आष्टी/चौसाळा (रिपोर्टर) भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वादविवाद कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या वादग्रस्त विधानाचे पडसाद बीड जिल्ह्यातही उमटू लागले. आष्टी शहरातील मुस्लिम बांधवांनी बंदचे आवाहन केले होते. सर्व व्यापार्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्याचबरोबर चौसाळा येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता बंद पाळण्यात आला आहे.
हजरत मोहम्मद पैगंबर हे मुस्लिम धर्मियांचे प्रेरणास्थान असून भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी हजरत पैगंबर यांच्या बाबतीत एका वृत्तवाहिनीवर चर्चेच्या दरम्यान वादग्रस्त विधान केले. या विधानाचा देशातच नव्हे तर जगभरात निषेध केला जात आहे. या प्रकरणी शर्मा यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. भाजपाने शर्मा यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टीही केलेली आहे. शर्मा यांच्या या विधानाचे पडसाद बीड जिल्ह्यातही उमटू लागले आहे. आष्टी येथे मुस्लिम बांधवांनी आज बंदचे आवाहन केले होते. या बंदमध्ये सर्व व्यापार्यांनी सहभाग घेतला होता. चौसाळा येथेही बंद पाळण्यात आला.