महाविकास आघाडी निवडणूक जिंकणारच -आ. संदीप क्षीरसागर
बाजार समिती 40 वर्षांपासून एकाच कुटुंबाच्या हातात -राजेश्वर चव्हाण
लूट रोखण्यासाठी बाजार समितीतीमहाविकास आघाडीच्या ताब्यात द्यघा -अनिल जगताप
शेतकर्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार काम करणार -मोराळे
बीड (रिपोर्टर) गेल्या तीन पिढ्यांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकाच कुटुंबाच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तेथे अनेक बेकायदेशीर कामे झालेली आहेत. या बाजार समितीमध्ये शेतकर्यांचे हित जोपासले जात नाहीत. व्यापारी मतदारसंघात तर एकाच कुटुंबातील शंभर नावे आहेत. काही नावे ही जालना येथे स्थायीक असलेल्या व्यापार्यांची सुद्धा आहेत. त्यामुळे बाजार समितीतील अनागोंदी कारभार थांबविण्यासाठी आणि शेतकर्यांच्या हितासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीमध्ये एकत्र आलो असून ही निवडणूक आम्ही जिंकणारच असा ठाम विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवण्यात येत असून याबाबत शासकीय विश्रामगृहावर एक पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब गट), अनिल जगताप, सुशिला मोराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्वर चव्हाण, काँग्रेस पक्षाचे रवींद्र दळवी, वंचित बहुजनचे अशोक हिंगे, उद्धव खाडे, महादेव धांडे, माजी आ. सय्यद सलीम, गणेश बजगुडे, धनंजय गुंदेकर, बाळासाहेब घुमरे, या सर्वांनी मिळून संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आ. संदीप क्षीरसागर बोलत होते. क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाले, बाजार समितीच्या वतीने शेतकर्यांसाठी स्टोरेज, गोडाऊन, माती परिक्षणाची फिरती गाडी, नेकनूर, चौसाळा येथील गोडाऊन हे शेतकर्यांना वापरण्यात येतील. अशा पद्धतीने निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या वतीने काम केले जाईल. सोसायटी मतदारसंघातून 11 जागा 4 जागा या ग्रामपंचायत मतदारसंघातून 1 जागा ही हमाल मापाडी मतदारसंघातून तर दोन जागा या व्यापारी मतदारसंघातून निवडण्यात येणार आहेत. व्यापारी मतदारसंघात अनेक नावे ही बोगस आहेत. एकाच कुटुंबातील आहेत. एकाच रात्रीतून त्यांना व्यापारी म्हणून नोंदणी करून मतदार केले आहे. या सर्व बाबी हाणून पाडण्यासाठी आणि खर्या अर्थाने ही बाजार समिती शेतकर्यांच्या हितासाठी काम करेल, असे काम करण्यासाठी आम्हाला निवडून द्या अणि आम्ही निवडणूक जिकणारच, असाही विश्वास संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. या वेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने रवींद्र दळवी यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शेतकर्यांच्या हितासाठी बीड बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश्वर चव्हाण यांनी बीड बाजार समिती ही गेल्या चाळीस वर्षांपासून एकाच व्यक्तीच्या ताब्यात असल्यामुळे अनेक चुका झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या हितासाठी आम्ही दक्ष झालो आहोत त्यामुळे ही निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत, असेही देशमुख यांनी सांगितले. या वेळी सुशिला मोराळे यांनी बाजार समिती ते देशपातळीपर्यंत शेतकर्यांच्या हितासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीत हे आंदोलन करून शेतकर्यांच्या विरोधातील केंद्र सरकारने केलेले तीन कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडले. या वेळी बीड बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने एकत्र आलो आहोत आणि निवडून आल्यानंतरही आमचे आलेले उमेदवार फुटणार नाहीत, अणि ही बाजार समिती शेतकर्यांच्या हातात दिली जाईल, असेही मोराळे यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीड बाजार समितीमध्ये अनाधिकृतरित्या सुरुवातीला 12 टक्केप्रमाणे कर वसूल केला जायचा, त्यानंतर 12 टक्के ऐवजी हा कर 8 टक्क्यांवर आणून तो कर बाजार समितीतही भरला जात नव्हता आणि न.प.तही जमा केला जात नव्हता. हा बाजार समितीतील अनागोंदपणा आम्ही बंद केला असून जो शेतकर्यांकडून 8 टक्के कर वसूल केला जायचा तो योग्य यंत्रणेकडून वसूल व्हावा त्यासाठी आम्ही बाजार समितीला टेंडर काढण्यासाठी भाग पाडले. या 8 टक्क्यातून जी रक्कम जमा होईल ती शेतकर्यांच्या हितासाठी खर्च झाली पाहिजे, यासाठी आमचा आग्रह असून आम्ही निवडून आलो तर शेतकरी हिताचेच काम होईल, असेही या वेळी शिवसेनेचे अनिल जगताप यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले.