Friday, August 6, 2021
No menu items!
Homeबीडग्राऊंड रिपोर्टींग हवेतील अतिक्रमणातून कोट्यावधींची उलाढाल!

ग्राऊंड रिपोर्टींग हवेतील अतिक्रमणातून कोट्यावधींची उलाढाल!

शहरात जागोजागी विद्युत खांब व खासगी इमारतीवरून काही विविध कंपन्यांचे केबल कनेक्शन जातांना दिसून येते. या केबल कनेक्शनमुळे शहराचे विद्रुपीकरण तर झालेच त्याशिवाय लाईनमन व पोलवरून जाणार्‍या केबलमुळे लोकांच्या घरात करंट उतरून घटनाही घडत आहेत. रिपोर्टरने केबल संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर अनेक तक्रारदारांनी केबलमुळे आमच्या घराचे मीटर जळाले, टि.व्ही.जळाल्या इतर ईलेक्ट्रॉनिक वस्तु जळून खाक झाले अशी माहिती दिली. त्या दृष्टीकोनातून शहरातुन जाणारा केबल किती सुरक्षित आहे, या केबल कंपन्यांनी कोणाच्या आदेशाने शहरात कनेक्शनचे जाळे पसरविले? या कंपन्यांना केबल कनेक्शन पसरविण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र कोणी दिले? या सर्व गोष्टी समोर असतांना महावितरण कंपनी व नगर पालिका ठोस पाऊले का उचलत नाहीत? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असल्याने नागरीकांना या केबलचा त्रास सहन करण्याची वेळ आलेली आहे. विद्युत खांबावरून जाणार्‍या खासगी केबलमुळे काही दुर्घटना घडली तर याला महावितरण कंपनी जबाबदार नाही. कारण की, महावितरण कंपनीने आपल्या कायद्यात अशासाठी तरतूद करून ठेवलेली आहे. तर मग केबलपासून नागरीकांचे होणार्‍या नुकसानला जबाबदार कोण? हा प्रश्‍न महत्त्वाचा असून नगर पालिकेने व महावितरण कंपनीने केबल अतिक्रमण संदर्भात संयुक्त मोहिम राबविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे बीड नगराध्यक्ष यांनी नागपुर पॅटर्न राबविण्यासाठी पुढाकार घेतला तर बीड नगर पालिकेला या खासगी केबलच्या माध्यमातून लाखो रूपयाचा महसुल मिळू शकेल. यासाठी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण यांनी आशेची किरण म्हणून पुढाकार घेण्याचा प्रयत्नही केला. परंतू कर्मचारी वर्ग अध्यक्षांच्या आदेशाला उदासीन दिसून आले. रिपोर्टरचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महावितरणचे अधिक्षक अभियंता यांनी तोंडी आदेश देवून लॅडर (सीडी) लावून अनाधिकृत केबल दिसेल तेथे तोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यादृष्टीकोणातून महावितरण कर्मचारी कामालाही लागले आहेत. परंतू अनेक ठिकाणी फक्त लोकल केबलच टार्गेट करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच या केबलमुळे शहरात विविध दुर्घटनाही घडल्या आहेत. सुदैवाने जिवित हानी झाली नसली तरी नागरीकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात या केबलमुळे झाल्याचे शहरातील काही परिसरातील नागरीकांनी सांगितले. ज्याअर्थी केबलमुळे एवढा मोठा धोका निर्माण होवू शकतो तर मग नगर पालिका व महावितरण कंपनी गप्प का? हा महत्त्वाचा प्रश्‍न असला तरी केबल संदर्भात प्रशासन उदासीन दिसून येत आहे. शहरातील विविध ठिकाणी केबलचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले दिसून येत आहे. काही ठिकाणी तर नवीन गोल पोल लावलेले दिसून येतात. हे पोल विद्युत विभागाचे तर नाहीत,या पोलवरून एका विशेष कंपनीचे केबल जातांना दिसून येतात. किमान या कंपनीने तरी पोल लावायची परवानगी घेतली का? नगर पालिकेने याची तरी चौकशी करावी. जेणेकरून अतिक्रमण धारक अतिक्रमण करतांना विचार करतील.
केबलचे जाळे शहरात कोठे पसरलेले आहे या दृष्टीकोनातून रिपोर्टरच्या प्रतिनिधीने शहरातील विविध भागात पाहणी केली. त्यावेळी केबलच नव्हे तर सीसीटीव्हीचे कॅमेरे सुद्धा विद्युत पोलवर फीट केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे जालना रोडवरील विद्युत भवनमधुन जाणार्‍या 11 के.व्ही.च्या लाईनमधुनही केबल जात असतांना दिसून आले. एवढेच नव्हे तर सावतामाळी चौक, माळीवेस येथे तर चक्क विद्युत खांबाला केबलच्या वायरचे गुच्छे बांधलेले आढळून आले. ज्यावेळी लाईनमन या खांबावर काम करण्यासाठी जाणार? त्यावेळी लाईनमन यांना अक्षरश: सर्व केबल तोडून खांबावर चढण्याची वेळ येते. अनेक वेळा खांबावरून जाणारे केबल कट होवून त्याच्यातून विद्युत प्रवाह घराघरात उतरलेला आहे. सुभाष रोडवर तर चक्क केबलचे वायर दिवसभर रस्त्यावर पडलेले दिसून आले. विशेष म्हणजे हे केबल सुद्धा खांबावरून रस्त्यावर आलेले होते. अशा प्रकारे शहराची विचित्र अवस्था या केबलमुळे दिसून येत आहे. जमिनीवर एखादा भाजीपालावाला भाजी विकत बसला तर नगर पालिकेचा कर्मचारी त्याच्याकडून दहा रूपयाची पावती वसुल करतो. परंतू हवेतून होणारे अतिक्रमण हे प्रशासनाला का दिसत नाही? याकडे महावितरण कंपनीने व नगर पालिकेने संयुक्त लक्ष देण्याची गरज असून या केबलच्या माध्यमातून हवेतील अतिक्रमणातून काही केबल कंपन्या कोट्यवधींची उलाढाल करते तर मग याचा त्रास नागरीकांनी सहन का करावा? तसेच नगर पालिका व महावितरण कंपनी या केबलकडे डोळेझाक का करते? हा सर्व चौकशीचा भाग असून 2018 साली औरंगाबाद हायकोर्टाने औरंगाबाद महानगर पालिकेला केबल अतिक्रमण संदर्भात आदेश देवून हे केबल हटविण्याबाबत सांगितले होते. त्याची अंमलबजावणी झाल्याने औरंगाबादचे सुशोभिकरण वाढले. त्याचप्रमाणे महावितरणचे कार्यकारी अभियंता हे या आदेशाला अनुसरून बीड जिल्हाधिकारी व नगर पालिका मुख्याधिकारी यांना पत्र व्यवहार करून लवकरच केबल अतिक्रमण संदर्भात ठोस निर्णय घेणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राहुल केकाण यांनी रिपोर्टरशी बोलतांना दिली. तसेच महावितरणचे कर्मचारी ज्या पद्धतीने पोलवरील केबल तोडून फेकत आहेत. तेच केबल काही केबल धारक एक इमारतीवरून दुसर्‍या इमारतीवर केबल कनेक्शन जोडतांना दिसून आले. इमारतीवरूनही केबल घेवून जाणे योग्य आहे का? किंवा नियमात आहे का? याचाही नगर पालिकेने विचार करावा.


