Saturday, October 23, 2021
No menu items!
HomeUncategorizedअग्रलेख- ‘राम तेरी गंगा मैली हो गई.’

अग्रलेख- ‘राम तेरी गंगा मैली हो गई.’

गणेश सावंत

9822652810
काय करावं, काय बोलावं, कोणाला सांगावं अशा स्थितीत आजचा माणुस जगतोय. सर्वत्र नैराश्येता, न्यूनगंडता आणि चिंता हातपाय पसरवतेय. कोणी ईश्वर-अल्लाहचे स्मरण करत दिवस काढत आहे तर कोणी चिंता व्यक्त करत चितेवर जात आहे. कोणी व्यवस्थेला दोष देत आहे तर कोणी मानव जातीच्या बेशिस्तीवर बोट उचलत आहे. कुदरत कयामत होत आहे आणि माणूस त्या कयामतीचा बळी ठरत आहे. अशी सर्वत्र विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. इतिहास साक्षीला आहे. कुदरत किंवा निसर्ग जेव्हा जेव्हा हरकतमध्ये येऊ पाहतो तेव्हा तो त्याची चाहुल सजीव सृष्टीतील प्राण्यांना देत राहतो. ही चाहूल सर्वप्रथम मानवापेक्षा प्राण्यांना लागून जाते. त्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी हे प्राणी सुरक्षित ठिकाणी जातात. परंतु या भूतलावर सर्वात बुद्धीजीवी प्राणी म्हणून ज्या मनुष्याकडे पाहिलं जातं त्या मनुष्याच्या नत्द्रष्ट बुद्धीकोषातून निर्माण केलेल्या कोरोनाची चाहुल मात्र लागल्यानंतरही माणसाला माणूस म्हणून माणसासारखं वागण्याची गरज वाटली नाही. तेव्हा मात्र माणसापेक्षा प्राणी हुशार असं म्हणण्याची वेळ आज आली.


यथा राजा तथा प्रजा
असं आपल्याकडे म्हणतात. जसे राज्यकर्ते म्हणतील, जसा नेतृत्व करणारा असेल त्याच पद्धतीने त्या राज्याची आणि त्या देशातील जनता त्याच्या वागण्याचं अनुकरण करते आणि इथेही तेच झालं. नत्द्रष्ट मनुष्याच्या बुद्धीकोषातून चीनसारख्या देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या विषाणुला बाद करण्याहेतु सतर्क राहण्याऐवजी अखंड हिंदुस्तानच्या नेतृत्वाने याकडे दुर्लक्ष केलं अन् इथच रामाच्या अयोध्याची लंका होण्यास सुरुवात झाली. कोरोनासारखा महाभयंकर विषाणू तांडव करणार आहे. लोकांच्या उरावर थयाथया नाचणार आहे. त्याला मसनवाट्याच्या दारापर्यंत नेणारं आहे, हे माहित असताना केवळ सत्ताकारणाच्या बेरजेत अडकलेल्या राज्यकर्त्यांनी गेल्या दीड वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने राज कारभार हाकला तो सत्तापिपासूचा होता आणि त्या सत्ता पिपासू वर्तवणुकीचा फटका देशभरातल्या सर्वसामान्य जनतेला बसत राहिला. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये विषाणुने आपली झलक दाखवून दिली. अनेकांना मृत्यूच्या दारेत नेलं. त्याच वेळी हा विषाणू किती गंभीर आणि मृत्युच्या दारेत घेऊन जाणारा आहे हे तज्ञांनी सांगितल्यानंतरही मोदी सरकार ज्या पद्धतीने गेल्या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये वागले, निवडणुका असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, टाळ्या-थाळ्या-दिपप्रज्वलनाचा बडेजाव केला त्यातून कोरोना कमी तर नाही, मात्र मृत्युच्या दारेत सर्वसामान्य मनुष्याला घेऊन जाण्याची ताकद कोरोनात निर्माण झाली. आम्ही मंदिर-मस्जिदच्या मागे धावत राहिलो, राजाचा महल बांधत राहिलो, इकडे मात्र झोपड्यात मृत्युचे तांडव चालत राहिले. स्मशानात चिता जळत राहिल्या. यावरही कमी की काय, प्रभू रामा


