Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeसंपादकीयवाह रे वाह मोदी सरकार!!

वाह रे वाह मोदी सरकार!!


लबाडाचं अवतणं जेवल्याशिवाय काही खरं नसतं, तसचं केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या बाबतीत म्हणायला काही हारकत नाही. जो पर्यंत विकास समोर दिसत नाही. तो पर्यंत विश्वास न ठेवलेला बरा, निवडणुकीत विजयी होण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी आपल्या देशातील पुढारी लोकांना नको ती आश्वासने देवून टाकतात. जेव्हा आश्वासन पुर्ण करण्याची वेळ येते तेव्हा त्याला फाटे फोडले जातात. वेगवेगळी कारणे दाखवली जातात. देशात आता पर्यंत काहीच विकास झाला नाही. पुर्वीच्या सरकारने नेमकं काय केलं याचा रोज पाढा भाजपावाले 2014 पुर्वी वाचत होते. त्यांचे भक्त ही सोशल मीडीयातून आपल्या विचाराचे प्रदर्शन घडवत होते. सात वर्षात मोदी यांनी नेमकं काय केलं? याचं उत्तर ना भाजपाकडे आहे ना मोदी भक्त ाकडे आहे? हे करु, ते करु म्हणणं खुप सोप वाटलं होतं, आज देशाची काय अवस्था आहे? कुठे नेवून ठेवला देश, अशी निराशाजनक भावना व्यक्त केल्या जातात. कोरोनाने मोठे नुकसान केले, हे नुकसान भरुन न येणारे आहे. संकटाच्या काळात दिलासा देणं हे कोणत्या ही राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं, पण मोदी सरकारला संकट कळेना? कशाचे भाव वाढवावे आणि लोकांकडून कशातून टॅक्स घ्यावा याचं धोरण राहिलं नाही. लोकांना आज भाजपाला निवडून देवून प्रचंड प्रश्चाताप होत आहे. विकासाला मत दिलं आणि लोक रस्त्यावर आले.
इंधनाचा भडका
इंधनाच्या दरवाढीचं नेहमीच भाजपाने राजकारण केलं. जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा भाजपावाले ह्या सरकारला काय, काय बोलत नव्हते? इंधनाच्या दरवाढीविरोधात मोर्चे काढले जात होते. जिल्हा पातळीवर आंदोलन होत होते. मोठ-मोठी भाषण बाजी केली जात होती. पन्नास रुपयापर्यंत पेट्रोलचा दर आणुन ठेवू असं त्यावेळचे भाजपाचे नेते बोलत होते, जसचं मोदी पंतप्रधान झाले, तसे इंधनाचे दर कमी होण्याऐवजी वाढत गेले. एकीकडे निवडणुकीत अमाप खर्च करायचा, पुतळ्यावर कोट्यावधी रुपये उधळायचे दुसरीकडे आठ दिवसाला इंधनाचे दर वाढवले जात आहे. आता वाढत्या दरवाढीबाबत भाजपाच्या तोंडातून शब्द निघत नाही. काही भाजपाचे नेते हे काँग्रेसचेच पाप असल्याचे निर्लज्य वक्त व्य करुन आपलं हासं करुन घेतात. सध्या कोरोनाचा संकट काळ आहे. अशा संकटाच्या काळात मोदी यांनी इंधनाचे दर वाढवले. पाच राज्यातील निवडणुकी नंतर इंधनाचे दर वाढवून केंद्राने देशातील जनतेला चांगला झटका दिला. लॉकडाऊनमुळे हजारो लोकांच्या नौकर्‍या गेल्या, कामगार घरी बसून आहेत. उद्योगांना कुलूप लागलं. काही लोक खायाला मौताज आहेत. अशात केंद्र सरकार इंधनाचे दर वाढवून आपली विकासाची दुरदृष्टी किती चांगली आहे, याचे जाहीर प्रदर्शन दाखवत