बीड (रिपोर्टर) अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना भरीव मदत देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमणे मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघाला होता. या मोर्चामध्ये अनेक शेतकर्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह राज्यभरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपीटीने अंबा, मोसंबी, संतरा, चिंच, केळी, गहू, हरभरा, ज्वारी यासह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांची तात्काळ पाहणी करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा, शासनाने सदरील शेतकर्यांना भरीव मदत द्यावी याचबरोबर महाराष्ट्र सरकारने वाढवलेले विद्युत बील कमी करावे, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड योजना घोषीत करण्यात आली होती, त्या योजनेवर तात्काळ काम करून जिल्ह्यातील शेतकर्यांना पाणी उपलब्ध करूएन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज आम आदमी पार्टीने रुमणे मोर्चा काढला होता. या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सय्यद सादेक, भीमराव कुटे, दादासाहेब सोनवणे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची व शेतकर्यांची उपस्थिती होती.