चाकरवाडी, कंकालेश्वर, सोमेश्वर, कपीलधारसह जिल्हाभरातल्या शिवालयात शिवशंभुची पुजा
परळी/बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून)- महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरातल्या शिवालयांमध्ये हर हर हर महादेवचा गजर घुमताना दिसून येत असून भक्तीमय वातावरणात जिल्हाभरातले शिवालये भक्तांनी फुलून गेले आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाणने आकर्षक रोशनाई आणि फुलांची सजावट केल्याने मंदिर अधिक फुलल्याचे दिसून येत असून आज दुपारपर्यंत दोन लाखांच्या आसपास भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी जिरेवाडी येथील भगवान सोमेश्वरांच्या पालखीला खांदा दिला. भगवान श्री सोमेश्वर हे आज प्रभू वैद्यनाथाच्या भेटीला येत असतात. माजी मंत्री पंकजा मुंडेंनी भाविकांसाठी खिचडीचे वाटप केले. प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर दुसरीकडे नारायणगड, कपिलधार, चाकरवाडी, कंकालेश्वर, सोमेश्वर यासह अन्य प्रमुख मंदिरांमध्ये आणि गावागावातील शिवालयांमध्ये शिभक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. भक्तीमय वातावरणामध्ये जिल्हाभरातील शिवशंभुंचे भक्त नतमस्तक झाले.
धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाणकडून वैद्यनाथ मंदिराची रोशनाई, धनंजय मुंडेंनी भगवान सोमेश्वरांच्या पालखीला दिला खांदा, पंकजा मुंडेंकडून भक्तांना खिचडीचे वाटप, जिल्हाधिकार्यांच्या हस्ते महापुजा, शिवभक्तांसाठी विशेष दर्शन व्यवस्था, शंभर सीसीटीव्ही कॅमेर्यांमार्फत सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष, 300 हून अधिक पोलीसांचा बंदोबस्त
धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठाण कडून वैद्यनाथ मंदिरात आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट
परळी (परळी) आज पवित्र महाशिवरात्री असल्याने परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत वैद्यनाथ मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. आ. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून ही विद्युत रोषणाई व फुलांची सजावट साकारण्यात आली असून, यासाठी सुमारे 21 प्रकारच्या फुलांची आरास वैद्यनाथ मंदिर व गाभार्यात करण्यात आलीय. तसेच हजारो दिव्यांच्या रोषणाईने प्रभू वैद्यनाथ मंदिर हे उजळून निघालेले दिसून भाविकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी सिद्ध होताना दिसत आहे.
दरम्यान आज महाशिवरात्री निमित्त परळी येथे सुमारे 5 लाख भाविक दर्शनाला येतील असा अंदाज व्यक्त केला जात असून दर्शन व सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे.