Monday, June 14, 2021
No menu items!
Homeक्राईमजिल्हाधिकारी साहेब, समिती काय बसवता, देवस्थानाच्या जमिनीत हा सुर्य हा जयद्रत दाखवला...

जिल्हाधिकारी साहेब, समिती काय बसवता, देवस्थानाच्या जमिनीत हा सुर्य हा जयद्रत दाखवला आता दोषींवर गुन्हे दाखल करा


बीड (रिपोर्टर):- बीड शहरासह जिल्हाभरातील हिंदू-मुस्लिम देवस्थानाच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर डल्ला मारत भूसंपादन अधिकार्‍यांच्या संगनमताने अनेकांनी जमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचे उघड झाल्यानंतर अनेक ठिकाणचे फेर रद्द करण्यात आले, परंतु हे फेर ओढण्यासाठी मदत करणार्‍या भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्‍यांवर अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीत. या अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. जिल्हाधिकारी साहेब, या विषयी समिती काय नेमता हा सुर्य आणि हा जयद्रत तुम्हाला दिसून आला आहे. भूसंपादनामधील भ्रष्ट अधिकार्‍यांच्या पापाचा घडा भरला आहे. मग आता त्यांना जेलची हवा खाऊ घालायची सोडून समिती स्थापण्याच्या नावाखाली मेवा का देता, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.


बीड शहरासह जिल्ह्यातील अनेक देवस्थानाच्या जमिनीवर भूसंपादन अधिकार्‍यांच्या संगनमताने अनेक मातब्बरांनी डल्ले मारले आहेत. वक्फ बोर्डासह राम मंदिर व इतर मंदिरांच्या जमीनीवर भूमाफियांनी कब्जे करून ठेवले आहेत आणि हे कब्जे अधिकृत करण्याचे काम भ्रष्ट अधिकार्‍यांनी केल्याचे उघड झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सायं. दैनिक बीड रिपोर्टर अशा भूमाफियांसह भ्रष्ट अधिकार्‍यांचे कारनामे समोर आणत आहे आणि हे कारनामे सत्य असल्याचे निदर्शनासही आले आहे त्यामुळेच अनेक फेर रद्द करण्यात आले आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खालसे रद्दबातल ठरवण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही अभिनंदनास पात्र आहे परंतु या जमिनी भूमाफियांच्या घशात घालणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांवर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. ज्या भ्रष्ट अधिकार्‍यांना आतापर्यंत जेलमध्ये असायला हवे होते ते अद्यापही मोकाट असून या भ्रष्ट प्रकरणातून आपण बाहेर कसे निघू यासाठी ते प्रयत्न करत आहेत. जर जमिनीचे फेर रद्द करण्यात आले, खालसे रद्द करण्यात आले म्हणजे ते फेर अवैध पद्धतीने ओढल्या गेल्याचे स्पष्ट जाले मग आता या प्रकरणातील दोषींवर जिल्हा प्रशासन कारवाई का करत नाही? गुन्हे का दाखल करत नाहीत? चौकशी समितीचा फार्स कशासांठी? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप साहेब, देवस्थानाच्या जमीनी हडपणार्‍यांविरोधात कठोर पावले उचलत चौकशी समितीचा फार्स न ठेवता दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी वेगवेगळ्या देवस्थानाच्या भक्तातून करण्यात येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!