Thursday, August 5, 2021
No menu items!
HomeUncategorizedअग्रलेख -आयुष्याचे भविष्य काय?

अग्रलेख -आयुष्याचे भविष्य काय?

गणेश सावंत हा प्रश्‍न गफलत करणारा वाटतो ना, परंतु आजची परिस्थितीच ती आहे. आयुष्याला वाचवण्यासाठी त्याला दिर्घायुष्य बनविण्यासाठी गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात जो शर्थीचा खटाटोप सुरू आहे तो खटाटोप पाहितल्यानंतर आजच्या पिढीचे आयुष्य तर वाढेल परंतु त्या पिढीचे भविष्य काय? हा प्रश्‍न आता उपस्थित करावाच लागेल. कोरोनाच्या कालखंडामध्ये गाव नव्हे, शहर नव्हे, जिल्हा नव्हे, राज्य नव्हे तर देश घरबंद झाले. सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प पडले. शाळा, महाविद्यालयांना कुलूप लावावे लागले. हा कालखंड एक-दोन महिन्याचा अथवा पाच-सात महिन्याचा नाही तर तब्बल दोन वर्षांचा झाला. आजही शाळा-महाविद्यालये बंद आहेत. या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये देशाचे आर्थिक नुकसान किती झाले हे कोटीत, अब्जामध्ये कोणालाही सांगता येईल अथवा त्याची गोळाबेरीज करता येईल परंतु दोन वर्षांच्या कालखंडात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता आले नाही. त्या विद्यार्थ्यांचे ज्ञानिक नुकसान किती झाले हे कुणच्याही व्यक्तीला, माणसाला अथवा तत्वदात्याला सांगता येणार नाही. कोरोनाच्या कालखंडामध्ये शाळा महाविद्यालये बंद झाल्यानंतर ऑनलाईन शिक्षणाचे धोरण शासनाने आखले खरे, परंतु ‘छडी लागे छम छम…. विद्या येई घम घम’,हे सत्यवचन ऑनलाईन शिक्षणाच्या धोरणातून तेवढेच सत्याला उतरले काय. ऑनलाईनच्या माध्यमातून अजागृ असलेल्या या देशाच्या कानाकोपर्‍यातील, वाडी-वस्तीतील, दर्‍या-खोर्‍यातील रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता आले काय! तर या सर्व प्रश्‍नांचे उत्तर नाही येते. केवळ आयुष्याच्या भीतीपोटी

आजच्या पिढीचे भविष्य पणाला

लागले आहे. हे नाकारता येणार नाही. काल इयत्ता दहावीचा निकाल लागला. तो निकाल परिक्षा न देता ज्ञानार्जन न करता राज्य शासनाने लावला. अनेक निकषानंतर निकाल कसा द्यायचा याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या ज्ञानार्जनात जी भर पडली होती त्या ज्ञानार्जनाच्या भरीची उतराई कालच्या निकालामध्ये आपल्याला पहावयास मिळाली. 99 टक्के निकाल लागल्याची घोषणा शिक्षण मंडाकडून करण्यात आली. परंतु हा 99 टक्क्यांचा निकाल देताना विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक निकालाच्या टक्केवारीएवढा झालाय का? केवळ परिस्थिती बिकट आहे आणि या बिकट परिस्थितीला तोंड देताना ज्ञानार्जनाची सेवा देता आली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या उद्देशापोटी हा निकाल दिला गेला. निकाल देताना जे काही निकषे लावली होती. आधीच्या वर्षातला त्या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक,चाचण्या यासह संबंधित शाळेतील शिक्षकांच्या भूमिकेतील अथवा शिफारशीतील गुण यात जोडले गेले होते. त्यामुळे निकाल हा सरसकट पासचा असेल हे अपेक्षित होते. विद्यार्थ्यांचा निकाल लागला. विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झाले. मेहनत न करता, शाळेत न जाता विद्यार्थी पुढच्या वर्गात जावून बसले. याचा आनंद जेवढा त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना असेल तेवढीच चिंता विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना याची आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवताना त्याला जे अपेक्षित ज्ञानार्जन मिळायला हवे असते ते मिळत नसताना केवळ ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ या परिस्थितीत पासआऊट होत असेल तर तो विद्यार्थी भविष्याच्या रेसमध्ये टिकेल काय? आज कोरोनाने आपलं आयुष्य घरबंद केलं असलं तरी आजच्या पिढीच्या भविष्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन मिळत नसेल आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्रोटक शिक्षण दिलं जात असेल,घरी बसूनच स्वाध्याय माला देऊन त्या आधारावर निकाल दिला जात असेल तर पक्ष्याच्या डोळ्यावर लक्ष असणारा अर्जुन तुम्हा-आम्हाला मिळेल का? याचा विचार आता व्हायलाच हवा. आयुष्याचा विचार करताना लोकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करताना आता त्यांच्या

भविष्याचा विचार व्हावा

दोन वर्षांच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांनी शाळा पाहितली नाही. विद्यार्थी घडण्याचा जो कालखंड असतो, ज्या वयामध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार घडले जातात, भविष्याचा वेध घेण्याची जी वेळ असते, खडतर रस्त्यावरून कसे जायचे, यशाचे शिखर कसे गाठायचे, उद्योग-व्यवसाय, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, न्यायकारण याकडे कसे पाहितले जाते. चांगले काय असते, वाईट काय असते. भविष्यासाठी काय करावे लागते. संस्कार काय असतात, संस्कृती काय असते, कलेला किती महत्व द्यायचे असते, एखाद्याच्या विद्यार्थ्याच्या अंगात कला असेल तर त्याला वाव कसा द्यायचा, असे एक ना अनेक विद्यार्थ्यांना जडणघडण करण्याचे धडे जे पहिली ते दहावी म्हणजेच वयाच्या चौथ्या वर्षापासून पंधराव्या वर्षापर्यंत द्यायचे असतात. त्याच वयामध्ये ऑनलाईनद्वारे शिक्षण त्या विद्यार्थ्यांना पचणी पडणार आहे का? आजची परिस्थिती ही कोणावर बोट ठेवण्याची, आरोप करण्याची नसली तरी शिक्षणाच्या बाबतीत धोरण आखण्याची जबाबदारी नक्कीच शासन-प्रशासन व्यवस्थेसह तुमची-आमची आहे. दोन वर्षांच्या कालखंडामधले साडेचार ते सात वर्षे वयोगटातले राज्यातले आणि देशातले लाखो मुले आज घरी आहेत. त्यांनी आणखी शाळेचं तोंडही पाहितलं नाही. दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने ज्या मुलांचं वय आज आठ ते नऊ वर्षे आहे त्या मुलांना पहिलीच्या वर्गात टाकायचे की तिसरीत टाकायचे? हा जेवढा गहन प्रश्‍न आहे तेवढाच या तीन वर्षांच्या कालखंडामधला त्यांचा बुद्ध्यांक कसा तपासायचा? आणि त्यांचा बुद्ध्यांक वाढला नसेल तर त्याला जबाबदार तो, त्याचा पालक की आमची व्यवस्था ? हे प्रश्‍न कोणी आणि कोणाला विचारायचे? असे जेव्हा तुमच्या आमच्या लक्षात येईल तेव्हा आयुष्याची काळजी करत भविष्याची ओळख ओळखून पुढे जाण्यासाठी काय करता येईल याचा शोध आता घेतला गेला पाहिजे. दहावीचे विद्यार्थी पास झाले तसे अन्य वर्गातले विद्यार्थीही पुढच्या वर्गामध्ये जाणारच आहेत. परंतु कोरोनामुळे जे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते नुकसान त्या विद्यार्थ्याचे नाही तर भारताच्या भविष्याचे नुकसान म्हणावे लागेल. नक्कीच अशा भयान परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईनद्वारे ज्ञानार्जन केले आणि इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. त्या

गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन

परंतु हे अभिनंदन करताना दहावीचे विद्यार्थी आज महाविद्यालयीन जीवनामध्ये पदार्पण करत आहेत. आज त्यांचं वय अशा वळणावर आलं आहे की ते वय अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असतं. अशा वेळी या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा मिळाली नाही तर ते चुकीच्या दिशेने जावू शकतात. म्हणून पालकांसह शिक्षणप्रेमी आणि शासन व्यवस्थेने आता या नाजूक वळणावर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याहेतू प्रत्येक गावागावातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षण देणं गरजेचं आहे. भलेही त्यासाठी प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या पालकांना यामध्ये सामावून घ्यावं लागलं. त्यांची मदत घ्यावी लागली तरी ती प्रशासनाने घ्यावी. जो पालक आपल्या पाल्याच्या ज्ञानार्जनात मदत करत नाही अशांबाबत कठोर पावलेही उचलावेत. शाळेची फिस देणं, पुस्तक देणं अथवा शाळेचा गणवेश देणे म्हणजे पालकाची जबाबदारी आहे असे न समजता पालकाला या शिक्षणासारख्या पवित्र कार्यात सामावून घेत गावागावात कोरोनाच्या सर्व गाईडलाईन पाळून वर्ग सुरू करावेत, विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाकडे आता दुर्लक्ष करू नये, केवळ पुढील वर्गात धाडणे हा विषय आता बंद करावा, आता तरी पुढे हाच उपदेश ‘नका करू नाश आयुष्याचा’, असं म्हणत लोकांच्या आयुष्याला आणि आरोग्याला जेवढं महत्व व्यवस्थेकडून दिलं जात आहे तेवढच महत्व विद्यार्थ्यांच्या भविष्यालाही द्यावं.’

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!