Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनापरिस्थितीचे गांभीर्य ओळखा, लोकांचे जीव वाचवा, कामात हलगर्जीपणा करू नका, नसता निलंबणाच्या...

परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, लोकांचे जीव वाचवा, कामात हलगर्जीपणा करू नका, नसता निलंबणाच्या कारवाईला सामोरे जा आयुक्त सुनिल केंद्रेकरांची गेवराईला अचानक भेट

रुग्णालयाची केली पाहणी, आरोग्य विभागाचा घेतला आढावा
स्थानिक डॉक्टरांनी वरिष्ठांशी समन्वय ठेवावा, वरिष्ठ ऐकत नसतील तर मला फोन करा

भागवत जाधव ।गेवराई :
सर्वत्र ऑक्सिजनची समस्या आहे. अशा वेळी ऑक्सिजनचे योग्य नियोजन करा, संपण्यापुर्वी वरिष्ठांसोबत चर्चा करून ते उपलब्ध करा, डॉक्टरासह सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनो परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, रुग्णांचे जीव वाचवा, हलगर्जीपणा केल्यास थेट निलंबण करेल, अशी तंबी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज देत गेवराई येथे वैद्यकीय सेवेची आणि परिस्थितीची पाहरी करत तेथील आढावा घेतला. एक ते दीड तासांची व्यापक बैठक घेऊन सर्वांना सूचना दिल्या. दरम्यान, केंद्रेकरांनी प्रशासनाला शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचे निर्देशही दिले आहेत.
काल गेवराईच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा झाला होता. गेवराई आरोग्य प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सांगूनही ऑक्सिजन वेळेवर दिले जात नसल्यामुळे धावधाव झाली होती. हे प्रकरण सायं. दैनिक बीड रिपोर्टरने समोर आणले होते तर काहींनी थेट आयुक्त सुनिल केंद्रेकरांना याबाबत माहिती दिली होती. आज अचानक आयुक्त केंद्रेकरांनी थेट गेवराई गाठले आणि तेथील परिस्थितीची पाहणी करत आढावा घेतला. या वेळी आ. लक्ष्मण पवार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी तहसीलदार सचिन काळे, तालुका आरोग्य अधिकारी संजय दम, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. चिंचोले, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, न.प.चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, डॉ. राजेश शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


या वेळी सुनिल केंद्रेकरांनी बैठकीमध्ये डॉक्टरांसह सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, रुग्णांचे जीव वाचवा, कामात हलगर्जीपणा करू नका, हलगर्जीपणा दिसून आल्यास थेट निलंबीत करेल, अशी तंबी दिली. आलेल्या रुग्णांची अगोदर व्यवस्थीत तपासणी करा, त्याला परिस्थितीनुसार अ‍ॅडमिट करा, आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, गरजेनुसार तेवढाच ऑक्सिजन द्या, योग्य ते उपचार करा, रात्री झोपताना गरज पाहून ऑक्सिजन बंद करा, ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घ्या, ऑक्सिजनचा तुटवडा होण्याअगोदर वरिष्ठांना कळवा, वरिष्ठ दाद देत नसतील तर थेट मला कळवा, सर्वत्र ऑक्सिजनची समस्या आहे त्यामुळे आपल्याला योग्य नियोजन करावे लागेल. स्थानिक अधिकर्‍यांनी वरिष्ठांसोबत समन्वय ठेवावे, अशा सूचना देत सुनिल केंद्रेकरांनी रुग्णालयांची पाहणी केली. परिस्थिती गंभीर आहे, या परिस्थितीत सर्वांनी समन्वय ठेवत काम करावं, असं आवाहन त्यांनी या वेळी केलं.

शिक्षकांच्या योगदानाबद्दल केले तोंडभरून कौतुक
गेवराई येथील शिक्षकांनी कोविड मदतीसाठी 10 लाखाचा निधी जमा केला असून ते लवकरच आरोग्य विभागातील आवश्यक यंत्रणेसाठी देणार असल्याचे त्यांना कळवले असता बीड जिल्ह्यात दात्यांनी कमी नाही…..फक्त आवाज द्या जनता तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हवा तेवढा निधी देतील असे सांगत तालुक्यातील शिक्षक बांधवांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले

Most Popular

error: Content is protected !!