Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठवाडाकोरोनाच्या संकटकाळात मराठवाड्यात ४८३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

कोरोनाच्या संकटकाळात मराठवाड्यात ४८३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बीड (रिपोर्टर)- मार्च महिन्यापासून कोरोनाचं संकट आलेलं आहे. या संकट काळात सर्वच नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले आहेत. त्यातच शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट असून या आठ महिन्यांच्या कार्यकाळात मराठवाड्यातील ४८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. भाजपा सरकार आणि सध्याचं महाआघाडी सरकार या दोन्ही सरकारने शेतकर्‍यांना कर्जमुक्ती दिली मात्र त्यानंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी, नापिकी आणि पिकाला नसलेला भाव यामुळे आत्महत्या करत आहेत. विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर कमकुवत आहे. त्यामुळे या दोन्ही विभागात शेतकरी आत्महत्येचा आकडा दरवर्षी वाढू लागला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाचे संकट असल्याने या संकटाच्या कार्यकाळात सर्वच नागरिक आर्थिकदृष्ट्या खालावलेले आहेत. शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट बनली. त्यामुळे आठ महिन्यात मराठवाड्यातील ४८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विशेष ठोस उपाययोजना आखत नसल्याने शेतकरी मरणाला जवळ करू लागले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्येचा आकडा कमी झालेला नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्याची मागणी सातत्याने केली जाते मात्र याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करत असल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच असल्याने यामुळे शेतीतज्ञ चिंता व्यक्त करत असल्याचे दिसून आले.

यावर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडला असला तरी परतीच्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर वाटोळे केले. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ऊस, बाजरी या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. काही शेतकर्‍यांचे ३० टक्के तर काही शेतकर्‍यांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने नुकसान भरपाई दिली खरी मात्र ही नुकसान भरपाई आणि शेतकर्‍यांचं झालेलं नुकसान याची बरोबरी होऊ शकत नाही.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!