Friday, October 22, 2021
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- आजच ओळखा पुढचा धोका जमीन, पाणी, झाडे वाचवा

प्रखर- आजच ओळखा पुढचा धोका जमीन, पाणी, झाडे वाचवा

पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे, इथं सर्व प्रकारचे जीव, जंतु, प्राणी, झाडासह आदि आहेत, माणुस जेव्हा पासून बुध्दीचा वापर करु लागला. तेव्हा पासून विकासाला आणि विचाराला सुरुवात झाली. पुरातन काळातील माणुस आणि आजचा माणुस यात खुपच फरक आहे. पुरातन काळातील माणुस हा स्वार्थी, अप्पलपोटी आणि निसर्गाची लुट करणारा नव्हता. दिवसभरात जितकं मिळेल तितकं अन्न तो शोधून आणत होता आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा अन्नाच्या शोधात जंगलात भटकत होता. अशा पध्दतीचा जीवनप्रवास माणसाने हजारो वर्ष केला. माणुस जेव्हा गाव, नगर स्थापन करु लागला. तेव्हा पासून माणसाच्या विकासात बदल होत गेले. औद्योगीकरण जो पर्यंत नव्हतं तो पर्यंत चांगल्या परस्थितीत होता. निसर्गाला कसला ही धोका नव्हता. निसर्गाच्या साथीने माणुस जगत होता. माणुस हा पुर्णंता निसर्गावर अवलूंन आहे. १५ व्या शतकापासून युरोप खंडात यांत्रीकीरणाचा शोध लागू लागला, माणसाने बुध्दीच्या जोरावर विकासात मजल मारणं सुरु केली. १५ व्या शतकातील माणसाने कधीच विचार केला नव्हता की, पुढचं जग कसं असेल? पायी चालणारा, प्रवासासाठी घोडा,बैल गाडीचा वापर करणार्‍या माणसाच्या डोक्यात कधीच आजचा सारख्या वाहनांची रेलचेल आली नसेल, तसं त्याने स्वप्नही बघितलं नव्हतं. १९१८ व्या शतकापासून खर्‍या आर्थाने विज्ञानाची सुरुवात झाली. १९०० व्या शतकानं माणसचं जगणंच सोपं करुन टाकलं. एक-एक पाऊल टाकावं त्या प्रमाणे माणुस विकासाची प्रगती करत करत आला. विकास म्हणजे माणसाच्या भोवती असलेलं भौतीक सुख, या सुखालाच विकास म्हटलं जातं. कुठं जायचं असेल तर वाहनांचा वापर केला जातो. या देशातून त्या देशात काही तासात पोहचता येतं. पुर्वी कोण कुठं होतं, आणि कोणता देश कोणत्या कोपर्‍यात होता याची माहिती नव्हती, आज जगाच्या कोणत्या कान्या कोपर्‍यात काय घडलयं याची माहिती काही मिनिटात समजत आहे. आजचा विकास म्हणजे ही विज्ञानाची देण आहे, तीच विज्ञानाची देण शाप ही ठरु लागली.

#जंगलाची तोड पृथ्वीतलावर माणुस हा बुध्दीवादी आहे. इतर प्राण्यांना मेंदु असला तरी त्यात माणसासारखी आकलन शक्ती नाही. माणसाने बुध्दीच्या जोरावर काय काय शोध लावले नाहीत? स्वत:च्या सुरक्षेसाठी जंगलात भटकणारा माणुस दगडाचे किंवा लाकडाचे हत्यारे तयार करत होता. त्याच हत्याराने तो शिकार करत होता. आज प्रत्येक देशात शस्त्राचा मोठा साठा आहे. काही देशाकडे महाभयंकर अस्त्र आहेत. अणुबॉम्ब सारखे महाविनाशकारी अस्त्र माणसाने तयार केले. याचा वापर कुठे केला तर त्या ठिकाणी कित्येक वर्ष साधं गवत येत नाही, इतकी भीषण तीव्रता अणुबॉम्बची आहे. शंभर वेळा पृथ्वी नष्ट करता येईल इतके आणुबॉब जगातील देशाकडे आहेत, इतर ही घातक शस्त्र माणसाने स्वत:च्या सुरक्षेसाठी बनले पण हे शस्त्र माणसांसाठी आणि पृथ्वीसाठी विनाशक ठरू लागले. जंगल हा पृथ्वीचा आत्मा आहे. जंगल नसेल तर पृथ्वीचं अस्तित्व नष्ट झाल्यासारखंच आहे. झाडापासून अनेक वस्तू बनल्या जातात. लाकडाचा वापर कित्येक ठिकाणी केला जातो. लाकडं लागतात म्हणुन सर्रासपणे जंगलाची तोड होवू लागली. पुर्वी जे जंगल होते, ते आज राहिले नाही. कुरण राखीव ठेवले जात होते, ते आता इतिहास जमा होवू लागलेे. झाडे तोडू नका असं प्रशासन आणि शासन सांगत असलं तरी त्याची अंमलबजावणी कोण करतयं? जे महामार्ग बनवण्यात आले, त्यासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात आली. झाडे तोडल्यानंतर दुसरी नवीन झाडं लावण्यात येत नाहीत. मोठ – मोठे झाडं तोडल्यानंतर नवीन झाडे लावले तरी ते मोठे होण्यास वीस ते तीस वर्षाचा कार्यकाळ जावा लागतो. विकासाच्या नावाखाली जंगलाची तोड केली जाते. जंगलातून खजीनाचा साठा उपसला जातो. हजारो वर्षापासून पृथ्वीच्या पोटात असलेले खजीनं माणसाने यंत्राच्या सहाय्याने बाहेर काढले. ज्या ठिकाणी खनीजसाठा शोधण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्या परिसराची चाळणी झाली. अशा पध्दतीने जमीनीची हानी होणं हे काही चांगलं लक्षण नाही.

