Friday, May 20, 2022
No menu items!
HomeUncategorizedअग्रलेख-‘खेळ मांडियला महाराष्ट्र ठाई’

अग्रलेख-‘खेळ मांडियला महाराष्ट्र ठाई’


गणेश सावंत
मो. नं. 9422742810

‘पंढरीची वारी आहे, माझे घरी, अनिक न करी तीर्थ व्रत’ या अभंगाचे स्मरण करून गतवर्षी अखंड महाराष्ट्रातल्या वारकर्‍यांनी, विठ्ठल भक्तांनी आषाढी वारी घरूनच साजरी केली. जो वारकरी ‘भले तरी देव कासेची लंगोटी’ अशी वज्रमुठ बांधतो त्या वारकरी संप्रदायाने सामाजिक भान राखत संपदा सोहळा ना आवडे मनाला… अशी भूमिका गेल्यावर्षी घेतली ती केवळ आणि केवळ कोरोनाला समुळ हद्दपार करण्याइरादे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जेवढा विध्वंस् झाला नाही तेवढा विध्वंस् कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रात झाला. मग तो जिवितही तेवढाच होता आणि आर्थिकही तेवढाच होता. विठ्ठलाच्या नामस्मरणाने आणि माणुसकीच्या कर्तबगारीने पहिली आणि दुसरी कोरोनाची दुसरी कोरोनाची लाट परतवण्यात तुम्हा-आम्हाला कमालीचे यश आले ते केवळ सामाजिक भान राखल्यामुळेच यंदाही आषाढी वारीवर कोरोनाचे सावट आहे. प्रशासन आणि शासन कोरोनाच्या अनुषंगाने पायी वारीला परवानगी देत नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा वारकर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक जाणीवपुर्वक वारी ही झालीच पाहिजे, या भूमिकेत सध्या दिसून येत आहेत. विठ्ठल नामाचा गजर हा महाराष्ट्राच्या तना-मनात, सह्याद्रीच्या नसा-नसात आणि डोंगरदर्‍यांच्या गवतागवतात आहे. विठ्ठलाची भेट व्हावी हे प्रत्येकालाच वाटते. कारण हा महाराष्ट्राचा आणि अखंड ब्राह्मंडाचा देव आहे. जगद्गुरू संत तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर
पंढरीची वारी आहे, माझ्या घरी ।
अनिक न करी तीर्थ व्रत ॥
व्रत एकादशी करीन उपवाशी ।
गायिन अहनिशी मुखी नाव॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे ।
बीज कन्यातीचे तुका म्हणे ॥


पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थचे माहेर. पंढरीची वारी केचली की इतर कुठलेही तीर्थ करण्याची आवश्यकता नाही. हे त्रिवार सत्य आहे म्हणूनच दार बंद केचलेल्या विठ्ठलाला आमची संत जना ‘अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या’ म्हणत हक्काने आणि हट्टाने शिव्या देते आणि विठ्ठलही तो ऐकतो. म्हणजेच महाराष्ट्राच्या वारकर्‍यांचे आणि विठ्ठलाचे हे नाते विश्वानी विश्वाचे आहे, दृढ आहे. प्रत्येकाच्या हृदयात विठ्ठलाचे स्थान आहे. म्हणूनच ‘खेळ मांडियला वाळवंटी ठायी, नाचती वैष्णव भाई रे’ म्हणत प्रत्येक जण माऊली म्हणत एकमेकांचे पायी पडतो. ही समज, ही दृढता, जागरुकता, सामाजिक भान हे फक्त वारकर्‍यातच आहे आणि याच सामाजिक भानात आणि वारीच्या आलोट सागरात


हट्टाचं विष का
कालवलं जातय?

कोरोना महामागारीने जगाला हादरून सोडलं आहे. दारबंद केल्यानंतरच कोरोनाची विषवल्ली नेस्तनाबूत होते हे सर्वश्रूत असताना आणि कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कित्येकांचा मृत्यू झाल्याचे पाहितल्यानंतरही, तिसर्‍या लाटेचे संकेत मिळत असताना देखील पंढरपूरची आषाढी वारी झालीच पाहिजे, हा अट्टाहास भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय. तो वारकर्‍यांच्या भक्तीसाठी आहे की, वारीत सहभागी झालेल्या निष्पाप वारकर्‍यांच्या आरोग्याशी खेळण्यासाठी आहे. ईश्वर हा चरा चरात आहे, साक्षात पांडुरंगही प्रत्येकाच्या मना-मनात आहे. तु माझ्या जवळ नाही, मी तुझ्या जवळ आहे ही ईश्वराची भूमिका आहे. फक्त तू माणसासारखं वाग, माणूस म्हणून जग हीच अट भवंताची आहे ना मग आमचा वारकरी साक्षात विठ्ठलाचे रूप घेऊन संयमाने वागत आहे आणि त्या संयमाला राजकीय बोट वारकर्‍यांच्या भगव्या पताकेला पक्षीय पताका करण्याचा हेतु निष्पाप वारकर्‍यांच्या भावनेशी खेळणारा आहे. आपण गेल्या सहा महिन्यांपुर्वी उत्तराखंडमध्ये अनुभवलं. कुंभमेळ्याला भारत सरकार आणि उत्तराखंड सरकारने परवानगी दिली. पहाता पहाता कोरोनाचा वणवा त्या कुंभमेळ्यात पेटला आणि कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक भक्त त्या कोरोनाच्या वणव्यात होरपळला. तो वणवा महाराष्ट्रात पेटू द्यायचा नाही, हा प्रांजळ उद्देश प्रत्येकाचा आहे. मग या उद्देशाला हरताळ फासण्याचं काम केवळ राजकीय उद्देशातून होत असेल तर आम्ही अशा उद्देशाचे आणि हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा जाहीर निषेध करतो. होय, कोणाला नकोय विठ्ठल-रुक्माईची भेट! आणि कोण म्हणतं, विठ्ठल-रुक्माईची आणि वारकर्‍यांची भेट झाली नाही. आम्ही तर स्पष्ट आणि छातीठोकपणे सांगतो,


