Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडआरक्षण लॉक,मराठा अनलॉक! बीडच्या मोर्चाने सरकारच्या उरात धडकी

आरक्षण लॉक,मराठा अनलॉक! बीडच्या मोर्चाने सरकारच्या उरात धडकी


आरक्षणासाठी लॉकडाऊनमध्ये
बीडचा पहिला मोर्चा
शिवसंग्रामचे सर्वासर्वे आ.विनायक मेटे,नरेंद्र पाटलांनी केले नेतृत्वं
मराठा क्रांती संघर्ष मोर्चाने
राज्यात पाडली ठिणगी
मोर्चासाठी प्रचंड पोलीस
बंदोबस्त; जिल्हाभरातून
हजारो मराठे एकवटले
मोर्चाकर्‍यांसाठी
अनेकांनी केली पिण्याच्या
पाण्याची व्यवस्था

बीड | रिपोर्टर
राज्यात मराठ्यांचं आरक्षण लॉक केल्यानंतर बीड जिल्ह्यातला मराठा अनलॉक होत आज रस्त्यावर उतरला. शिवसंग्रामचे सर्वासर्वे तथा आ.विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो मराठ्यांचा मोर्चा जावून धडकला. या मोर्चात एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांसह ठाकरे सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी होत होती. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा निघाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर मोर्चाचे मोठे स्वरूप दिसून आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये पहिला मोर्चा आज बीडमध्ये निघाला आहे. मोर्चात घोषणाबाजी होत असतांनाच शिस्तही पहावयास मिळत होती.


राज्य सरकारने न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले असा अक्षेप घेत शिवसंग्रामचे सर्वासर्वे आ.विनायक मेटेंनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा या नावाने जिल्ह्यातील मराठ्यांना मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. गेल्या ८ दिवसापासून जिल्हाभरात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या बैठका झाल्या. बीड जिल्हा लॉकडाऊन असतांना जिल्ह्यातला मराठा आरक्षणासाठी आज अनलॉक होत रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. सकाळी ११ वाजता श्रीमंतयोगी छत्रपती
शिवाजी महाराज क्रीडांगणावर जिल्हाभरातील मराठा एकवटत होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास स्टेडियमपासून हा मोर्चा आण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवून धडकला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. मराठ्यांच्या घोषणांनी शहर दुमदुमन गेले होते. आरक्षणाची बाजू नीट न मांडल्याने ठाकरे सरकार विरोधात मोर्चाकर्‍यांचा संताप अधिक दिसून येत होता. सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर मोर्चेकर्‍यांनी महाराजांचा जयघोष केला. मोर्चामध्ये पहिल्या लाईनमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे कापडी फलक महिलांनी हाती घेतले होते. मोर्चात महिलांची संख्याही होती. सदरचा मोर्चा हा नंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकला. लॉकडाऊन असलेल्या महाराष्ट्रात मराठ्यांचा पहिला मोर्चा आ.मेटे, नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात निघाल्याने पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलनाची ठिणगी बीडमध्ये पडली असून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राज्यातला मराठा स्वस्त बसणार नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यातून व्यक्त होतांना दिसून येत होती. मोर्चात घोषणाबाजी होत असली तरी शिस्त पाहवयास मिळाली. लॉकडाऊन असल्यामुळे उपस्थित मोर्चाकर्‍यांना पिण्याच्या पाण्याची सोय ठिकठिकाणी करण्यात आल्याचेही दिसून आले.

Most Popular

error: Content is protected !!