Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeसंपादकीयभात्त्यातलं ब्रह्मास्त्र धनुष्याविना सुटलं, धसांच्या मोर्चाचं कुसळ डोळ्यात सललं!

भात्त्यातलं ब्रह्मास्त्र धनुष्याविना सुटलं, धसांच्या मोर्चाचं कुसळ डोळ्यात सललं!

गणेश सावंत
एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत म्हणून मी आता हाती तलवार नव्हे तर हातात धनुष्यबाण घेत पाठिवर भाता बांधला आहे. त्यामुळे त्या भात्त्यात अनेक ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र यासारखे बाण ठेवता येणार आहेत असं म्हणत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी कधी काळी आ.सुरेश धसांच्या पक्षप्रवेशावर गौरोवद्गार काढत मातृत्व शक्तीचे दातृत्व आपल्याकडेच असल्याचा दावा केला होता. त्या दाव्याने आणि तेंव्हाच्या परिस्थितीने अवघा जिल्हा भाजपमय होईल असे वाटत असतांनाच विधानसभा निवडणूकीतच धोंडे-धसांचे अंतर्गत वाद समोर आले. त्या पाठोपाठ गेवराईचे आमदार लक्ष्मण पवारांची नाराजगी ही चर्चेत राहिली. तेंव्हा बीडची भाजप एकवटतेकी बिखरते यावर चर्चा होवू लागली. पुढे सुरेश धस यांची काम करण्याची हातोटी सर्वसामान्य कष्टकरी, कामगार यांच्या विषयी असलेली तगमग त्यांच्या कार्यातून समोर येवू लागली. ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नावर आ.सुरेश धसांनी सरकारविरोधात हातात मुसळ घेतलं अन् इथच भाजप नेतृत्वाच्या डोळ्यात कुसळ सलु लागलं. मुंडे-धस यांच्यात अंतर्गत वाद आहे याची चर्चा होत असतांना दोघांकडून मात्र कानावर हात आणि ओठावर चुप्पी ठेवणे पसंत केले. मात्र काल जेंव्हा अवघ्या तीन दिवसात मोर्चाची घोषणा करत मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरेश धसांनी एल्गार पुकारला आणि तेवढ्याच ताकदीने मोर्चा काढला तेंव्हा मात्र भाजपात सर्व काही अलबेल आहे. या अभासाचे पोस्टमार्टम झाले. पंकजा मुंडेंनीच नव्हे तर समर्थकांनीही या मोर्चाकडे पाठ फिरवली. दस्तुरखुद्द खा.प्रितम मुंडे या बीड जिल्ह्यात असतांना मोर्च्याकडे आल्या नाहीत उलट त्यांनी सुरेश धसांच्या आष्टीत बैठक घेतली. यातून भाजपातील अंतर्गत गटबाजी समोर येतांना दिसली. एवढेच नव्हे तर सुत्रांच्या माहितीनुसार भाजप नेतृत्वाने या मोर्चाला लोकांनी जावू नये यासाठीही प्रयत्न केल्याचे सांगण्यात येवू लागले. असे असले तरी धसांचा लोकातच नव्हे तर पक्षातही दबदबा आहे हे मात्र स्पष्ट झाले.


मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरेश धसांनी काल कलेक्टर कचेरीवर जबरदस्त मोर्चा काढला. ३ दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेवून मोर्चाचा एल्गार पुकारला. गेल्या दोन वर्षापुर्वी या जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार आणि एक खासदार असल्यामुळे हा मोर्चा आक्रमक होईल तो एक संघ भाजपामुळे असे वाटत असतांना काल प्रत्यक्षात मात्र या मोर्चात जिल्हा भाजप कुठेच दिसली नाही. तरीही अवघ्या तीन दिवसाच्या कालखंडात सुरेश धसांनी मोर्चामध्ये जी हजारोची संख्या उपस्थित केली आणि या संख्या बळामध्ये नुसते मराठेच नव्हे तर आठरापगड जातीचे लोक उपस्थित राहिले. यावरून सुरेश धसांचं नेतृत्व हे पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चेत आलं. मराठ्यांना आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आणि अन्य सर्वसामान्यांच्या दहा मागण्या घेवून हा मोर्चा होता. या मोर्चात नुसते आष्टी, पाटोद्याचे लोक नव्हते तर गेवराई, बीड, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या तालुक्यातून अनेक लोक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर धारूर, माजलगाव,परळी, अंबाजोगाई, केजमधूनही काही लोकांनी मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. व्यासपीठावरही तालुक्या-तालुक्याचे प्रतिनिधी पहावयास मिळत होते. परंतू राज्यभरात भाजपाने आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात जी आंदोलनाची भूमिका घेतली आहे त्या अनुषंगाने या मोर्चाला बीड जिल्ह्यात भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतू तसे दिसून आले नाही. दस्तुरखुद्द खा.प्रितम मुंडे या बीड जिल्ह्यात असतांना या मोर्चाकडे त्यांनी डुंकुनही पाहिले नाही. उलट सुरेश धसांच्या आष्टीमध्ये त्यांनी बैठक घेतली. यातून हे स्पष्ट होते, बीड जिल्ह्यातील भाजप नेतृत्वाला सुरेश धसांचा मोर्चा मान्य नव्हता किंवा ते करत असलेलं नेतृत्व त्यांना अमान्य होतं. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि बीड जिल्ह्याच्या मातृत्वाचं दातृत्व आपल्याकडच असल्याचा दावा करणार्‍या पंकजा मुंडेंनीही या मोर्चाकडे पाहिलं नाही. उलट प्राप्त माहितीनुसार हा मोर्चा कसा फेल होईल, त्याचा कसा फज्जा उडेल याकडे प्रकर्षाने लक्ष दिलं गेल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर हे मराठ्यांचे दमदार नेते असतांना भाजपाच्याच आमदाराने काढलेल्या मोर्चामध्ये सहभागी झाले नाहीत. यातून दुधाचं दुध आणि पाण्याचं पाणी बीड जिल्ह्याला नक्कीच करता येईल उलट २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये ज्या आ.लक्ष्मण पवारांच्या बाबतीत चर्चा होत होती ते पवार मात्र त्या ठिकाणी उपस्थित होतांना दिसून आले. आजारपणाच्या व्याधीने त्रस्त असलेले माजी आ.आर.टी.देशमुख हे सुद्धा व्यासपीठावर पहायला मिळाले. एवढेच नव्हे तर आर.टी.देशमुखांनी धस आण्णा तुम्ही जेंव्हा जिथ उभे रहाल तिथं आम्ही तुमच्या पाठिशी ताकदीने उभे राहू हे वक्तव्य केलं. अन्य व्यासपीठावर छोट्या-मोठ्या नेत्यांनीही तिच भूमिका घेतली. भाजपाच्या आमदाराचा मोर्चा तोही मराठ्यांच्या आरक्षणासाठी, त्यातही जिल्ह्यातले अन्य महत्त्वाच्या मागण्या असे असतांना मोर्चात भाजपाचा एकही ध्वज दिसला नाही. मग हा नुसता सुरेश धसांचा मोर्चा होता का? भारतीय जनता पार्टी यात सहभागी नव्हती. होती तर मग खासदार मोर्चात का आले नाहीत? भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी या मोर्चाबाबत काहीच भाष्य केले नाही? जिल्हाध्यक्ष अनुपस्थित राहतो? रमेश आडसकरांसारखा नेता या मोर्चाकडे फिरकत नाही? हे जावुद्या माजलगावमध्ये आज जे आंदोलन होत आहे तिथेही भाजपाचे दोन गट दिसून आले. मग मातृत्वाच्या दातृत्वाचा दावा करणार्‍या पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यात भावंड का विखुरले जात आहेत? तर याचं साधं आणि सोपं उत्तर पंकजा मुंडेंना कुठलंही नेतृत्व मोठं होवू द्यायचं नाही? अस तर नाही? कालच्या मोर्चात सुरेश धसांनी बीड जिल्हा नेतृत्वालाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रालाही आपली ताकद दाखवून दिली हे मात्र खरे. पंकजा मुंडेंच्या आडवा-अडवी? नंतरही सुरेश धस बलाढ्य पहावयास मिळाले. विशेेष म्हणजे मोर्चाच्या आधी किंवा पत्रकार परिषदेच्या आधी सुरेश धस आणि पंकजा मुंडे मुंबईतील निवासस्थानी दोन तास एकत्र होते. ओबीसीच्या आंदोलनाबाबत चर्चा झाली, सुरेश धसांनी त्यावेळी ताकदीने हे आंदोलन करण्याचा शब्द दिला. ते आंदोलनही आष्टी, पाटोदा, शिरूर कासारमध्ये सुरेश धसांनी ताकदीने केलं. मात्र सुरेश धसांचं आंदोलन ताकदीने होवू नये हे धोरण कोणी आखलं? हा प्रश्‍न विचारणच मुर्खपणा आहे. ते सुर्यप्रकाश इतकं स्वच्छ आता समोर येत आहे. सुरेश धसांनी हाती नेतृत्वाचं मुसळ घेतलं म्हणून काहींच्या डोळ्यात कुसळ तर सलत नसेल?

Most Popular

error: Content is protected !!