बीड (रिपोर्टर) गेल्या 30 ते 35 वर्षांपासून बीडच्या बाजार समितीवर जयदत्त क्षीरसागरांची एकहाती सत्ता आहे. त्यांनी यातून शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली आहे. व्यापार्यांसाठी बांधलेले गाळे जवळच्या लोकांना दिलेले आहेत. बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरून क्षीरसागरांच्या गाड्यात पेट्रोल भरले जाते. एकही क्षीरसागर व्यापारी नसताना त्यांची नावे मतदार यादीत आहेत. शेतकर्यांना देशोधडीला लावणार्या क्षीरसागरांच्या हातून बीडची बाजार समिती काढण्यासाठी आम्ही समविचारी भाजप – शिवसेना – शिवसंग्राम – रिपाइं एकत्र आलो असून अन्य लोक आमच्या सोबत आले तर आम्ीह त्यांना सोबत घेऊन बाजार समितीची निवडणूक लढवू आणि प्रस्थापितांना सत्तेतून खाली खेचू, असे पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, शिवसंग्रामचे रामहरी मेटे यांनी सांगितले.
बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापू लागले आहे. आज भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, शिवसंग्रामचे रामहरी मेटे, प्रभाकर कोलंगडे, भाजपाचे सर्जेराव तांदळे यांच्यासह आदींनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, गेल्या 35 वर्षांपासून क्षीरसागर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी आहेत. शेतकर्यांच्या मालाला हमीभाव देण्याचे सोडून फक्त या माध्यमातून ते राजकारण करत आहेत. बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा उडीद घोटाळा कोणी केला हे सगळ्यांना माहित आहे. आता खर्या अर्थाने शेतकर्यांच्या हितासाठी परिवर्तनाची गरज आहे. म्हणूनच आम्ही समविचारी पक्ष एकत्र आलो आहोत. सत्ताधारी क्षीरसागर सोडून आमच्या सोबत जे जे कोणी येतील त्या प्रत्येकाला आम्ही सोबत घेऊन लढणार आहोत. एकवेळ आम्ही माघार घेऊ पण सत्ताधारी क्षीरसागरांसोबत जाणार नाहीत. क्षीरसागरांविरोधात लढण्यासाठी आम्ही कोणासोबतही युती करायला तयार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले.