बीड (रिपोर्टर) बीडमध्ये गर्भपाताचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यामध्ये गुन्हे दाखल होऊन चौघा जणांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. बीडच्या गर्भपाताचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत असून पोलीसांचे एक पथक कालपासून औरंगाबादेत तळ ठोकूएन आहे.
बीड तालुक्यातील बकरवाडी येथील शीतल गणेश गाडे या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मयत महिलेचा पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबुराव गाडे (दोघे रा. बकरवाडी ता. बीड), मयत महिलेचा भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनिषा शिवाजी सानप (रा. अर्धमसला ता. गेवराई), प्रयोग शाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड) आणि सीमा सुरेश डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सीमा डोंगरे यांचा मृतदेह बिंदुसरा धरणात आढळून आला. काल पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता यातील आरोपी अंगणवाडी सेविका मनिषा शिवाजी सानप हिला पोलिसांनी एमसीआर मागितल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. पीसीआरमध्ये असलेल्या आरोपींच्या चौकशीनंतर याचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत निघत असल्याने कालच बीडचे एक पथक औरंगाबादमध्ये तळ ठोकून आहे.
पोलिसांच्या तपासाबाबत संशय
गर्भपात प्रकरणात आरोपी असलेली अंगणवाडी सेविकेला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले. तपासी अधिकार्याने अधिक तपासासाठी न्यायालयाकडे पोलिस कोठडी मागणी करायला हवी पण पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले आहे.