Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeक्राईमक्राईम मिटिंगमध्ये बदल्यांचीच कुजबुज

क्राईम मिटिंगमध्ये बदल्यांचीच कुजबुज

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हा पोलीस दलातील एका निरीक्षकासह सहा पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ संपला असून ते बदलीस पात्र आहे. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्वांनाच विनंती बदलीचा अर्ज करण्याचे फरमान सोडल्याने अनेकांना इच्छा नसतानाही अर्ज करावे लागले. त्यामुळे आज झालेल्या क्राईम मिटिंगमध्ये नुसती बदल्याचीच कुजबुज सर्व ठाणे प्रमुखांमध्ये होती. अनेकांनी पाण्यात राहून माश्याशी वैर नको, असे म्हणत विनंती बदलीचा अर्ज केला आहे. त्यामुळे आता त्यांचे ठाणे जाते की काय, अशी धाकधूक वाढू लागली आहे.
पर जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या प्रत्येक एपीआय ते पीआय यांना आपण ठाणेप्रमुख असावे, असे वाटते. जिल्ह्यात २८ पोलीस ठाणे आहेत मात्र ठाणे सांभाळणार्‍या अधिकार्‍यांची संख्या ५० च्या पुढे आहे. त्यामुळे ठाणे मिळण्यासाठी आणि त्यातही चांगले ठाणे मिळावे यासाठी वरिष्ठांकडे फिल्डींग लावली जाते. सध्या बीड जिल्हा पोलीस दलात बदलीचे वारे सुसाट वाहत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सर्वांनाच विनंती बदलीचे अर्ज करण्याचे फरमान सोडले होते. त्यामुळे अनेक ठाणेप्रमुखांसह सर्वांनीच विनंती बदली अर्ज केलेले आहेत. त्यामुळे कोणत्या ठाणेप्रमुखाची कुठे बदली होते, कोणाचे ठाणे काढले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या १० ते १५ दिवसात मोठे फेरबदल जिल्हा पोलीस दलात दिसणार आहेत. आज पोलीस अधीक्षक राजारामा स्वामी यांनी क्राईम मिटिंग घेतली. मात्र या क्राईम मिटिंगमध्ये बदल्यांचीच कुजबुज ठाणेप्रमुखांमध्ये दिसून आली.

Most Popular

error: Content is protected !!