Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडवाळू उपश्याला जिल्हा प्रशासनाचे आशीर्वाद वाहनांना जीपीएस नसल्याचे पाच महिन्यांनंतर प्रशासनाला उमगलं

वाळू उपश्याला जिल्हा प्रशासनाचे आशीर्वाद वाहनांना जीपीएस नसल्याचे पाच महिन्यांनंतर प्रशासनाला उमगलं

काल जिल्हाधिकारी कार्यालयात
वाळू माफियांची मांदियाळी
आज लागलीच काही ठिकाणी वाळू उपसा सुरू
जीपीएसचे कारण पुढे करत
केला होता वाळू उपसा बंद

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्यावर सर्वस्तरातून ओरड झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने वाळू वाहतूक करणार्‍या गाड्यांना जीपीएस नसल्याचे कारण पुढे करत वाळू उपसा शंभर टक्के बंद केला होता. मात्र काल जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू माफियांची गर्दी दिसून आल्यानंतर आज लागलीच जिल्ह्यातील काही वाळू ठेक्यांवर वाळू उपसा सुरू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात असून वाळू उपसा करण्यासाठी शासनाने जी नियमावली बनवली आहे. त्या नियमावलीचे तंतोतंत पालन सुरुवातीपासूनच कराया हवे होते. मात्र बीडमध्ये महसूल विभागाच्या आशीर्वादाने नियमावलीचे पालन केले जात नाही आणि जेव्हा जनतेतून आवाज उठतो तेव्हा थातूरमातूर कारवाई केली जाते हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
बीड जिल्ह्यात अनेक वाळु ठेक्यांवर वाळू उपसा केला जातो. शासनाच्या नियमाचे धिंडवडे

काढत वाळू माफिया महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करतात. एकीकडे प्रशासन आणि सर्वसामान्य कोरोनाशी लढत असताना दुसरीकडे वाळू माफिया मात्र गोदा पात्रासह छोट्या-मोठ्या नद्यांच्या छाताडावर पाय देत आपला धंदा करतात. याबाबतची ओरड झाल्यानंतर परवा वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांना जीपीएस नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने वाळू उपसा बंद केला. परंतु ठेका देतानाच जी नियमावली असते त्या नियमावलीचे तंतोतंत पालन ठेकेदार करतो का? हे पहिल्या दोन-तीन दिवसातच पहावे लागते. जीपीएस आहे की नाही हे पाहण्यासाठी बीड प्रशासनाला ठेकेदाराने गुंतवलेल्या पैशांपेक्षा अधिक रोकड कमवल्यानंतर जाग येते. हे आश्‍चर्यच. जीपीएससह अन्य नियमांचे उल्लंघन सातत्याने होत असताना वाळु उपश्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं. जीपीएसचे कारण पुढे करून वाळू उपसा बंद केल्यानंतर काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वाळू माफियांची मोठी गर्दी दिसली. यामध्ये राजकीय पक्षांचे आच्छादन पांघरलेले वाळू माफियाही उपस्थित होते. काल मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया, जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आल्यानंतर आज जिल्ह्यातल्या काही भागात वाळू उपसा सुरू झाला आहे. गेवराई तालुक्यातील काठोडा येथे वाळू उपसा सुरू झाल्याचे व्हिडिओही रिपोर्टरच्या हाती लागले आहेत. याचाच अर्थ काल वाळू माफिया आणि महसूल विभागातील प्रशासनात तडजोह झाली. हे पुन्हा एकदा उघड झाले. वाळू उपश्यावर बंदीची कारवाई ही थातूरमातूर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत असून बीडच्या अवैध वाळू उपश्याला जिल्हा प्रशासनाचे आशीर्वाद असल्याचे सिद्ध होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!