Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- शब्द नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर महाराष्ट्राच्या संस्काराची आय-माय

अग्रलेख- शब्द नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर महाराष्ट्राच्या संस्काराची आय-माय


गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०

सोमवारी विधान भवनाच्या सभागृहात जे घडलं ते महाराष्ट्राच्या संस्काराला आणि संस्कृतीचे वाभाडे काढणारे होते. मंगळवारी विधान भवनाच्या बाहेर जे घडलं ते लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्यावरच जणू बलात्कार होता. ज्या महाराष्ट्राला साधू-संत-सुफींची परंपरा आहे त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात आय-माय काढली गेली. शिव्यांची लाखोळी वाहिली गेली आणि हे सर्व उभा महाराष्ट्र नाहीतर देश टेलिव्हिजनच्या माध्यमातून पहात होता. अशा वेळी आम्ही निवडून दिलेले आमचे नेतृत्व विधानसभेत शिव्यांची लाखोळी वाहत असतील तर ज्यांनी नेतृत्व स्वीकारलं त्या मतदारांनी तोंडात मारून घ्यायचं की, अशलाघ्य भाषेचा वापर करणार्‍या तथाकथितांच्या कानशिलात मारायचं ? हा प्रश्‍नच उभ्या महाराष्ट्राला पडून राहिला आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रश्‍नांवर भाष्य करण्यासाठी, त्या प्रश्‍नांचे उत्तर शोधण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी अधिवेशन असतं ते किमान आठवड्याभराचं तरी असायला हवं असतं मात्र आधीच तोडका वेळ आणि त्यात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या प्रश्‍नांपेक्षा अशलाघ्य भाषेत होणारे विधान भवनातले कामकाज हे महाराष्ट्राच्या मातीला न शोभणारे म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील लोकांचा आवाज हा विरोधी पक्ष असायला हवा. मात्र काल आणि परवा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा लोकांचा आवाज नव्हता तर तो अतेताई, भ्रमिष्ठ आवाज होता. महाराष्ट्र आधीच कोरोनाच्या समुह संसर्गाखाली दबून पडला आहे या परिस्थितीतून महाराष्ट्राला आणि तिथल्या माणसाला उठून उभा करण्याची ताकत देण्याचे काम सत्ताधारी आणि विरोधकांनी करायला हवं. ते करण्यापेक्षा सत्ता राखण्यात आणि सत्ता पाडण्यात मश्गुल असलेल्या सत्ताधार्‍यांसह विरोधकांचं विधान सभेतलं वर्तन हे हिंस्त्र म्हणावं लागेल. थेट विधानसभेच्या तालिका अध्यक्षांना
आई-बहिणीवर
शिवीगाळ

केली जात असेल तर ते महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल. जेव्हा कोणाच्याही स्वप्नात नव्हते असे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले तेव्हा १०६ च्या संख्या बळावर असलेला भाजप हा तगडा विरोधी पक्ष महाराष्ट्राला लाभला. त्यामुळे सरकारला लोकांचे प्रश्‍न सोडवावेच लागतील यामुळे अवघा महाराष्ट्र समाधानी होता. राज्यातला विरोधी पक्ष कणखर असेल तर आणि तरच त्या राज्यातल्या तळागाळातील सर्वसामान्य माणसांचे प्रश्‍न मार्गी लागतात हे सर्वश्रूत आहे परंतु इथं सत्तालंपट असलेल्या विरोधी पक्षनेत्याने जे काही काहुर मांडून सोडलं ते लोकांच्या प्रश्‍नांसाठी नव्हे तर केवळ सत्ताधार्‍यांना मानसिकदृष्ट्या दुर्बल करण्याहेतु उपटसुळ मुद्द्यांना महत्व देणं आणि हे महत्व देण्यासाठी ज्या पद्धतीने अशलाघ्य भाषा वापरण्यात आली ती दुर्दैवी होती. तालिका अध्यक्ष असणार्‍या भास्कर जाधव हे जेव्हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून जनगणना मागवण्याचा प्रस्ताव मंजूर करत होते त्यावेळी भाजपाच्या आमदारांनी केलेला गोंधळ, हिसकावलेला माईक आणि अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जाधवांना केलेली शिवीगाळ ही समर्थनीय नक्कीच नाही. ज्या भाषेचा वापर जाधवांबाबत करण्यात आला ती भाषा ‘दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी’ अशी होती. त्यापेक्षा त्यांची भाषाही वाणी रजस्वाला श्रवे तैसिच म्हणावी लागेल. जो विषय घेऊन विरोधक आक्रमक होते, शिवीगाळ करत होते तो ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न हा आज राज्य सरकारच्या अख्त्यारीत येत नसल्याचे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आणि स्पष्ट झाले असताना त्या विषयाचा हा अट्टाहास करून विधानसभेचे कामकाज करु न देणे हा विरोधी पक्षाने महाराष्ट्राचा केलेला विश्‍वासघात म्हणावा लागेल. त्या प्रकरणातून ज्या बारा आमदारांचे निलंबन झाले आणि त्या निलंबनानंतर मंगळवारच्या दिवशी विधान भवनाच्या बाहेर विरोधकांनी जी प्रति विधानसभा भरवली हा प्रकारही अशोभनीय आणि महाराष्ट्राच्या विकासाला खिळ घालणारा असाच आहे. कोविडच्या महामारीतून अद्याप महाराष्ट्र सावरलेला नाही. हे सर्वश्रूत असताना
विरोधकांचे हे
अकांडतांडव

नेमके कशासाठी? लोकांच्या कुठल्याही प्रश्‍नावर विरोधकांनी आक्रमक झाल्याचे पाहितले नाही. कोरोनामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे उद्योग-धंदे उद्ध्वस्त झाले आहेत. लोकांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी वाढली आहे, दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने शिक्षणाचे प्रश्‍न आ वासून उभे आहेत. परीक्षा घेतल्या जात नाहीत म्हणून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. शेतकर्‍यांच्या पिक विम्याचा प्रश्‍न आहे. एकूणच महाराष्ट्र आज क्युमध्ये अडकून पडलेला आहे. अशा क्युमधल्या एका तरी प्रश्‍नावर विरोधकांनी आवाज उठवलाय का? ज्या प्रश्‍नावर आवाज उठवत विरोधकांनी रणकंद माजवले तो प्रश्‍न ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी लागणारी जनगणना ही केंद्र सरकारने महाराष्ट्राला लवकर द्यावी, या मागणीचा प्रस्ताव विरोधकांच्या दृष्टीने चुकीचा कसा? राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर जे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांकडे बोट करण्याचे धंदे सुरू आहे ते महाराष्ट्राला कळत नाहीत का? महाराष्ट्रातला माणूस तेवढा दूधखुळा आहे का? तर याचं उत्तर आगामी निवडणुकांमधून तो माणूस देईलच परंतु आज ज्या प्रश्‍नांवर भाष्य व्हायला हवे, जे प्रश्‍न सुटायला हवेत ते प्रश्‍न न सोडता अथवा त्या प्रश्‍नांवर भाष्य न करता ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते फडणवीस थयाथया करतात ते फडणवीस नव्हेतर
‘फसवणीस’
म्हणावे लागतील. भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी फडणवीसांवर विश्‍वास टाकून त्यांना अनुभव नसताना महाराष्ट्रासारखं राज्य चालवायला दिलं. जेष्ठ नेत्यांना डावलून त्यांना मुख्यमंत्री केलं. सत्तेची गरमी मस्तकात भिनली की, माणूस मस्तीत येतो आणि मस्तीत आलेला तो माणूस मदमस्त हत्तीसारखा पिसाळतो तेव्हा त्याच्या या पिसाळलेपणात त्याच्यावर आस लावून बसलेले कितीतरी निष्पाप लोक चिरडले जातात आणि तेच फडणवीसांच्या बाबतीत महाराष्ट्र भाजपात झालं. मुख्यमंत्री पदाच्या अभिलाषेपोटी शिवसेनेसोबतची ३० वर्षांची युती तोडली अन् पहाटेच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेतून सत्तेची वासना फडणवीसांनी काही काळासाठी शमवली मात्र त्यानंतर पुन्हा त्यांच्या शय्येवर सत्तेची परी आली नाही. त्या सतरा महिन्यांपासून फडणवीस अक्षरश: बिथरल्यागत महाराष्ट्रात वागताना दिसून येतात. लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीची हत्या झाली, लोकशाहीवर बलात्कार झाला, असे एक ना अनेक वाक्य प्रयोग करून फडणवीस ज्या बेताल पद्धतीने सुसाट वळू सारखे वागत आहेत. त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या जीवन प्रणालीवर पडत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आता फडणवीसांसारख्या ‘फसवणिसाला चेमटायलाच हवे. सोमवारी फडणवीसांसमक्ष तालिका अध्यक्षांना शिवीगाळ होत होती तेव्हा फडणवीस शांत होते. यातून फडणवीसांची मानसिकता दिसून येते. भास्कर जाधव कोण? याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, परंतु ते तालिका अध्यक्ष होते आणि महाराष्ट्राच्या तालिका अध्यक्षाला संस्कार आणि संस्कृतीचा डांगोरा पिटवणार्‍या भाजपा आमदाराकडून शिवीगाळ केली जात होती आणि फडणवीसही त्याला प्रोत्साहन देत होते त्यामुळे फडणवीसांनाच विरोधी पक्षनेते पदावर राहण्याचा अधिकार आहे का? हा सवाल विचारावा लागेल. महाराष्ट्रातले प्रश्‍न आणि समस्या पाहितल्या तर कुणीही चक्रावून जाईल. महाराष्ट्राच्या मातीला सावरण्यासाठी अथवा मशागत करण्यासाठी दोन दिवसांचं
अधिवेशन
पुरेसा नाही

