Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाजून महिन्यात 12 कोटी लस उपलब्ध होणार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

जून महिन्यात 12 कोटी लस उपलब्ध होणार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती


नवी दिल्ली (वृत्तसेवा): देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र करोनाचा फैलाव पुन्हा वेगाने पसरू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे. जून महिन्यात 12 कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण मोहीम 1 मे पासून सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात 20.86 कोटी करोना लशींचे डोस दिले गेले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही 1.82 कोटी लशींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. तसेच पुढच्या तीन दिवसात 4 लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात 50 टक्के लशी केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जातात. या लशी राज्यांना विनामुल्य पुरवल्या जातात. उर्वरित 50 टक्के लशी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना आगाऊ माहिती दिली आहे. झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांव्यतिरिक्त तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया घालवण्याचं प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत 15.5 टक्के, जम्मू काश्मीरमध्ये 10.8 टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये 10.7 टक्के इतक्या लशी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात 6.3 टक्के लशी वाया गेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली होती. लसीकरणाच्या 134 व्या दिवशी म्हणजेत शनिवारी 28 लाख 9 हजार 436 जणांचं लसीकरण केलं गेलं आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!