Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडनामलगाव गणपती मंदिराच्या सातबारावरून नवले, सावंत, नेहरकरांचे नाव हद्दपार करण्याचे आदेश

नामलगाव गणपती मंदिराच्या सातबारावरून नवले, सावंत, नेहरकरांचे नाव हद्दपार करण्याचे आदेश

घोटाळा करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांसह भूफियांवर आधी गुन्हा दाखल करा
बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातील देवस्थानाच्या इनाम जमीन बेकायदा हस्तांतरण करण्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत असून या घोटाळ्यामध्ये मोठमोठे राजकीय वरदहस्त असल्याने जिल्हा प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असून नामलगाव गणपती मंदिराच्या जमीन घोटाळा प्रकरणात सदरची जमीन बेकायदा हस्तांतरीत केल्याचे उघड जाल्यानंतरही अद्याप दोषींविरोधात गुन्हा दाखल नाही. परंतु या प्रकरणात बेकायदा सातबारावर नाव असलेल्या नवले, सावंत, नेहरकर यांचे नाव सातबारावरून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिले आहेत. ही समाधानाची बाब असली तरी या प्रकरणातील दोषी अधिकार्‍यांवर आणि भूमाफियांवर कुठलाच गुन्हा दाखल झाला नसून जिल्हा प्रशासन यातील आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप होत असून असे जिल्ह्यामध्ये ४० प्रकरणे असल्याचे सांगण्यात येते.


नामलगाव येथील गणपती मंदिराच्या जमीनीचे बेकायदा हस्तांतर झाल्याचे पुराव्यानिशी उघड झाले. यामध्ये तलाठी, मंडल अधिकारी यासह वरिष्ठ अधिकार्‍यांचा आणि भूमाफियांचाही समावेश असल्याचे दिसून येते. सदरचे प्रकरण उघड झाल्यानंतरही या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही अधिकारी, कर्मचारी अथवा भूमाफियाविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. उलट या प्रकरणात अर्जदार, भुमाफिया आणि गैरअर्जदार महाराष्ट्र शासनकडून हे प्रकरण एकतर्फी चालवण्यात आले. यात कुणाला ना नोटीस देण्यात आली ना पार्टी करण्यात आले, ना चौकशी करण्यात आली, ना पोसिडिंग ना संचिका डायरेक्ट जमीन हस्तांतरीत झाली. जेव्हा ही चौकशी झाली तेव्हा महाराष्ट्र शासनाकडून कुणीही बाजु मांडली नाही. या प्रकरणात असे दिसून येते, उपजिल्हाधिकारी सुनावणी घेणार, जिल्हाधिकारी आपले म्हणणे मांडणार अन् उपजिल्हाधिकारी यात निकाल देणार. असं प्रकरण किंवा अशी निकाल प्रक्रिया कुठेही झाली नसेल ती बीडमध्ये जमीन हस्तांतर घोटाळा प्रकरणात होताना दिसून येते. आदेश बोगस असल्यानंतर गुन्हे नोंद होणे गरजेचे आहे. जमीन हस्तांतरण करण्यास तहसीलदारांचे जे थम लागतात तेही या प्रकरणात दिसून येत नाहीत. हा सर्व बोगसगिरीचा प्रकार चर्चेत आल्यानंतर नामलगावच्या प्रकरणात चौकशी होऊन तलाठी व मंडल अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश देत काल उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी नामलगावची जमीन हस्तांतरण प्रकरणात जे नवले, सावंत, नेहरकर यांचे नाव लागले आहे ते सातबारावरून कमी करण्याचे आदेश काढले आहेत. परंतु सदरचे प्रकरण चर्चेत आहे म्हणून हा आदेश निघाला. अन्य ४० पेक्षा अधिक प्रकरणे असेच आहेत आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणामध्ये अशाप्रकारे चौकश्या आणि निकाल देत असेल तर जिल्हा प्रशासन जाणीवपुर्वक भुमाफियांसह जमीनीचा अपहार करण्यास मदत करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना पाठिशी घालत आहे. त्यामुळे दोषींवर अगोदर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!