हे सर्वश्रूत आहेआणि राज्यातील ठाकरे सरकारनेही केवळ विरोधकांचा आकडा १०६ चा आहे. कोविडमुळे सरकार परेशान आहे. मराठा, धनगर, ओबीसी हे आग लावणारे प्रश्‍न समोर आहेत. विरोधक आक्रमक होतील म्हणून त्यांनीही केवळ दोन दिवसांचं अधिवेशन तेही अर्थसंकल्पा व्यतिरिक्त ज्या पुरवण्या लावून कोट्यवधी रुपये मंजूर करायचे असतात त्यामुळे घेतलं. त्यात सत्ताधार्‍यांनीही अधिवेशनाचा कालावधी महाराष्ट्राच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी जास्तीचा ठेवायला हवा होता, त्यांनी तो ठेवला नाही आणि जो कालावधी ठेवण्यात आला त्या कालावधीत विरोधकांनी महाराष्ट्राच्या महत्वाच्या प्रश्‍नावर आवाज उठवायला हवा होता तो विरोधकांनी उठवला नाही. तुघलकी विषय पुढे करत अशलाघ्य भाषा वापरून बारा आमदार निलंबीत झाले म्हणून जी प्रतिविधानसभा उभारली त्यावर आम्ही एवढच म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७ साली १९ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यावेळी तेव्हाच्या विरोधकांनी कोणाची आय-माय काढली नव्हती कारण ती आपली संस्कृती नाही. यथा राजा तथा प्रजा आपल्याकडे म्हटलं जातं. देवेंद्र फडणवीसच थयथयाट करणारे असतील तर त्यांचे आमदारही तेच करतील. यातून ना भाजपाचे बरे होईल ना महाराष्ट्राचे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!