अग्रलेख- भाजपाची होळी, पंकजांची धुरवड
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
पद, पैसा, प्रसिद्धीच्या ताकतीवर आपला विजय अश्व कोणीच रोखू शकत नाही, या गर्वात असलेल्या केंद्रीय भाजपासह राज्य भाजपाच्या नेतृत्वांना आपल्या होम पिचवर उलट्या हाताने बोंब मारण्याची वेळ एका मतदारसंघातल्या लोकांनी आणली. पुण्यातली कसबा पेठ हा भाग वर्षानुवर्षे भाजपाच्या वळचणीला असलेला भाग. मात्र काल-परवा झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा इथे दारुण पराभव झाला. या पराभवाची कारणमिमांसा काय? याचा शोध आणि बोध हा भाजपाने घ्यावा. परंतु भाजपाचा हा पराभव राज्य भाजपाच्या अंतर्गत बंडाळीचा भाग आहे का? मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारामध्ये उमेदवारी न देण्याचा विषय कोणाचा होता. हेमंत रासने हे भाजपाचे पराभूत उमेदवार कोणाच्या शिफारशीवरून उमेदवार झाले होते? हे ना अनेक जे काही प्रश्न असतील ते प्रश्न अन् त्याचं उत्तर ही भाजपाची अंतर्गत बाब असली तरी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा सर्वांगीन विचा करताना कसब्यातील पराभवाला अनन्यसाधारण महत्व द्यावं लागेल. एकीकडे सत्ता हेच उद्दिष्ट समजून भाजप ज्या ताकतीने निवडणुकांमध्ये उतरतो, प्रतिस्पर्धी उमेदवारांनाच नव्हे तर पक्षांना समूळ नष्ट करण्याहेतू जी काही ताकत लावतो त्या ताकतीचे कसब्यातून भाजपाच्या विरोधात पडसाद तर उमटत नाहीत ना? कसब्यातला निकाल हा मुंबई महापालिकेसह 2024 च्या विधानसभा निवडणुकीची विरोधकांची ही मुहूर्तमेढ तर नव्हे? भाजप आता स्वत:च्याच बालेकिल्ल्यात मोठ्या मताधिक्याने पराभूत होत असल्याने अन्य मतदारसंघात हाच धोका होणार आहे का? तर याचं उत्तर भाजपाने गेल्या साडेतीन -चार वर्षांच्या कालखंडामध्ये राज्यात जो सत्तेचा उन्माद दाखवला आणि आजपावेतही दाखवत आहे ते लोकांना आवडलेलं नाही हे उघड सत्य नाकारता येणार नाही. त्या उघड सत्यातले तर हे फेरे नाहीत ना? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच
फडणवीसांचे नेतृत्व
आणि त्यांचे राजकारण हे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर हिडीस होत चालल्याचे अधिक प्रमाणात स्पष्ट होते. खरंतर कुविचारांची होळी करत पेटत्या होळीला बोंब मारत प्रदक्षणा करण्याची आपली परंपरा. पंरतु ऐन होळीच्या कालखंडात कसब्यातील नागरिकांनी फडणवीसांच्या मनगटावर चुना फासून त्यांच्यावर बोंब मारण्याची वेळ जी आणली ती केवळ आणि केवळ फडणवीसांच्या कुटनितीच्या आणि अहम् पणाच्या राजकारणामुळेच. फडणवीसांचं राजकारण आणि फडणवीसांचं नेतृत्व बीड जिल्ह्यासाठी नवं नाही. जेव्हा गोपीनाथराव मुंडेंसारखा लोकातला नेता उभ्या राज्यावर नव्हेतर देशावर अधिराज्य गाजवत होता तेव्हा हेच फडणवीस त्यांच्या करंगळीला धरून महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिर होते. परंतु दुर्दैवाने मुंडेंचे अकाली अपघाती निधन झाले आणि तेथूनच फडणवीसांचं नेतृत्व हे महत्वकांक्षीच नव्हे अधिक अपेक्षा-आकांक्षांनी झेप घेण्याच्या पावित्र्यात कायम राहिले. भाजपाच्या दिल्लीश्वरांनीही फडणवीसांच्या आशा-अपेक्षांना आणि सत्तेच्या महत्वकांक्षेला रसद पुरविली. तिथच अधिकच्या महत्वकांक्षेतून फडणवीसांच्या नेतृत्वात उभी 25 वर्षे ज्याच्या सोबत संसार केला तो शिवसेना पक्ष भाजपाच्या हातून निसटला. सत्ताकारणाचं बेरजेचं राजकारण करताना फडणवीसांची कुटनीती इतकी पुढे गेली की शिवसेनेला उद्ध्वस्त करत आपल्या सत्तेच्या राजकीय महत्वकांक्षेच्या विजयातून फडणवीसांनी पक्षातील बोलत्यांना अधिक अबोल करण्यात यश मिळवले. इथच भाजपातल्या अंतर्गत गटबाजीला अधिक अधिक उमाळे येत राहिले आणि त्यातून राज्य भाजपात कुठे ना कुठे
गटबाजीची धुरवड
