुठं निवडणुकीचे मैदान गाजवता येते, २०१४ पासून कॉंग्रेसमध्ये मरगळ आली, या पक्षाला अजुन काही सुर सापडेना, प्रत्येक निवडणुका हा पक्ष हारत आहे. निवडणुकी पुरते दौरे केल्याने लोक जवळ येत नसतात, त्याला स्थानिक पुढार्‍यांचे तितके योगदान असायला हवे. राहूल गांधी,प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्यामुळे पक्ष संघटनेत वाढ होवू शकत नाही. त्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला जिवंत ठेवण्याचे काम केले पाहिजे. कार्यकर्त्याचे काम नाही म्हणुन पक्ष गाळात रुतत आहे. कॉंग्रेसचा ढीम्मपणा भाजपाच्या फायद्याचा ठरु लागला. कॉंग्रेसची अशीच कासव गती राहिली तर भाजपाची पुढची विजयाची नांदीच म्हणायची का? राहुल गांधी ट्विटकरण्या व्यक्तीरिक्त जास्त काही करत नाहीत. पक्षात समन्वय राहिला नाही. ज्येष्ठ मंडळी नाराज आहेत. त्यांची नाराजी अनेक वेळा समोर आलेली आहे. कॉंग्रेसशी तरुण कार्यकर्ते तितके आकर्षीत होतांना दिसत नाहीत, त्यामुळे कॉंग्रेसला प्रत्येक निवडणुकीत हार पत्कारावी लागते. देशात आज तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. तरुण वर्ग ज्या पक्षाच्या पाठीशी उभा राहिल तो पक्ष सत्तेत येतो, हे भाजपाच्या दोन्ही निवडणुकीत दिसून आलं. दोन्ही निवडणुकीत भाजपाने तरुणांना साद घातली आणि तरुणांनी भरभरुन भाजपाला साथ दिली. तरुणांनी भाजपाला साथ दिली असली तरी तरुणांच्या हातात कटोरा घेण्याची वेळ आली. तरुणांना भाजपाने निराश केलं. त्यामुळे सोशल मीडीयावर भाजपाला डिसलाईक मिळतात याचं कारण तरुणांचा संताप भाजपाच्या विरोधात वाढू लागला. कॉंग्रेसला संधी आहे पण कॉंग्रेस कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेसचं संघटन कमी पडू लागलं. आपलं संघटन वाढवणं हेच कॉंग्रेस समोरचं मोठ आव्हान आहे.
घटक पक्षाचं वजन
देशात पुर्वी पासूनच घटक पक्षाचं अस्तित्व आहे. एखाद्या प्रमुख पक्षातून बाहेर पडून देशातील अनेक नेत्यांनी आपला नवीन पक्ष काढून प्रमुख पक्षाला आव्हान दिलेलं आहे. कॉंग्रेस पक्ष स्वातंत्र्यपुर्वी पासूनचा आहे. मात्र या पक्षातून फुटून अनेकांनी दुसरा मार्ग पकडलेला आहे. भाषा निहाय राज्यात त्या-त्या राज्याच्या नुसार राजकारण होतं. दाक्षिण विभागात स्थानिक राजकारणाचा प्रभाव दिसून येतो. तेथे राष्ट्रीय पक्षाची दाळ शिजत नाही. नव्वद पर्यंत कॉंग्रेस पक्षाने एकहाती देशात सत्ता मिळवली. मात्र नव्वद नंतर कॉंग्रेसला घरघर लागत गेली. स्व. अटलबिहारी वाजपेयी हे तीनदा देशाचे पंतप्रधान झाले होते. या तिन्ही वेळी वाजपेयी यांना घटक पक्षांची साथ होती. घटक पक्षामुळेच वाजपेयी पंतप्रधान होवू शकले. नवीन भाजपाने म्हणजे मोदी, शहा यांनी घटक पक्षांशी हातमिळवणी केली, मात्र भाजपाला जास्त जागा मिळत गेल्या, तसं घटक पक्षाचं महत्व कमी करायला सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना सारखे घटक पक्ष भाजपापासून वेगळे झाले. देशात आता पर्यंत अनेक वेळा घटक पक्षाचे पंतप्रधान झालेले आहेत. इतर पक्षाच्या पाठींबा मिळून का होईना घटक पक्षाचे नेते पंतप्रधान झालेले आहेत. मग ते जनता दलाचे इंद्रकुमार गुजराल असतील किंवा विश्‍वनाथ प्रतापसिंह असतील, नाही तर चंद्रशेखर असतील हे नेते आपल्याकडील कमी असलेल्या संख्या बळावर पंतप्रधान झालेले आहेत. पाशवी बहुमत तितकं कामाचं नसतं. पाशवी बहुमत लोकशाहीला अतिघातक असतं. बहुमत आहे म्हणजे तुम्हाला देशातील सर्व