मुंबई (रिपोर्टर) विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे इथंही चुरस रंगणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालाने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न सुरू असले तरी महाविकास आघाडीत परस्परांविषयी निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणानंतर कोणीच माघार घेण्यास तयार नाही. पुरेशी मते नसली तरी दोन्ही जागा लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. सहाही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला असला तरी तेवढय मतांचे गणित जुळणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर आज, दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही तोडगा निघाला नाही तर ही निवडणूकही राज्यसभेप्रमाणे चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे करोनारुग्णवाढ ही चिंतेत भर टाकणारी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि विषाणूजन्य आजारांच्या फैलावासाठी निर्माण झालेले पोषक पावसाळी वातावरण अशा परिस्थितीत येत्या बुधवारपासून शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे पालकांनी शाळकरी मुलांबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भातील तयारीला आजपासून सुरुवात होताना दिसत आहे. आजपासून दोन दिवस शिक्षक आणि कर्मचार्यांकडून शाळांमधील पूर्वतयारी करुन घेतली जाणार आहे. मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या आठवडयपासून दीड हजाराच्या पुढे गेली आहे. मुंबईत सध्या तब्बल दहा हजाराहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. पंधरा दिवसांतच उपचाराधीन रुग्णांची संख्या पाचपटीने वाढली आहे. रविवारी दिवसभरात 1,803 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळेच आता करोनासंदर्भात सरकार काही कठोर पावले उचलणार का याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे.