Friday, August 6, 2021
No menu items!
Homeक्राईमअनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’ अटकेच्या भीतीने गायब? ‘ईडी’कडून शोधाशोध

अनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’ अटकेच्या भीतीने गायब? ‘ईडी’कडून शोधाशोध

मुंबई (रिपोर्टर):- मागील काही महिन्यांपासून अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला असून, रविवारीही देशमुख यांच्या दोन घरांवर ईडीने छाप टाकले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. 100 कोटींचं प्रकरण चर्चेत आल्यानंतर ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तपास सुरू केला. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या रडावर असून, देशमुख यांच्या मालमत्तांची झाडाझडतीही ईडीकडून केली जात आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची 4 कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारीही त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या छाप्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमु ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून वसुली करण्याचं टार्गेट पोलिसांना दिलं होतं, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीही एनआयए न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला होता. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या प्रकरणाचा सीबीआयकडूनही तपास केला जात आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, देशमुख यांनी प्रत्यक्ष हजर राहणं अशक्य असल्याचं कारण दिलं होतं. त्यानंतर रविवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील दोन निवासस्थानांवर छापे टाकले. काटोल आणि दुसर्‍या ठिकाणी असलेल्या घरांची झाडाझडती केल्यानंतर ईडीकडून देशमुख यांची चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता देशमुख यांचा फोन लागत नसल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून अटक होण्याची शक्यता असल्याने ते नॉट रिचेबल झाले असल्याची वृत्त आहे. अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आलेलं आहे. मात्र, तीनही वेळा अनिल देशमुख यांनी चौकशीला जाणं टाळलं. मागील आठवड्यात बजावण्यात आलेल्या समन्सपासून देशमुख नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा शोध ईडीकडून घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या पत्नी व मुलालाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!