Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडखबरदार मोर्चाकर्‍यांना रोखाल तर.... मोर्चा तर निघणारच, घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू...

खबरदार मोर्चाकर्‍यांना रोखाल तर…. मोर्चा तर निघणारच, घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा-आ.मेटे


बीड (रिपोर्टर) आरक्षणाचा हा लढा समाजातील गोरगरिबांच्या शिक्षणातील सवलतीचा आहे. नौकरीसाठीच्या आरक्षणासाठी आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हा आवाज आहे, परंतू काही लोक अफवा पसरून मेटे आमदारकीसाठी मोर्चा काढत असल्याचे सांगत आहेत. मला आमदारकीसाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न वेठीस धरण्याची गरज नाही. मेटेंनी मराठा समाजासाठी आतापर्यंत जेवढे काम केले आहे त्याचे आशिर्वाद म्हणून मला कायमस्वरूपी आमदारकी मिळणारच आहे. त्यामुळे हा प्रश्न कुठल्या एका व्यक्तीचा नसून समाजाचा आहे. आणि या प्रश्नावर तुम्ही सर्वांनी एकत्रीत यायचं आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. असे आवाहन करत आ.विनायक मेटेंनी उद्याच्या मोर्चात प्रशासनाने अडवाअडवी केली तर आमच्याशी गाठ आहे असा इशाराही दिला.
ते बीड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास बोलत होते. यावेळी आ.मेटेंसोबत नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आ.मेटे पुढे म्हणाले की, मराठा मोर्चासाठी गेल्या आठवडभरात आयोजीत केलेल्या वेगवेगळ्या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळाला. मराठा आरक्षणाचा पहिला लढा ज्यांनी उभारला ते स्व.अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे देखील नियोजनाच्या बैठका घेत आहेत. ज्यांचे बीड जिल्ह्यासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी काडीचे योगदान नाही त्यांनी या मोर्चाला विरोध करण्याचे काम सुरू ठेवले आहे. ही त्यांची सुडबुध्दी आहे, आकस आहे. खासकरून काँग्रेस पक्ष इथे कुणालाही पाठवत असून त्यांनी केविलवाणा विरोध सुरू केला आहे. ज्यांनी मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण नाकारण्याचा प्रयत्न केला त्यांनी पहिली हत्या अण्णासाहेब पाटील यांची घडवून आणली. त्यानंतर अनेकांनी या लढ्यासाठी आपले बलिदान दिले. या सगळ्यांच्याच हत्या काँग्रेसने घडवून आणल्या. असा गंभीर आरोप करत काँग्रेसने आता मराठा आरक्षणाचा विरोध सोडावा. चिंता चपाटयांना पुढे करून अशोक चव्हाण या मोर्चाला विरोध करत आहेत. माझे खुले आव्हान आहे समोरासमोर येवून खुला विरोध करा. मराठा आरक्षणात काय आणि कोणाचे कुठे चुकले याची समोरासमोर येवून चर्चा करा. मी त्यांच्या सगळ्या चुका सांगतो मात्र आता मराठा आरक्षण न मिळाल्याचे पाप झाकण्यासाठी ते अशा कुणालाही पुढे करून बीडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. अशी नाव न घेता काँग्रेस प्रवक्ते डॉ.लाखे पाटील यांच्यावर टिका केली. माझी समाजातील सर्व घटकांना विनंती आहे उद्याच्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. मोर्चाकर्‍यांना प्रशासनाने अडवाअडवी करू नये आम्ही प्रशासनासोबत सहकार्‍याची भुमिका घेत आहोत. कोरोनामुळे मोर्चाकर्‍यांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स बाबत खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे कोणीही मराठा समाजाच्या भावनेशी खेळ करू नका. कोणी जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या लढ्यात आम्हाला आडवे येत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे गाठ आमच्याशी आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मराठ्यांना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकारचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचे पुर्नउच्चार त्यांनी यावेळी करून हा मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नसून अखंड मराठा समाजाचा आहे. 

Most Popular

error: Content is protected !!