Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंगळे महाराज यांचे निधन

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंगळे महाराज यांचे निधन


महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदाय पोरका झाला
बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, विनोद सम्राट ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराज यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. गेल्या ५० वर्षापासून इंगळे महाराज वारकरी संप्रादयाची पताका खांद्यावर घेवून त्यांनी धर्मप्रसार केला. अध्यात्माच्या दाही दिशा आपल्या विनोदी चुटकुले देवून सांगणारे प्रख्यात कीर्तनकार म्हणून बाबासाहेब इंगळे महाराज यांची महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये ओळख होते.


इंगळे महाराज यांनी संप्रदायपर अनेक कीर्तनाच्या कॅसेट काढल्या होत्या शिवाय काही विनोदी चुटकुले लिहिलेली पुस्तके प्रकाशित केले होते. त्यामुळे यातून मिळणार्‍या पैशातून आश्रम उभे केले होते. आपल्या मधुरवाणीने त्यांनी संप्रदाय क्षेत्रात मोठी ओळख निर्माण करून कोणत्याही अभंगावरून निरूपण करतांना विनोदाच्या आणि वास्तववादी उदाहरणे देवून संतांचा महिमा सांगणारे महान कीर्तनकार म्हणून बाबासाहेब इंगळे महाराजांची ओळख होती. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इंगळे कुटुंबियांच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.


बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी-धनंजय मुंडे
आपल्या विनोदी शैलीतील कीर्तनातून अध्यात्म आणि समाज प्रबोधन या संयुगाची ख्याती राज्यभरात पसरवलेले, बीड जिल्ह्याचे भूषण विनोदाचार्य ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आहे. दादांच्या अकाली निधनाने जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. जड अंतःकरणाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. दादांचे कुटुंबीय व शिष्य परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे; अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

वारकवारकरी संप्रदायात मोठी पोकळी
-माजीमंत्री क्षीरसागर

आपल्या विनोदपूर्ण शैलीतून नामस्मरण सत्संग सदाचार इत्यादी गोष्टींमध्ये लोकांना प्रवृत्त करणारे आणि स्वतः नामनिष्ठ,कीर्तनकार ह.भ.प विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे यांचे दुःखद निधन झाल्याने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

वारकरी संप्रदयातला चालता बोलता अभ्यासक गेला -आ.संदिप क्षीरसागर
वारकरी संप्रदयातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.बाबासाहेब इंगळे महाराज उर्फ दादा यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. गेली चार दशके इंगळे महाराजांनी बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात संत साहित्याचा प्रसार करत आपल्या विनोदी वक्तृत्व शैलीतून कीर्तन करत समाजाचे प्रबोधन केले. संत ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकोबांसारख्या संतांच्या अभंगाचे दाखले देत समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांवर आसूड ओढले. संत महंतांच्या विचाराचे पाईक व्हा हा संदेश त्यांनी सातत्याने दिला. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदयातला चालता बोलता अभ्यासक गेला अशी शोकभावना आ.संदिप क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!