आहे. भाव वाढीबाबत सत्ताधार्‍यांना काही वाटत नाही. गेंड्याच्या कातडीसारखी त्यांची कातडी झाली. लोकांनी वाहने वापरावीत की नाही, अशी परस्थिती निर्माण झाली. ज्या प्रमाणे इंधनाचे दर वाढत असतात. त्याच प्रमाणे खाद्य तेलाचे दर वाढत आहे. खाद्य तेल तितकचं महत्वाचं असून महागाई वाढणं म्हणजे सर्वसामान्यांचं मरण असतं. रोजगार नाही, हातात पैसा नाही, आणि खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले. इतक्या महागाचं तेल आणायचं कसं, असा प्रश्न लोकांना पडू लागला? ज्या प्रमाणे कोरोना वाढत आहे, त्याच प्रमाणे इंधनाचे आणि खाद्य तेलाचे भाव वाढत आहे. महागाई आणि कोरोनात स्पर्धाच लागली की काय? कोरोना आणि महागाई दोन्ही जनतेच्या हिताची नाही. कोरोनाने अनेकांना गिळले आणि आता महागाई लोकांना उपाशी मारु लागली. वाढती महागाई पाहता मोदी फक्त ‘मन की बात’ करण्यात दंग असतात. लोकांच्या मनात काय आहे हे मोदी यांनी जाणुन घ्यावं, नुसतीच स्वत:ची मन की बात सांगु नये, गरीबांच्या पोटात अन्न नाही, हाताला रोजगार नाही, तिथं मन की बात कशाला कोण ऐकेल.
जिथं, तिथं प्रसिध्दीची हाव
प्रसिध्दीची किती हाव असावी याची काही मर्यादा असते, पंतप्रधान मोदी यांना फक्त प्रसिध्दी हवी असते. विदेशात त्यांचे आता पर्यंत भरपूर दौरे झाले, तेथे काय केलं, काय वाजवलं. याची ते प्रसिध्दी करायला मागे राहिले नाही. मोरा सोबतचा फोटो असेल किंवा अन्य काही फोटो असेल त्याची ते अमाप प्रसिध्दी करत आले. इंधनाच्या जाहिरातीत मोदी यांचा फोटो आहे. आता पर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी अशा पध्दतीचे फोटोशन केले नाही, पण मोदी यांनी केले. इंधनाचे वाढत असलेले दर आणि त्यात मोदी यांचा फोटो त्यामुळे वाहनधारकांचे अधिकच माथे गरम होवू लागले. काही ठिकाणी असे पोस्टर लोकांनी हाटवले, इतके लोक संतप्त झाले. दुसरा प्रसिध्दीचा भाग म्हणजे कोरोनाच्या लसीचा आहे. लसीकरणानंतर जे प्रमाणपत्र दिले जाते, त्यात मोदी यांचा फोटो आहे. हा प्रकारही खुपच हास्यास्पद आहे. एक तर काही ठरावीक लोकांनाच आता पर्यंत लस दिली गेली. जगातील अमेरिका, इंग्लंड सारख्या देशाने आपल्या देशातील नागरीकांना लस देवून आज ते मास्क मुक्त झाले. भारतात मात्र लसच उपलब्ध नाही. लसीकरणा बाबत नुसता गोंधळ सुरु आहे. 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरीकांना लस देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र लसच उपलब्ध नसल्याने काही दिवसासाठी लस देणे थांबवण्यात आले. लसीकरणात आपला देश प्रचंड मागे आहे. असं असतांना मोदी साहेब आपला फोटो लसीच्या प्रमाणपत्रावर छापून आणतात, हे किती मोठं दुर्देव आहे. जे लोक ऑक्सीजन विना, उपचाराविना मरण पावले त्याची जबाबदारी कोण घेणार? कोरोनाने मरण पावलेल्या नागरीकांचे मृत्यूचे प्रमाणपत्र काढतांना त्यावरही आपला फोटो छापून आणणार का?
