बीड/अंबाजोगाई (रिपोर्टर) अंबाजोगाईच्या व्यसनमुक्ती केंद्रात कुकर्माचा पर्दाफाश झाल्यानंतर आज बीड, अंबाजोगाई येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रावर एकाच वेळी वैद्यकीय पथकांना सोबत घेऊन पोलिसांनी छापामारी सुरू केली. दुपारी दीड ते पावणे दोनच्या दरम्यान ही छापेमारी सुरू झाली. या छापेमारीत पोलिसांसह आरोग्य विभागाला नेमके काय मिळाले हे अद्याप समजू शकले नसले तरी बीडच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणारे 28 लोक आढळून आल्याचे सांगण्यात येते.
अंबाजोगाई येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात महिला डॉक्टराकडे शरीरसुखाची मागणी करत तिला मनोरुग्ण ठरवून वेश्या व्यवसाय करण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस येऊन या प्रकरणात केंद्राच्या संचालिकांसह अन्य लोकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने घेऊन आज बीड, अंबाजोगाई, केज येथील नवजीवन व्यसनमुक्ती मानसिक सल्ला केंद्रावर छापेमारी केली. अंबाजोगाईत आरोग्य विभाग आणि पोलिसांनी छापेमारी सुरू ठेवली असून बीड येथील मसरतनगर भागात असलेल्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रावर आरोग्य विभागाचे डॉ. संतोष शहाणे, डॉ. राम आव्हाड यांच्यासह वरिष्ठपोलिस अधिकार्यांनी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास छापेमारी सुरू ठेवली आहे. बीडच्या व्यसनमुक्ती केंद्रात 28 लोक उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. प्रथमदर्शी चौकशीमध्ये गेल्या चार दिवसांपासून या केंद्रात एकाही डॉक्टरचा राऊंड झाला नसल्याचे सांगण्यात येते. छाप्याअंती या तीन ठिकाणच्या व्यसनमुक्ती केंद्रातून नेमके बाहेर काय येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सदरच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील, संचालक राजकुमार गवळी हे असल्याचे सांगण्यात येते.