Saturday, December 5, 2020
No menu items!
Home बीड बाजीगर

बाजीगर


बिहार विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त झटका बसला तो नितीशकुमार यांना, गत वेळी त्यांच्या पक्षाची सदस्य संख्या आणि या वेळची सदस्य संख्या यात मोठी तफावत आली. गत विधानसभेत हा पक्ष दुसर्‍या क्रमांकावर होता. तेव्हा सत्तेसाठी राजदसोबत आघाडी करण्यात आली होती, मात्र राजदचं आणि नितीश याचं खटकलं, त्यामुळे नितीश यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपाने त्यांच्या पक्षाला पाठींबा देवून त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं होतं. या निवडणुकीत नितीशकुमार आणि भाजपा या दोन्ही पक्षाने एकत्रीत येवून निवडणुका लढवल्या, पण या निवडणुकीत बिहारच्या लोकांनी नितीश यांना चांगलाच धडा शिकवला असला तरी यात भाजपानेच नितीश यांना पाठीमागे आणल्यासारखी परस्थिती पाहावयास मिळते, कारण नितीश यांच्याच सहकार्याने राज्यात भाजपाने चांगली आघाडी घेतली. पासवान यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केली नसली तरी त्यांच्यामुळे नितीश यांच्या पक्षाला जबर फटका बसला हे ही या निकालातून दिसत आहे. चिराग पासवान यांना भाजपातून अंतर्गत फुस असावी म्हणुनच त्यांनी वेगळी निवडणुक लढवली असा अंदाज आहे. चिराग पासवान हे मोदी, शहांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. पावसान यांना समजुतीचे डोस भाजपा देवू शकत होता, पण ते द्यायचे नव्हते? नितीश आणि तेजस्वी यादव,कॉंग्रेस यांना संपवण्यासाठी भाजपाने चांगलेच डाव टाकले होते, ते डाव काही प्रमाणात यशस्वी झाले असे म्हणता येईल, पण तेजस्वी यादव यांची मुसंडी भाजपाला आवरता आली नाही. एमआयएमच्या माध्यमातून भाजपाने कॉंग्रेस, तेजस्वी यांना रोखवण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसला रोखण्यात एमआयएम यशस्वी ठरली. तेजस्वीचं कार्य हे नावाप्रमाणेच झालेलं आहे.

भाजपाने चांगले पाय रोवले


२०१४ पासून भाजपाचा देशात चांगल्या पध्दतीने विस्तार होत आहे. अनेक राज्यात भाजपाचे फक्त बोटावर मोजण्या इतकेच आमदार असायचे आता त्या राज्यात भाजपाने चांगलीच मुसंडी मारली. बिहारमध्ये भाजपाचं तसं काही अस्तित्व नव्हतं. त्या राज्यात प्रादेशीक पक्षाचं वर्चस्व आहे. मात्र प्रादेशीक पक्षांना पाठीमागे टाकून बिहारमध्ये भाजपाने आपले चांगलेच पाय रोवले आहे. ज्या प्रादेशीक पक्षाचं भाजपाला त्या-त्या राज्यात सहकार्य मिळत गेलं. नंतर त्याच प्रादेशीक पक्षांना भाजपाने संपवण्याचा प्रयत्न ही केला हे नाकारुन चालणार नाही. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बळावरच भाजपाचे पाय रोवले गेले. नंतर शिवसेनेला संपवण्याचा घाट भाजपाने घातला. तोच प्रयोग बिहार मध्ये भाजपाने केला. २०१५ साली बिहारमध्ये भाजपाला ५३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत ७४ जागा भाजपाने मिळवल्या आहेत. २०१५ साली नितीश कुमार यांच्या पक्षाला ७१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यात घट होवून फक्त ४३ जागाच मिळाल्या आहेत. भाजपाला आपण पोसून चुक तर केली नाही याची सल नक्कीच नितीश कुमार यांना असणार आहे. भलेही यावेळी भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले असले तरी त्यांच्यावर सगळी कमांड भाजपाची राहणार आहे. भाजपा जसं म्हणेल तसं नितीशकुमार यांना वागावं लागणार आहे. यात नितीशकुमार याचं खच्चीकरण झाल्याशिवाय राहणार नाही.

कॉंग्रेसला तितकं जमलं नाही

कॉंग्रेस पक्षाचं भवितव्य काय असं प्रत्येक निवडणुकीच्या निकालातून दिसून येवू लागलं. आता पर्यंत अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसला अजुन काही सुर सापडेना. बिहार मध्ये कॉंग्रेसने तेजस्वी यादव यांच्या सोबत आघाडी केली. यात कॉंग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली नाही. कॉंग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर नक्कीच तेजस्वी यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली असती. बिहार राज्यात कॉंग्रेसला मरगळ आली. गेल्या वेळी ज्या जागा निवडुन आल्या होत्या त्या जागा कॉंग्रेस वाचवू शकली नाही. २०१५ साली कॉंग्रेसने २७ जागा मिळवल्या होत्या. यावेळी त्यात घट होवून फक्त १९ जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेस फक्त राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरच अवलंबून राहत असल्यामुळे कॉंग्रेसचे हे हाल होत आहे. राज्यातील कॉंग्रेसचे पक्ष वाढीसाठी कुठलेही योगदान नसल्यामुळेच कॉंग्रेसचा अशा पध्दतीने दारुन पराभव होत आहे. कॉंग्रेस पेक्षा कधी नव्हे ते डाव्या पक्षांनी चांगली कामगिरी करुन चांगल्या जागा मिळवल्या आहेत, जे डाव्या पक्षांना जमु शकतं ते कॉंग्रेस पक्षाला का जमू शकत नाही?