गंगा तर साफ झाली नाही
मोदी यांनी काय-काय वादे केले नव्हते? त्यांचे वादे आणि त्यांचे जुने भाषण ऐकले की कीव येते, इतका मोठा धोका देशातील जनतेला एखादा पंतप्रधान देत असेल तर देशातील लोकांनी येथून पुढे काय म्हणुन पुढार्‍यावर विश्वास ठेवावा? देशात स्वच्छता मोहिम राबवण्याची घोषणा केली होती. हया मोहिमेचं वाटोळं झालं. देशच काय साधं एखादं शहर देखील मोदी स्वच्छ करु शकले नाही, ते ज्या मतदार संघातून निवडून आले तो जिल्हा तरी स्वच्छ झाला का? फक्त हातात झाडू घेवून त्यांनी फोटोशन चांगलं करुन घेतलं होतं. कोरोनाच्या कार्यकाळात गावे आणि शहरे स्वच्छ असायला हवीत आज किती गावे आणि शहरे स्वच्छ आहेत? फक्त देखावा करण्याचं काम मोदी करत आले. चित्रपटाप्रमाणे त्यांनी लोकांची दिशाभूल केली. गंगा नदी साफ करण्याचे वचन त्यांचे होते, आज गंगेला वाईट दिवस आले. कोरोनामुळे मरण पावलेले मृतदेह गंगा नदीतून वाहत आहे. मृतदेहाचे लचके हिस्त्र प्राणी तोडत असल्याचे विदारक दृष्य अवघ्या जगाने पाहितले, हे दृष्य मनाला अस्वस्थ करणारे आहे. गंगा तर साफ झाली नाही, पण त्यातून मृतदेह वाहत असल्याने गंगा पुर्वीपेक्षा अधिक दुषीत झाली. मोदी यांनी वाहनधारकांना धोका दिला, सर्वसामान्यांना धोका दिला आणि गंगेला देखील धोका दिला, आणखी कोणा-कोणाला धोके बसणार आहेत?
शेतकर्‍यांना दिलं अन …
आम्ही शेतकर्‍यांचे कैवारी आहोत, असा आव भाजपाने नेहमीच आणला. मात्र शेतकर्‍यांचा भाजपाने कधी मनातून सन्मान केला नाही. दिल्लीच्या सिमेवर बसलेल्या शेतकर्‍याकडे मोदी यांनी साधं डुंकूनही पाहितलं नाही. उलट त्यांना पंतप्रधान मोदी यांनी आंदोलन जीवी ठरवून त्यांचा अवमान केला. शेती मालाला केंद्राने योग्य तो हमी भाव दिला नाही, मालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होवून मरत आहे, याचं केंद्राला देणं-घेणं नाही, पंतप्रधान मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लोकांना चांगला वाटला, पण ही तात्पुर्ती मलमपट्टी आहे हे लोकांच्या लक्षात आलं नाही. कुणी काही तरी देतयं याचा अर्थ सरळ असतो. त्यातून जास्तीचंच घेतलं जाणार? केंद्राच्या पोकळ आमिषाला लोक भळभळले. शेतीच्या बाबतीत खत हे महत्वपुर्ण मानलं जातं. आज पर्यंत खाताचे भाव हे नियमात होते. केंद्र सरकार स्वत: झळ सहन करुन खतावर सपशिडी देत होतं, खाताचे भाव कमी असायचे, पण ह्या भाजपाच्या कार्यकाळात खताच्या भावात उच्चांक गाठला. शंभर नव्हे, दोनशे नव्हे तब्बल पाचशे रुपयाने खताचे भाव वाढवून ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकर्‍यांना प्रचंड प्रमाणात आडचणीत आणले. खताचे इतके भाव वाढवणे म्हणजे शेतकर्‍यांना भीकाला लावण्यासारखं आहे. शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देवून जणू काही मोदी यांनी त्यांच्यावर उपकारच केले. त्याऐवजी ते पैसे न दिलेले परवडले असते. लोक आता केंद्राच्या नावाने संताप व्यक्त करु लागले. मोदी यांनी जिथं-तिथं भाव वाढवून ठेवल्याने “वाह रे वाह मोदी सरकार” असं म्हणण्याची वेळ देशातील जनतेवर आली आहे. केंद्राने भाव वाढवून लोकांचे रक्त शोषणाचे काम सुरु केले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!