‘आमच्या भेटीला
विठ्ठल आला’

तो तोच होता ज्या वेळेस आमचे वृद्ध माता-पिता, तरुण भाऊ-बहीण कोरोनाच्य विळख्यात अडकले होते. रुग्णालयाच्या बेडवर पडले होते. कुणाला श्वासोश्वास घ्यायला त्रास होत होता, ऑक्सिजनचे मास्क लावले होते, साक्षात यम समोर आहे, असे त्याला दिसून येत होते आणि बेडवर पडलेला तो कोरोना रुग्ण विठ्ठलाचे नाम:स्मरण करत होता. त्या भक्ताला कोरोनामुक्त करण्याइरादे पीपीई किट घालून डॉक्टर धावत येतच होता. पीपीई किट घातलेल्या अनेक नर्सेस कुठे सलाईन देत होते तर कुठे इंजेक्शन देत होत्या. त्या रुग्णाला बरे वाटल्यानंतर त्या डॉक्टरमध्ये आणि नर्समध्ये विठ्ठल-रुक्माई दिसत होती. आला माझा विठ्ठलही भेटायला, गेल्या वर्षी माझी भेट झाली नाही, विठ्ठला तू आलाच ना! कोण म्हणतं, विठ्ठलाची आणि वारकर्‍यांची भेट झाली नाही. आठवा लॉकडाऊनचा कार्यकाळ, आपण सर्व कोरोनाच्या भीतीने घरबंद होतो तेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक पोलीस विठ्ठलाच्या स्वरुपात रस्त्यावर उभा होता. त्या स्वयंसेवकांना आठवा, त्या स्वच्छता कर्मचार्‍यांना आठवा, त्यांच्यामध्येही विठ्ठल -रुक्माईच होती. होय वारी चुकल्याने मनात हुरहुर होतेय, विठ्ठलाची भेट होत नसल्याने मनाची तडफड होतेय, ती तडफड पाहुनच या सर्व कोरोना योद्धांच्या रुपात विठ्ठलच तुमच्या भेटीला येत होता, येत आहे आणि येत राहणार. जो साक्षात ब्राह्मंडाचा जनक आहे तो कुठे रागवतो का? हा सवाल करण्याची गरज नाही, परंतु


महाराष्ट्राच्या
ठाई खेळ मांडणारे

जेव्हा विठ्ठल भक्तीचा देखावा करतात तेव्हा अशा मम्बाजींना वेदाचा अर्थ तो आम्हाशी ठावा, इतरांना भार माथा असे उत्तर द्यावेसे वाटते. कुंभमेळ्याची पुनरावृत्ती होऊ नये, महाराष्ट्राच्या वारकर्‍याला कोरोनाची लागण होऊ नये, महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची लाट येऊ नये, हा उदात्त हेतु ठेवून सरकार जर यावर्षी वारीला परवानगी देत नसेल तर याचे राजकारण विरोधकांनी करू नये. सरकारच्या विरोधात आक्रमक होणे, सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात त्यांचे कान धरने, भ्रष्ट व्रत्तीला नागवं करणे ही विरोधी पक्षाची भूमिका असायला हवी, परंतु सर्वसामान्यांच्या मढ्यावर पाय देत त्यांच्या टाळुवरचे लोणी केवळ सत्ताधार्‍यांना जाळण्यासाठी कोणी वापरत असेल तर ते विठ्ठलालाही मान्य नाही. गेल्या तीन महिन्यांचा कालखंड आठवला तर कोरोनाचा महाभयंकर स्वरुप जे लक्षात येतं ते स्वरुप कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने जेव्हा आपलं वैष्विक रुप अर्जुनाला दाखवलं तेव्हा अर्जुन ‘दुजा ऐसा नाही कोण, जो या काढीन भयातून ’ म्हणत अर्जुनाने श्रीकृष्णाला त्या रुपातून बाहेर यायला सांगितले आणि आताही ईश्वर भगवंतच शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करत मानवाने पैदा केलेल्या कोरोनाच्या वैष्विक महामारीला हद्दपार करा म्हणून सांगतं, तेव्हा त्याचं राजकारण नको. आता एवढचं कडेवर हात ठेवून विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाला


घालव पांडुरंगा
ही महामारी

अशी आर्त हाक मारणार्‍या वारकर्‍याच्या हृदयात आणि तना-मनात यंदाचीही वारी असायला हवी. गतवर्षी वारकर्‍यांनी जो संयम दाखवला तोच संयम या वर्षी दाखवून आम्ही त्या पंढरीचे वारकरी आहोत, आम्ही त्या विठ्ठलाचे भक्त आहोत ज्याने आम्हाला माणसा-माणसात माऊली दाखवली. आम्ही कोण्या राजकारण्याचे, पक्षाचे बटिक नव्हं, आमची भगवी पताका उगवतीचा सुर्य ज्या भगव्या सोनेरी किरणातून भविष्याचा वेध घेतो ती सांगणारी आहे. शेवटी पांडुरंगा
नेमाचा वारकरी
मी येतो तुझ्या दारी
घालव पांडुरंगा ही महामारी,
ज्याने चुकविली तुझ्या भक्ताची वारी.

Most Popular

error: Content is protected !!