बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्याचे सुत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या 48 तासात नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज लागलीच जिल्ह्यातील नेकनूर, केज, युसूफवडगांव, धारुर, अंबाजोगाई, परळी, बर्दापूर पोलीस ठाण्यांना अचानक भेटी देत तेथील कामकाजाची पाहणी करत यंत्रणेला काही महत्वाच्या सुचना दिल्या. सामाजिक ऐकोपा टिकवण्याबाबत गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे , अवैध धंदे शंभर टक्के बंद असणे याला महत्व देण्याचे सांगितले.
गेल्या दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्याचे सुत्र हाती घेणारे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज भल्या सकाळीच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेट देण्यासाठी बाहेर पडणे पसंत केले. सर्वात सुरूवातीला नेकनूर पोलीस ठाण्यात भेट देवून तेथील कामाची पाहणी करत पोलीसांच्या अडीअडचणीसह परिसराची माहिती घेतली. पुढे ते केज, धारुर, युसूफवडगांव, अंबाजोगाई, बर्दापूर, परळी पोलीस ठाण्याना भेटी देणार आहे. याबाबत रिपोर्टरने थेट नंदकूमार ठाकूर यंाच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या भेटीत पोलीस स्टेशनच्या कामकामाजासह जिल्ह्याची माहिती घेत आहे. जिल्ह्याची भौगोलीक, सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेणे महत्वाचे आहे असं म्हणत नूतन पोलीस अधिक्षकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून काम करण्यास सुरूवात केली आहे.