पहायला मिळू लागली. काल-परवा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं, ‘इथली गटबाजी मी थांबवू शकते, परंतु राज्य भाजपाच्या गटबाजीचे काय?’ पंकजा मुंडेंचं हे वाक्य स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत गटबाजी ही टोकाची आहे, हे दाखवून देणारं. पंकजा मुंडेंचं आणि राज्य भाजपाचं नेतृत्व करणार्या देवेंद्र फडणवीसांचं सख्ख्य कसं आहे हे जिल्ह्याला नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. पंकजा मुंडेंच्या पराभवापासून ते राज्यात घेतल्या जाणार्या महत्वपुर्ण निर्णयात डावलण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस आघाडीव असल्याचे सातत्याने दिसून आलेले आहेत. त्यामुळेच पंकजा मुंडेंच्या पाठिशी असलेला एक मोठा वर्ग फडणवीसांच्या नेतृत्वावर कायम प्रश्नचिन्ह निर्माण करतो. जी महत्वकांक्षा, जी हाव देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे तीच महत्वकांक्षा ही पंकजा मुंडे यांच्यातही काटोकाट भरलेली आहे. हे सत्य स्वीकारावेच लागेल. आणि कुठल्याही राजकारण्याचे सर्वात मोठे भांडवल हे महत्वकांक्षेचच असतं. मात्र त्या महत्वकांक्षेला साथ देण्यासाठी मतदार जेवढा महत्वाचा आहे तेवढाच पक्षातील राष्ट्रीय पातळीवरी नेतृत्वही महत्वाचे असतात. फडणवीसांकडे मतदार नाहीत, परंतु नेतृत्व आहे. त्यामुळे फडणवीसांचं राज्य भाजपात आणि केंद्रीय भाजपात चालतं फावतं. पंकजांना मात्र मतदार आहेत, केंद्रीय नेतृत्वात तेवढसं चालत नाही. जे स्व. मुंडेंच्या बाबतीत दोन ते तीन वेळा घडलं तेच पंकजांच्या बाबतीत सातत्याने घडत आलं आहे. म्हणूनच पंकजा मुंडेंकडून राज्य
भाजपातील अंतर्गत
बंडाळीचे वर्णन
सातत्याने येत राहते. कधीकाळी पंकजा मुंडेंनी आपण जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहोत, हे म्हटल्याने सुरू झालेली महत्वकांक्षेची रेस आजपावेत सुरू असली तरी या रेसमध्ये फडणवीसांचा अश्व हा अधिक जलद असल्याचे स्पष्ट झाले. जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हणून अधिक वेगाने सत्ता केंद्र काबीज करू पाहणार्या पंकजांना सातत्याने भाजपातील गटाकडून रोखण्यात येऊ लागले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा पराभव झाला आणि त्या पराभवाच्या कारणमिमांसात फडणवीसांचे नाव एक नंबरला आले तेव्हा मात्र पंकजा-देवेंद्र यांच्यात अधिकचे ताण-तणाव होत राहिले. पंकजांनी तेव्हापासून अकांडतांडव सुरू करून देवेंद्र फडणवीस यांना पक्षासमोर आरोपी म्हणून उभा करण्याचा प्रयास अनेकदा केला परंतु फडणवीसांनीही जशास तसे उत्तर देणे कायम ठेवले. मग जिल्ह्यामध्ये पंकजांना विरोध करणारे मेटे यांना रसद पुरवणे असो, अथवा विधान परिषद, राज्यसभा निवडणुकांमध्ये उमेदवार देताना पंकजांना टाळणे असो, आत्ता गेल्या दोन महिन्यांपूर्वी फडणवीस बीड जिल्ह्यात दोन वेळेस आले मात्र त्या वेळी पंकजा मुंडे आणि प्रितम या फडणवीसांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत, होय फडणवीसांचे नेतृत्व मानत नाहीत, हा मॅसेज त्या देत राहिल्या. याउलट जेव्हा राज्य भाजपाचे अध्यक्ष बीडमध्ये आले तेव्हा मात्र पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यात त्यांच्या समवेत आल्या. एकूणच फडणवीसांचे नेतृत्व जर राज्यात अंतर्गत बंडाळीत व्यस्त राहत असतील तर भविष्यात भाजपासाठी कसब्यासारखे निकाल सहजगतीने लागतील. यातही दुमत नाही. सत्तेचा उन्माद, सत्तेची मस्ती घेऊन जेव्हा निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांसोबत कुस्ती खेळली जाते तेव्हा उन्माद, मस्तीच्या खुराकावर असलेल्या मल्लाची जिरवायची कशी? हे जनतेला खास ठाऊक असते. असो, कसब्याचा निकाल हा भाजपाला बोंब मारायला लावणारा आहे. तर पंकजांचे वक्तव्य भाजपाच्या अंतर्गत गटबाजीचे उघड दर्शन देणारे म्हणावे लागेल. काहीही असो, या दोन्ही गोेष्टी भाजपासाठी येणार्या काळात मारक ठरतील हे खरे.