बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेच्या अपंग प्रवर्गातील शिक्षकांची तपासणी केल्यानंतर दोषी आढळलेल्या 103 शिक्षकांना निलंबीत करण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निलंबन रद्द केल्यानंतर त्यांना येत्या दोन दिवसात पदस्थापना देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी काहींनी नोकरीसाठी तर काहींनी बदलीसाठी अपंगाचे प्रमाणपत्र जोडले होते. यांच्या प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी केली असता त्यात बोगसपणा आढळून आल्याने त्यांना निलंबीत करण्यात आले होते. मात्र हे निलंबीत शिक्षक औरंगाबाद खंडपीठात निलंबन आदेशाच्या विरोधात गेले होते. औरंगाबाद खंडपीठाने या शिक्षकांची मुंबई येथील जेजे रुग्णालयातून पुन्हा तपासणी करण्यात यावी तर काहींना माफीनाम्यावर पुन्हा पदस्थापना देण्यात यावी, असे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने 20 शिक्षक हे बोगस प्रमाणपत्रावर नोकरीला लागलेले त्यांच्या बाबतीत राज्य सरकारकडे जिल्हा परिषदेने मार्गदर्शन मागविले आहे. तर काही शिक्षकांनी माफीनामा न देता जे जे रुग्णालयातून पुन्हा तपासणी करून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे उर्वरित 42 शिक्षकांना येत्या दोन दिवसात नव्याने पदस्थापना देण्यात येणार आहे.