‘तेरी गंगा मैली हो गई’
ज्या गंगेच्या स्नानाने मनुष्य जीवनातले सर्व पाप धुवून निघतात. ज्या गंगेच्या निर्मळ जलाने अंत:करण शुद्ध होते. त्याच गंगेच्या पात्रात मनुष्य जात बाटली गेली. गेल्या आठ दिवसांच्या कालखंडामध्ये बिहार, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातून मानव जातीला हेलावून सोडणार्‍या घटना समोर आल्या. कोरोनासारख्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्य माणसाच्या नशिबी अग्निडागी मिळाला नाही. माणसातल्या हैवानांनी मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप सर्वसामान्यांचे मृतदेह अक्षरश: गंगेच्या पात्रात फेकून दिले. जी गंगा माता आहे त्या गंगेेने माणसातल्या हैवानाचा हा हैवानपणाही आपल्या पदरात घेतला. निष्पाप मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्यांना आपलय कवेत घेऊन काठावर नेऊन सोडले. हा विषय जेवढा मानवतेचा आहे तेवढाच राज्यकर्त्यांच्या बेफिकीरीचा नमुना आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, ‘न तो मैं आया हूं और न ही मुझे भेजा गया है। दरअसल, मुझे तो मां गंगा ने यहां बुलाया है ’ आज तीच गंगा मां पवित्र गंगेचं पाणी वाहून नेताना मृतदेह वाहून नेतेय. तेव्हा गंगा मां पंतप्रधानांना का बोलवत नाही. जी गंगा अखंड मानव जातीला, सजीव सृष्टीला आणि तिच्या पाप-पुण्याला आपल्या कवेत पदराआड घेण्याची ताकद ठेवते तीच गंगा फेकलेले मृतदेह काठावर आणून ठेवते याचाच अर्थ या हैवाणी कृत्याने गंगा मांही वैफल्यग्रस्त झाल्या आणि तुमच्या-आमच्या सारख्यांना प्रभू रामाला म्हणावं लागलं ‘राम तेरी गंगा मैली हो गई’ बिहार, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यामध्ये गंगेच्या पात्रामध्ये ज्या निष्पापांचे मृतदेह फेकले त्या मृतदेहांचे अक्षरश: श्वानांनी लचके तोडले. हे विदारक चित्र पाहिल्यानंतर खरच राज्यकर्ते रामाचे भक्त आहेत का? खरच राज्यकर्ते गंगा मां चे सपुत आहेत का? याबाबत शंकर निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. राज्यकर्त्यांच्या बेफिकीरी आणि सत्तालालसेमुळे अखंड हिंदुस्तानातला सर्वसामान्य ज्या पद्धतीने चितेवर जातोय आणि काहींच्या नशिबी चिताही येत नाही अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भारताकडे आणि भारतातील सर्वसामान्य माणसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन तो नेमका कोणता?याचं उत्तर आम्ही देण्यापेक्षा गेल्या आठ-दहा दिवसात


न्याय व्यवस्थेेने दिले
गेल्या आठ-दहा दिवसातली न्यायव्यवस्थेची कामगिरी माणुस म्हणून जगणार्‍यांसाठी उत्साहवर्धक ठरली. मद्रास उच्च न्यायालयाने कोरोनाच्या काळात निवडणुका घेतल्या म्हणून निवडणूक आयोगावर खुनाचा आरोप दाखल करायला हवा, अशी प्रतिक्रिया दिली. दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारवर चाबुक ओढताना तुम्ही शहामृगासारखे वाळूत डोके खुपसून बसू शकता, आम्ही तसे करणार नाही, अलाहाबाद उच्च न्यायालय म्हणते ‘स्थानिक निवडणूक आयोग आणि पोलीस यांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी काहीही कसे केले नाही. उत्तरखंडातले उच्च न्यायालय तेथील राज्य सरकारला एकाच दिवसात कोरोना हाताळणीचे विविध डझनभर आदेश देते, राजस्थान उच्च न्यायालय रुग्णांच्या हालअपेष्टा सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमते, गुजरात राज्यातील उच्च न्यायालय कोरोनास्थितीची स्वत:हून दखल घेते आणि राज्य सरकार गुलाबी चित्र रंगवत असल्याचे प्रशासनाचे वाभाडे काढते. महाराष्ट्राचे मुंबई उच्च न्यायालय कोरोना हाताळण्यात प्रशासकीय त्रुटी दाखवून देते, कर्नाटकचे बंगळुरू उच्च न्यायालय यासह अन्य राज्यातल्या उच्च न्यायालय गेल्या आठ पंधरा दिवसातले आदेश पाहता, कोरोनाबाबतचा संताप पाहता भाजपाच्या सरकारचे वाभाडे काढल्याचे दिसून येते. एकाअंगी, एकहुकमी सत्ता चालवणार्‍या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या चमुने सत्ताकारणासाठी जे पाप केले ते पाप झाकण्याचे काम आजही त्यांच्याकडून होत असल्याचे समोर येते. गुलाबी चित्र रंगवण्यात माहीर असलेल्या


गुजरातने मृत्यू लपवले
सत्ताकारणासाठी केंद्रातल्या सत्ताधार्‍यांना जेव्हा पाच राज्यांमध्ये निवडणुका घ्यायच्या होत्या तेव्हा देशातल्या अन्य राज्यांमध्ये कोरोना नाही तो केवळ महाराष्ट्रात आहे. ठाकरे सरकारच्या बेफिकीरीमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढला हे दाखवतानाच ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक फंडे केंद्र सरकारने आणि भाजपाने राबवले, हे फंडे वापरत असताना गुजरातसह अन्य राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, लोक मृत्युमुखी पडत आहेत असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील सरकारने मृत्यूचे आकडे लपवले. मात्र गेल्या दोन दिवसांच्या कालखंडात गुजरातमधून गेल्या 70 दिवसात एक नव्हे दोन नव्हे 1 लाख 27 हजारांपेक्षा जास्त लोकांचे मृत्यू प्रमाणपत्र काढल्याचे उघड झाले. प्रत्यक्षात कोरोनाने 5 हजाराच्या आसपास लोकांचा मृत्यू झाल्याचे गुजरात सरकार आपल्या पोर्टलवर सांगते मग पाच हजार लोक मृत्यूमुखी पडले असतील तर मग 1 लाख 27 हजार लोकांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले? सत्तर दिवसातला हा मृत्यूचा आकडा माणुस असणार्‍यांना हेलावून टाकणारा नाही काय? परंतु सत्ताकारण आणि आर्थिक धोरणात मश्गुल असलेल्या भाजपाच्या सत्ताधीशांना सर्वसामान्य जनतेच्या मृत्यूच्या आलेखाबाबत कुठलेच देणेघेणे नाही. प्रभू रामाच्या नावावर मत घ्यायचे मात्र प्रभू रामाचं आचरण करायचे नाही ही जी परिस्थिती आज ओढावली आहे त्या परिस्थितीला राज्यकर्ते हे एकमेव जबाबदार असल्याचे आता आरएसएसनेही म्हटले आहे. गाफील राहिल्यामुळे आजची परिस्थिती झाली, हे मत आरएसएसचे सर्वेसर्वा यांचे आहे. अशा वेळी आम्ही एवढच म्हणून ‘राम तेरी गंगा मैली हो गई.’

Most Popular

error: Content is protected !!