एमआयएमचं आगमन

ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षाने बिहारची निवडणुक लढवली. ओवीसी बंधु पुर्वीपासून ‘भडक’ पुढारी म्हणुन ओळखले जातात. त्यांनी या निवडणुकीत पाच जागा मिळवल्या आहेत. निवडणुकीत आलीकडच्या काळात जात,धर्माचा जास्तच आधार घेतला जात आहे. त्यामुळे लोक काही प्रमाणात अशांना भुलतातही, मग तो भाजपा असेल किंवा एमआयएम असेल असे पक्ष जाती,धर्माचा आणि धार्मिक स्थळाचा निवडणुकीत वापर करुन त्या पध्दतीने प्रचार करत असतात आणि लोकांना भावनिक बनवून मते पदरात पाडून घेत असतात. ओवीसी हे इतर पक्षासाठी धोकादायक असले तरी भाजपासाठी ते फायद्याचे आहेत हे नाकारुन चालणार नाही, ते किती ही भाजपाच्या आणि संघाच्या विरोधात बोलत असले तरी त्याचा काही फायदा नाही. निवडणुकीत जे कारायचं तेच ते करत असतात. त्यामुळे त्यांच्या भाजपाच्या विरोधात बोलण्यात काही अर्थ राहत नाही. ओवीसी यांचा पक्ष खुप जुना आहे. त्यांच्या पक्षाने आता पर्यंत देशात चांगली कामगिरी करायला पाहिजे होती, पण एका जाती,समुहाला समोर ठेवून राजकारणात यशस्वी होता येत नसतं. भले ही काही ठरावीक जागा मिळाल्या असल्या तरी त्यातून बरचं काही साध्य होत नाही. निवडणुक लढवणं, दोन-चार जागा मिळवणं म्हणजे एखाद्या राज्यात सत्ता ताब्यात ठेवणं असं नाही, एखादं राज्य ताब्यात असणं ते दखल पात्र होवू शकतं. ज्या राज्यातून ओवीसी येतात त्या राज्यात तरी त्यांची कुठं समाधान कारक सदस्य संख्या आहे. तेलंगणामध्ये ७ जाग्याच्या पुढे त्यांची मजल नाही. बिहारमध्ये जसं चिराग पासवान यांच्यामुळे नितीश यांचं नुकसान झालं तसंच नुकसान ओवीसीमुळे कॉंग्रेस आणि तेजस्वी यादव याचं झालेलं आहे.

हारले तरीही त्यांचीच चर्चा


बिहारमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून नितीशकुमार हेच मुख्यमंत्री आहेत. यापुर्वी बिहार हे लालूप्रसाद यादव यांच्या ताब्यात राज्य होतं. नितीश आणि लालू हे दोनच पुढारी बिहारच्या राज्यात तगडे होते. त्या दोघांचीच चलली होती. इतर पक्षांना तितकं बिहारमध्ये स्थान नव्हतं. लालुप्रसाद गेल्या काही वर्षापासून जेल मध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा सगळा भार त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यावर आहे. तेजस्वी यादव हे मुरब्बी राजकारणी नाहीत ते फक्त तीसीतच आहेत. त्यामुळे त्याचं वय आणि राजकीय अनुभव पाहता ते खुप छोटे पडतात, असं असतांना त्यांनी या वेळची निवडणुक प्रचंड गाजवली आहे. एकीकडे भाजपाच्या वतीने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रातील मंत्री, इतर राज्यातील मुख्यमंत्री व काही बडे नेते हे बिहारमध्ये डेरेदाखल होते. भाजपाकडे सत्ता असल्याने भाजपाने कुठल्याही परस्थितीत बिहार आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मोठा ‘जोर’ लावला होता. तेजस्वी यांच्या वतीने प्रचारात भाग घेणारं आणि पुढाकार घेणारं दुसरं कुणीचं नव्हतं. लालू प्रसाद जेलमध्ये असल्यामुळे सगळा भार तेजस्वी यांच्यावरच होता. समोर भाजपाचं आणि नितीशकुमार यांचं तगड आव्हान असतांना त्यांनी चांगलीच बाजी मारली. एकटयाच्या स्वबळावर त्यांनी ७५ जागा मिळवल्या आहेत. भाजपाला मागे टाकून तेजस्वी पुढे आले, त्यांचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. तेजस्वी यांच्या कामगिरीचं देशातील अनेक बड्या नेत्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे. आज तेजस्वी यादव हारले असले तरी खरा विजय त्यांचाच मानावा लागेल, तेच खरे ‘बाजीगर’ आहेत!

Most Popular

मोठी बातमी – मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद : ऑनलाईन रिपोर्टर  मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग...

एकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू

बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ऍपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने...

सुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार

पुणे (रिपोर्टर)- भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय...

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...