Friday, October 22, 2021
No menu items!
HomeUncategorizedकाँग्रेसने युवा नेता गमावला! खासदार राजीव सातव यांचं निधन

काँग्रेसने युवा नेता गमावला! खासदार राजीव सातव यांचं निधन


पुणे (रिपोर्टर):- महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठीला रविवारी पहाटे धक्का देणारी घटना घडली. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. राजीव सातव यांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली होती, मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील जहांगिर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 23 दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या सातव यांची प्रकृती मध्यतरी बिघडली होती. नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती.
राजीव सातव यांच्या निधनाची वार्ता वार्‍यासारखी देशभरात पसरली. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होतं आहे. उद्या सकाळी 10 वाजता (17 मे) हिंगोली येथे सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी दिली. राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी 21 एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. 22 एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 23 एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र, 25 एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईला हलवल्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यांना करोना उपचारादरम्यान सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता.
दरम्यान, शनिवारी (15 मे) काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयात जाऊन, सातव यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राजीव सातव यांना काल रात्र थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे होतील,’ असं म्हटलं होतं मात्र, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सातव यांचं पार्थिव हिंगोलीला घेऊन जाण्यात येणार आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून राजीव सातव यांचं निधन झाल्याची माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या राजीव सातव यांच्या निधनाबद्दल सुरजेवाला यांनी दुःख व्यक्त केलं आहे. निःशब्द! आज मी असा सहकारी गमावला आहे, ज्याने सार्वजनिक जीवनातील पहिलं पाऊल माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये ठेवलं होतं आणि आजपर्यंत माझ्यासोबत चालत होते. राजीव सातव यांचा साधेपणा, त्यांचं हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. माझ्या मित्रा अलविदा, जिथेही राहशील, झळाळत रहा, अशा शोकभावना सुरजेवाला यांनी व्यक्त केल्या आहेत.

जमिनीशी घट्ट नातं
जोडलेलं युवा नेतृत्व

जमिनीशी घट्ट नातं जोडलेलं युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळात आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खा. राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परम मित्र गमावल्याचे कायम दु:ख राहिल असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शोक प्रकट केला.

महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला -शरद पवार
महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवार यांनी ट्विट करून सातव यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. महाराष्ट्राने एक तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व गमावल्याचे पवार म्हणाले.
मी मित्र गमावला; राहुल-प्रियांका गांधी
यांना शोक अनावर

काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं रविवारी पुण्यात निधन झालं. फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकती बिघडली आणि रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. राजीव सातव निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात असून, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी मित्र गमावला, आपल्या सर्वांचे एक मोठं नुकसान झालं असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तर राजीव सातव यांच्या जाण्याने प्रतिभाशाली सहकारी गमावला असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!