Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठवाडामराठवाड्यात भाजपातला अंतर्गत वाद उफाळला, पोकळेंच्या बंडानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपा सदस्यत्वाचा...

मराठवाड्यात भाजपातला अंतर्गत वाद उफाळला, पोकळेंच्या बंडानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा

औरंगाबाद/बीड (रिपोर्टर)- पदवीधर निवडणूक भाजपासाठी मराठवाड्यात डोकेदुखी ठरत असून उमेदवारीवरून भाजपात पसरलेला असंतोष अद्यापही शांत होताना दिसून येत नाही. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक रमेश पोकळेंच्या बंडखोरीनंतर भाजपाला मराठवाड्यात आज जबरदस्त धक्का देण्यात आला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आज भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता मराठवाड्यातही भाजपाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

महाराष्ट्र भाजपात गटा-तटाचे राजकारण आता उफळून येताना दिसून येऊ लागले असून पदवीधर निवडणुकीमध्ये मराठवाड्यात अंतर्गत वाद थेट चव्हाट्यावर येऊन पोहचले आहेत. औरंगाबाद पदविधर मतदारसंघासाठी भाजपाच्या गटातटांनी आपआपले वर्चस्व सिद्ध करून उमेदवारी समर्थकांना देण्याचे प्रयत्न केले मात्र मराठवाड्यातील नेतृत्वाला उमेदवारी देण्यात यश आले नाही आणि इथेच हा वाद उफाळल्याचे दिसून येते. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक तथा बीड जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष रमेश पोकळे यांनी या निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते भाजपातून बाहेर पडले आहेत.
संघाच्या मुशीतून घडलेले जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भाजपमध्ये कार्यरत होते. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी काम केले होते. बीड लोकसभा मतदारसंघातून ते तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातूनही त्यांनी दोनदा बाजी मारली होती. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद भूषवले होते. तसंच, केंद्रात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. सध्या ते भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मात्र ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते.यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार म्हणून ते निवडूनही आले होते. मात्र, त्यानंतर ते पुन्हा स्वगृही परतले होते. ’पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. काम दिलं जात नाही,’ असा आरोप त्यांनी केला आहे. त्या नाराजीतूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मराठवाडा विभागातून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज दुपारी ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी बाहेर पडतील, असं बोललं जात होतं. जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्याकडं त्याचाच एक भाग म्हणून पाहिलं जात आहे. गायकवाड हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार की इतर कुठल्या पक्षाची निवड करणार याबाबत आता उत्सुकता आहे.

Most Popular

error: Content is protected !!