लोकांनी स्विकारलं असं होत नाही. भाजपाला तोच तर अहंकार जडला, बहुमताच्या जोरावर भाजपाने नको ते निर्णय घेवून लोकांना त्रास देण्याचे काम केले. त्यामुळे लोकं भाजपावर चिडले आहेत. उत्तर भारतात भाजपाला मानणारे लोक जास्त आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यामुळे भाजपाला बहुमत मिळत गेलं. उत्तर विभागातील लाट ओसरु लागली आहे. उत्तर प्रदेश सारखं महत्वाच्या राज्यातील जनता भाजपाच्या विरोधात जावू लागली. पुढील वर्षी या राज्यात निवडणुका आहेत. या निवडणुकीत कळेल लोक योगींना आणि भाजापाला किती साथ देतात? या राज्यात मायावती आणि अखिलेश यांना पुन्हा लोकांना पाठिंबा मिळू लागला.
घटक पक्ष एकत्र येतील का
घटक पक्षांची ताकद त्यांच्या नेत्यावर असते. अनेक राज्यात घटक पक्षांना मानणारे लोक आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी भाजपाने काय नाही केलं? पण तेथील जनतेने भाजपाला भीक घातली नाही. ममता ह्या तीन वेळा बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. पुर्वी ममता ह्या कॉग्रेसमध्ये होत्या, मात्र त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन करुन बंगाल हे राज्य ताब्यात घेतलं. ममता बॅनर्जी यांनी बंगाल ताब्यात घेतल्याने त्यांचे केंद्र पातळीवरील वजन वाढले. ममता प्रमाणेच बिहार मध्ये तेजस्वी यादव यांनी चांगली टक्कर भाजपा आणि नितीन कुमार यांना दिली होती. बिहार तेजस्वी यांच्या ताब्यात आले नसले तरी त्यांच्या जागा चांगल्या निवडून आल्या. बिहारमध्ये तेजस्वी यांनी आपली ताकद निर्माण केलेली आहे. दिल्ली केजरीवाल यांच्या ताब्यात आहे. दिल्लीत दुसर्‍या पक्षाला स्थान मिळणं शक्य नाही. तेथे फक्त केजरीवाल यांचा प्रभाव आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी हे भाजपाचे मुख्यमंत्री असले तरी त्या ठिकाणी अखिलेश यादव, मायावती हे दोन्ही नेते शक्तीशाली आहेत. या दोन्ही नेत्यांना मानणारा मतदार मोठा आहे. तेलंगणात चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. राव यांनी एकहाती राज्य आपल्या ताब्यात मिळवलं. महाराष्ट्रात शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी यांचे सरकार आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजपाला रोखू शकते, राष्ट्रवादीच्या जागा कमी निवडून येत असल्या तरी केंद्रात शरद पवार यांचे चांगले वजन आहे. घटक पक्षांना जोडण्याची त्यांच्यात ताकद आहे. पवार हे अनुभवी नेते आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून ते राजकारणात आहेत. वरील राज्यातील नेत्यांनी आप-आपले राज्य येत्या २०२४ च्या निवडणुकीत राखले तर नक्कीच मोठं परिवर्तन होवू शकते. या राज्यात लोकसभेच्या जवळपास अडीचशेपेक्षा जास्त जागा आहेत. घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्रीत येवून आघाडी स्थापन केली तर भाजपाला मोठं आव्हान मिळू शकतं, पण घटक पक्ष एकत्रीत येणार का? आणि एकत्रीत आले तरी त्यांचा नेता कोण होणार? पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल यासह अन्य प्रश्‍न उपस्थित होत असले तरी सध्या तरी घटक पक्षांची ताकद वाढत आहे. घटक पक्षांना भाजपाला हारवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे. संधीचं सोनं घटक पक्ष करतात की, वेगळंवेगळं लढण्यातच आपली ताकद खर्ची करतात हे आगामी काळात दिसून येईल.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!