Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख -जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती

अग्रलेख -जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती


कोरोनाच्या वैश्‍विक महामारीने अवघ्या जगाला त्रस्त करून सोडलं. अशा भयावह परिस्थितीतही कोरोनाशी तुम्ही-आम्ही लढा दिला आहे. हा लढा देताना अमुक व्यक्तीलाच तो लढा द्यावा लागला असे नाही. इथं कोरोनाने राजाला सोडलं नाही ना रंकाला सोडलं. गरीब-श्रीमंत, हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, लहान मोठा, स्त्री-पुरुष यांच्यातही कोरोनाने भेदभाव केला नाही तर त्याने सरळ सर्वांवर आक्रमण केले. मात्र हे आक्रमणे पुर्णत: परतवून लावण्या हेतु आपण सर्वांनी काम सुरू ठेवले. उद्योग-धंदे, छोटे-मोठे व्यवसाय पुर्णत: कोलमडून गेले. लोकांचा आर्थिक स्तर कमालीचा खाली आल्याने जो तो परागंदा व्हावे अशा स्थितीत दिसून येत आहे. परंतु धैर्य ठेवून संघर्ष करणं आणि यशाची पताका फडकवणं हे महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म असल्याने आजही सर्वसामान्यातला सर्वसामान्य तट धरून कोरोनाशी दोन हात करत आहे. या दोन वर्षाच्या कालखंडात प्रत्यक्ष तुमची आणि आमची भेट होऊ शकली नाही. गतवर्षीही लॉकडाऊनच्या अनुषंगाने आम्ही वर्धापन दिनाचा कार्यक्रम टाळला. परंतु यावर्षी वाचक माय-बापांच्या भेटीची ओढ लागून राहिल्याने भेटी लागे जिव्हाळा म्हणत तुमची भेट घेण्याची प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर आम्ही हा कार्यक्रम आखला खरा परंतु रोज बीड जिल्ह्यात कोरोना बाधित दिडशेच्या आसपास निघत असल्याने शासनाने कोरोनाच्या गाईडलाईन ठेवत जाहीर कार्यक्रमांना मोजक्या लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिल्याने आपला वर्धापन मोजक्या लोकात होणे अशक्य. बीड जिल्ह्यातल्या वाचकांनी गेल्या २८ वर्षांच्या कालखंडात सायं. दैनिक बीड रिपोर्टरवर जे भरभरून प्रेम केलं ते मोजक्या शब्दात मांडता येणार नाही. म्हणूनच रिपोर्टरला भेट देण्यासाठी येणार्‍यांची संख्या ही मोजकी नसणार. मग रिपोर्टरच्या प्रेमापोटी आलेल्या प्रत्येक वाचकांच्या आरोग्याची काळजी करणे हे आमचे आद्य कर्तव्य. कोरोनासारखा समुहसंसर्ग पसरवणार्‍या विषाणुच्या नांग्या ठेचायच्या असतील तर समुहात येणं टाळावे लागेल. हे सर्वश्रूत असल्याने आम्ही अत्यंत जड अंत:करणाने अखेर सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या वर्धापनदिनाचा जाहीर कार्यक्रम अखेर रद्द केला. गेल्या २८ वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक स्थित्यांतरे घडली. रिपोर्टरसाठी ते स्थित्यांतरे कधी खडतर तर कधी मेनाहूनही मऊ राहिले. म्हणूनच आम्ही २८ वर्षांचा कालखंड हा वाचक मायबापांच्या खंबीर साथीवर पुर्ण करू शकलो. आज आम्ही २९ व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. या तरण्याताठ्या वयात आजपर्यंत आम्ही ज्या कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्या लोकांचा आवाज बनून राहिलो तोच आवाज भविष्यात आम्ही बनून राहू, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या या डिजिटल युगात आम्ही ई-पेपर, पोर्टलसह सोशल साईटच्या माध्यमातून रिपोर्टर आपल्यापर्यंत पोहचवत आलो आहोत. यापुढेही पोहचूच. दु:ख एवढच यावर्षीही तुमची आणि आमची भेट नाही. परंतु वाचकासंगे सर्वकाळ अखंड प्रेमाचा कल्लोळ असणारच आहे, असा विश्‍वास व्यक्त करत ‘हेचि व्हावी आमची आस पदोपदी तुमची साथ राहील’ आणि त्या साथीच्या बळावर आम्हाला हत्तीची ताकत येईल.

Most Popular

error: Content is protected !!