Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमनागापुरात थरार, दोन सख्ख्या भावांची हत्या

नागापुरात थरार, दोन सख्ख्या भावांची हत्या


जुन्या भांडणाची कुरापत काढुन कुर्‍हाडीने केला हल्ला; हत्याकांडाने जिल्हा हादरला
बीड (रिपोर्टर):- जुन्या भांडणाची कुरापत काढत मोबाईलवरून शिवीगाळ करणार्‍या तरूणाच्या घरच्यांना सांगण्यासाठी शेतातून गावात आलेल्या दोन भावांवर संबंधित तरूणाने कुर्‍हाडीने हल्ला चढवत सपासप वार केल्याने या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या भावाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची थरारत घटना बीड तालुक्यातील नागापुर (खु.) येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलीसांसह जिल्हा पोलीस उपअधिक्षक यांनी घटनास्थळाला भेट दिली असून या प्रकरणातील आरोपी परमेश्वर साळुंके फरार आहे. सदरच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.

khun

या बाबत अधिक असे की, बीड तालुक्यातील नागापुर (खु.) येथील परमेश्वर साळुंके आणि राम आत्माराम साळुंके, लक्ष्मण आत्माराम साळुंके यांच्यात गेल्या महिनाभरापुर्वी किरकोळ भांडण झाले होते. सदरचे भांडण हे गावपातळीवर ज्येष्ठांच्या मदतीने सोडवण्यात आले होते. त्यानंतर एक महिना यांच्यात कुठलीही कुरबुर झाली नाही. मात्र काल रात्री परमेश्वर साळुंके याने राम आणि लक्ष्मण यांना भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली. त्यामुळे राम, लक्ष्मण हे दोघे भावंड परमेश्वर शिवीगाळ करतो म्हणून त्याच्या आई, वडिलांना सागंण्यासाठी शेतातून गावात आले. परमेश्वर घरापासून हाकेच्या अंतरावर कुर्‍हाड घेवून उभा होता. त्यावेळी राम, लक्ष्मण दिसताक्षणी परमेश्वरने आपल्या हातातील कुर्‍हाडीने दोघांवर सपासप वार करण्यास सुरूवात केली. या अनपेक्षित हल्ल्यात राम आणि लक्ष्मण दोघेही रक्तबंबाळ झाले. घटनास्थळीच राम यांचा मृत्यू झाला तर लक्ष्मण यास जखमी अवस्थेत उपचारासाठी बीड येथे दाखल करण्यात आले. उपचार घेत असतांना आज पहाटे लक्ष्मण यांचाही मृत्यू झाला. किरकोळ वादातून नागापुर (खु.) या ठिकाणी दोन सख्ख्या भावाची हत्या झाल्याची माहिती पिंपळनेर पोलीसांना समजताच पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सानप यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य पाहून डिवायएसपी संतोष वाळके यांनीही घटनास्थळ गाठुन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणातील आरेापी परमेश्वर साळुंके हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदरचे हत्याकांड 10.30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान घडले. या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!