Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडशेतकर्‍यांना काठी मारता अन् वाळु माफियांना लाल पायघड्या घालता ठाकरे सरकार विरोधात...

शेतकर्‍यांना काठी मारता अन् वाळु माफियांना लाल पायघड्या घालता ठाकरे सरकार विरोधात फडणवीसांच्या नेतृत्वात लवकरच एल्गार; भाजपाचे आशिष शेलार आक्रमक


गेवराईतल्या शेतकरी मारहाण प्रकरणावरून संताप, दोषी पोलिसांसह अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी
भागवत जाधव । गेवराई
वैध वेळेत वैध मर्यादेत शेतकरी जर बी-बियाणे खरेदीला गेला तर त्याला बेदम मारहाण पण अवैधरित्या वाळु काढणार्‍यांना लाल पायघडया टाकता. या सरकारचं हित शेतकर्‍यांना जगवण्यात आहे की, अवैधरित्या वाळु तस्करी करणार्‍या गुन्हेगारांबरोबर आहे. हे सरकार गुन्हेगारांना संरक्षण देणारं आहे. या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात एल्गार करेल, असा इशारा भाजपाचे आशिष शेलार यांनी दिला.

ते गेवराई तालुक्यातील किनगाव येथे पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकर्‍यांची भेट घेण्यासाठी आले होते. या वेळी त्यांच्या सोबत आ. लक्ष्मण पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, सभापती दीपक सुरवसे, सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, अरुण चाळक, भगवान हुंबर्डे, राहुल खंडागळे, भारत गायकवाड, प्रशांत राख, प्रा.येळापुरे, संजय आंदळे, लक्ष्मण चव्हाण, तात्यासाहेब चाळक यांच्यासह आदी उपस्थित होते. या वेळी आशिष शेलार यांनी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याला झालेली मारहाण अतिशय निंदनीय असल्याचे सांगत या प्रकरणी विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस हे गंभीर असून त्यांनी रात्री दीड वाजता मला फोन करून या विषयावर थेट शेतकर्‍याची भेट घ्यायचा आदेश दिला. त्यानंतर तातडीने गेवराई या ठिकाणी आल्याचे सांगितले. शेतकर्‍याला झालेली मारहाण ही अतिशय गंभीर आणि निंदनीय बाब आहे. तुम्ही घाबरू नका, तुम्ही एकटे नाहीत, भारतीय जनता पक्ष तुमच्या पाठिशी आहे, असे म्हणत पोलिसांकडून मारहाण झालेल्या शेतकरी मोतीराम चाळक व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दोषी अधिकार्‍यांसह, पोलिसांवर कठोर कारवाई करण्यास त्यांना भाग पाडू. गेल्या दोन दिवसांपुर्वी मोतीराम चाळक हे शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी लॉकडाऊनच्या शिथिल वेळेत गेवराईत आले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण झाली होती. या प्रकरणी आ. लक्ष्मण पवार यांनी लक्ष घालत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजपाचे आशिष शेलार हे गेवराईत आले आणि त्यांनी शेतकर्‍याची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. या वेळी शेलार यांनी सरकारच्या निगरगट्ट कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले.


गोरगरिबांवर अन्याय होऊ देणार नाही -आ.पवार

गेवराई तालुक्णयातलं प्रशासन हे गुंड, मवाली, माफियागिरींसोबत आहे. विहित वेळेत शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी घराबाहेर पडला म्हणून त्यास पोलिसांकडून बेदम मारहाण झाली, परंतु दिवसाढवळ्या लॉकडाऊन काळात सर्रासपणे वाळु घाटावर अवैध वाळु उपसा होतो, वाळु वाहतूक करणारे वाहन पोलिसां समक्ष, प्रशासन समक्ष रोज जातात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु आता पोलीस अथवा प्रशासनाचा गोरगरिबांवरील अन्याय खपवून घेणार नाही, असे म्हणत आ. पवारांनी स्थानिक प्रशासनासह शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांच्या या भूमिकेला थेट मुंबईतून राज्य भाजपाचाही पाठिंबा असल्याचे आशिष शेलार यांच्या भेटीवरून दिसून आले.


मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकार
उदासीन ; भाजपची भूमिका सकारात्मक

या सरकारने दोन वर्षात एकही आयोग निर्मिती केली नाही त्यामुळे एकही निर्णय लागत नसून फक्त तारीख पे तारीख सुरू असून यातून राज्य सारकरचा नाकर्तेपणा दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला अरक्षन मिळाव यासाठी एससीबीसी अंतर्गत 16 टक्के आरक्षण दिलं होतं त्याच आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा झाला होता. परंतु या आघाडी सरकारला इंदिरा साहनी जजमेंटचा आधार घेऊन योग्य भूमिका न्यायालयासमोर मांडता आली नसल्याने त्याचा संदर्भ न्यायालयाने नाकारल्याने हे आरक्षण रद्द झाले. त्यामुळे आघाडी सरकार हे मराठा अरक्षणसाठी सकारात्मक नसल्याचा आरोप त्यांनी केला व मराठा आरक्षणासाठी भाजपची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!