आष्टी शहरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने खळबळ, पती अटकेत
आष्टी (रिपोर्टर):-दारुड्या पतीने पत्नीच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून केल्याची धक्कादायक घटना आष्टी शहरात मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मध्यरात्री पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नीलम संभाजी वाल्हेकर ( वय 32 वर्षे, रा. फुलेनगर आष्टी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. नीलम आणि संभाजी शिवाजी वाल्हेकर यांचा विवाह गेल्या काही वर्षापूर्वी झालेला आहे. त्यांना दोन मुले आहेत. संभाजी आजारी असल्याने ते काही दिवसांपासून घरी होते. पत्नी नीलम मोलमजूरी करुन कुटुंबीयांचा गाडा हाकत होती. संभाजी शिवाजी वाल्हेकर दारू पिण्यासाठी पत्नीकडे नेहमी पैशाची मागणी करायचा. पैसे नाही दिले तर हाणमार करून जीवे मारण्याची धमकी देत होता. 14 एप्रिल रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास संभाजी व पत्नी नीलम यांच्यात किरकोळ वाद झाल्यानंतर संभाजीने पत्नीच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून केला. त्यानंतर संभाजीचा मुलगा सुरज चुलते दौलत शिवाजी वाल्हेकर यांच्याकडे रडत गेला असता त्यांनी विचारले असता घरी चला पप्पा ने मम्मीला डोक्यात मारले आहे. त्यांनतर दौलत त्यांची पत्नी, भाऊ गणेश असे घरी गेलो असता मयत नीलम रक्ताच्या थारोळ्यात लोखंडी पलंगावर पडलेल्या स्थितीत होती. या प्रकरणी दौलत शिवाजी वाल्हेकर यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात आरोपी संभाजी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पीएसआय प्रविण काळे, पो. कॉ. सचिन पौळ यांनी भेट दिली. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख हे करीत आहेत.