#दुषीत वातावरण उद्योग व्यवसाय वाढले. शहराच्या िंंठकाणी माणसांचा जीव गुदमरुन लागला. जगातील काही असे शहरे आहेत. त्याठिकाणी राहणं माणसांना धोकादायक ठरु लागलं. देशातील दिल्लीची हवा नेहमीच दुषीत होत असते. या दुषीत हवेचा माणसावर परिणाम होवून माणसांना विविध आजार जडू लागले. देशात काही शहरे आहेत. त्या शहरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढती लोकसंख्या पाहता. त्या शहराचं भवितव्य अंधारात सापडू लागलं. पाण्याचा प्रश्‍न, चांगली हवा मिळत नाही. शोैचालयाचा प्रश्‍न आणि आरोग्याचा प्रश्‍न यासह अन्य प्रश्‍न निर्माण होवू लागले. गुहेत राहणारा माणुस कित्येक मजली असलेल्या इमारतीत राहू लागला. त्याचा परिणाम जमीनीवर होवू लागला. चांगली जमीन प्लॉटींगमध्ये जावू लागली. शहरात फक्त सिमेंटचं जंगल दिसू लागलं. शहरं राक्षसासारखे वाढू लागले. विजेचे प्रकल्प सुरु करण्यात आल्याने याचा परिणाम माणसासह जमीनीवर होवू लागला. ज्या ठिकाणी कोळशापासून विज तयार केली जाते. त्या प्रकल्पाच्या परिसरातील अवस्था भीषण जाणवते. एकतर राखेमुळे काही किलोमीटरचा परिसर दुषीत होवून जातो. राखेने माणसांना श्‍वसनाचे आजार जडू लागले. वीज वापरासाठी चांगली वाटत असली तरी त्याचे धोके किती भयंकर असतात याचा विचार केला जात नाही. रुग्णालयात वापरलेल्या वस्तू नंतर फेकून दिल्या जातात. त्याचा कचरा तितकाच पृथ्वीच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे माती दुषीत होते, प्लॉस्टीक हा प्रकार फारच घातक आहे. प्लॉस्टीकची वस्तू लवकर झिजत नाही. तज्ञाच्या मते प्लॉस्टीक झिजण्यासाठी शंभर वर्षाचा कार्यकाळ लागतो. घातक प्लास्टीक आज सर्रासपणे वापरलं जातं. माणसाच्या जीवनाचा तो एक घटकच होवून बसला आहे. प्लॅास्टकीवर बंदी आणली तरी त्याचा वापर करणं कुणी टाळत नाही. कशाचा वापर करावा आणि कशाचा वापर करु नये हे प्रत्येक माणसांवर अवलूंबन आहे. माणुस चांगल्या गोष्टीचं अनुकरण लवकर करत नाही, पण वाईट गोष्ट तात्काळ अनुकरीत करुन स्वत:चसह निसर्गाचे नुकसान करत आहे.

#नद्याची काय अवस्था झाली? पाणी स्वच्छ असेल तर माणसाचं जीवन चांगलं राहतं. कारखानदारीमुळे पाण्यात दुषीतपणा वाढला. कारखान्याच्या खराब पाण्यामुळे कित्येक शेतकर्‍यांच्या जमीनीतील सुपीकपणा नष्ट झाला. दुषीत पाणी जमीनीत मुरत असल्याने त्याचा परिणाम बोअर आणि विहीर व तलावाच्या पाण्यावर होवू लागला. शहरातल्या गटारीचे पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीचं पावित्र्य नष्ट होवू लागलं. दुषीत पाण्याने विविध आजार जडू लागले. पुर्वी नदीत साधा झिरा खोदला तरी त्याला पाणी लागत होतं. आज तीनशे फुट खोल बोअर घेतला तरी पाणी लागत नाही. पाण्याच्या उपशाचं नियोजन राहिलंन नाही. फुटा-फुटावर बोअर खोदले जातात. वाळूच्या अतिरिक्त उपशामुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आलं. वाढत्या कुटूंबामुळे जमिनीचे तुकडे पडले. जमिनीत बांध दिसेना. बांधावर पुर्वी अनेक प्रकारचे झाडे असायची, आज बांधच राहिले नाही तर झाडे कुठून दिसणार? झाडे कमी झाले, तसे पक्षीही कमी झाले. पक्षासोबत अनेक जीवजंतु नष्ट झाले आणि आज ही होत आहेत. शेतात जास्तीचे उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खताचा अतिरिक्त वापर होवू लागला. किटकनाशकांची अतिरिक्त फवारणी होवू लागली. त्याचा परिणाम भाज्यात विषारी अंश सापडू लागले. पंजाब, हरियाणा सारख्या राज्यातील काही जिल्हयात कॅन्सरचे रुग्ण माोठ्या प्रमाणात आढळून येत आहे हे अतिरिक्त खत आणि औषधामुळे होत असल्याचे समोर आले. दरवर्षी देशातील कित्येक हेक्टर जमीन नापीक होवू लागली. जमिनीतील नैसर्गीकपणा कमी होवू लागला. सततचा दुष्काळ आणि अतिरिक्त पाऊस हे बदलत्या हवामानाचा परिणाम आहे.

#पुढे धोका आहे आजचा माणुस भौतीक सुखात दंग झाला, त्याला आपल्या आजुबाजुला काय होतयं याचं भान राहिलं नाही. आज आपलं भागतयं, उद्याचं कोणाला काय पडलयं, असा अप्पलपोटी विचार करणारा माणुस आहे. पर्यावरणाची काळजी घेणारी काही बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत. ज्यांना झाडांची, नद्यांची, जमिनीची चिंता पडली. त्यासाठी ते रात्र-दिवस काम करतात. पर्यावरणाला वाचवण्यासाठी त्यांची प्रचंड धडपड असते. पर्यावरणाचं रक्षण करण्यात पर्यावरणप्रेमी आपलं आयुष्य खर्च करत असतात. मात्र अशा लोकांना जनतेची साथ मिळत नाही. १९७२ पासून पर्यावरणाची जनजागृती होवू लागली, ही जनजागृती जागतीक पातळीवर होत आहे. तरी ही प्रगत राष्ट्रात प्रदुषण कमी झालेलं नाही. जे पर्यावरणाचा विचार करतात त्यांना वेड्यात काढलं जातं. भारतात झाडांची संख्या जिल्हा निहाय दीड ते दोन टक्कया पर्यत आहे. राज्यात दरवर्षी झाडे लावण्याची मोहिम हाती घेतली जाते. झाडे लावण्यावर करोडो खर्च करण्यात आले, हे पैसे पुर्णंता पाण्यात गेले. पाऊस पडला की, झाडांची आठवण होते, एकदा लावलेलं झाडं जगलं की, वाचलं याचा विचार झाडं लावणारा कधी करत नाही, त्यामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. कोरोनामुळे कित्येक लोकांचा ऑक्सीजन कमी झाला होता. अनेकांचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला. ऑक्सीजनचे प्लंाट उभे करावे लागले. ऑक्सीजन किती गरजेचं आहे, याची जाण आज लोकांना झाली. यातून लोक बोध घेतील की नाही माहित नाही. निसर्गाच्या बिघडत्या परस्थितीमुळे माणसांना विविध आजार जडू लागले. कोरोना हा त्यातलाच प्रकार मानला जातो. कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. माणुस कोरोनापुढे हातबल झाला. विज्ञानाने त्याच्या पुढे गुडघे टेकले. निसर्गाने माणसांना भरभरुन दिलं, पण त्याचा वापर कसा करायचा याचं नियोजन माणसाकडे नाही. निसर्गाला तोफेला देवून प्रगती काय कामाची? आज पृथ्वी तलावरील माणुस विनाशाच्या उंबरठयावर उभा आहे. निसर्गाची जी आज पर्यंत हानी झाली ती भरुन निघणं शक्य नाही. जमीन, पाणी, झाडे वाचवण्यासाठी चळवळी उभ्या राहिल्या पाहिजे. पुढचे धोके ओळखले पाहिजे, येथून पुढे तरी निसर्गावर अत्याचार होणार नाही याची काळजी माणसांनी घेतली तर ठीक नाही तर विनाश अटळ आहे.

Most Popular

error: Content is protected !!