नगराध्यक्षसाहेब,आपल्या पाठीमागे यंत्रणा कोलमडलेली
गेल्या सोमवारी शहरावर केबल अटॅक या मथळ्याखाली रिपोर्टरमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मंगळवारी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांना मोबाईलवरून नागपुर पॅटर्न विषयी डिटेल्स मागितले. शहराच्या विकासाचा मुद्दा असल्याने संपादक साहेबांनी तात्काळ रिपोर्टरच्या प्रतिनिधीला सांगुन उपलब्ध असलेली माहिती नगराध्यक्षांना देण्याचे सांगितले. तात्काळ रिपोर्टरच्या प्रतिनिधीने अध्यक्षांची भेट घेवून माहिती दिली. त्यावेळी उपस्थितीत अभियंता यांना नगराध्यक्ष यांनी आदेशित केले की, तात्काळ एमएसईबीचे व्यवहारे व रिपोर्टरचे प्रतिनिधी यांची मिटिंग लावून कार्यवाही करा. त्यावेळी ते अभियंता अत्यंत मुस्तेद पद्धतीने उभे राहून एस सर म्हणून अध्यक्षांना सांगितले. अध्यक्ष गेल्यानंतर संबंधित अभियंता यांनी व्यवहारे यांना फोन लावला असेल परंतू रिपोर्टरच्या प्रतिनिधीला कोणताही निरोप देण्यात आला नाही. नंतर स्वत: रिपोर्टरच्या प्रतिनिधीने संबंधित अभियंता यांना व्यवहारे साहेबांविषयी माहिती विचारली असता अभियंता यांनी सांगितले की, व्यवहारे यांचा फोन बंद आहे. असे म्हणून रिपोर्टरच्या प्रतिनिधीला व्यवहारे यांचा मोबाईल नंबर मॅसेज केला. त्यानंबरवर रिपोर्टरच्या प्रतिनिधीने कॉल केला असता कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आढळून आले. त्यानंतर व्हाटसअ‍ॅपवर मॅसेजही टाकला. परंतू व्यवहारे यांनी कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही. तब्बल आज सहा दिवस झाले तरी संबंधित अभियंता यांनी अध्यक्षांच्या आदेशाची कोणतीही अंमलबजावणी केली नाही. ज्या अर्थी नगराध्यक्ष आज नागरीकांच्या सुविधेसाठी दारोदार फिरून माणसे जोडत आहेत. परंतू अध्यक्षांच्या पाठीमागची यंत्रणा आजही कोलमडलेली दिसून येते. याकडे नगराध्यक्ष यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.


नुसते लोकल
केबलच टार्गेट का?

शहरात जागोजागी विद्युत खांबावरून किंवा एखाद्या इमारतीवरून विविध प्रकारचे केबल कनेक्शन जातांना दिसून येतात. यामुळे बीड शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झाले आहे. या संदर्भात रिपोर्टरने पुढाकार घेवून जनहितार्थ केबल संदर्भात वृत्त प्रकाशित केले. या केबलमुळे अनेकांच्या घरात करंट उतरून मोठ्या घटना घडलेल्या आहेत. केबल हा विषय छोटासा वाटला तरी या हवेतील अतिक्रमणातून अनेक केबल चालकांची कोट्यावधींची उलाढाल होते. या कंपन्या नगर पालिका किंवा महावितरण कंपनी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सर्रास केबल कनेक्शनचे जाळे शहरात पसरविल्याचे दिसून येत आहे. रिपोर्टरने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांनी लॅडर लावून केबल कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले. त्या दृष्टीकोनातून महावितरण कंपनीचे कर्मचारी दिसेल तिथे केबल कट करून फेकून देत असल्याचे दिसून येत आहे. ज्याअर्थी महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी फक्त लोकल केबल टार्गेट करण्याचेच गुत्ते घेतले का? असे चित्र दिसून येत आहे. जर शहराचे विद्रुपीकरण व लोकांच्या जिविताला धोका होवू नये म्हणून सरसकट केबल कट करणे गरजेचे आहे. नुसते लोकल केबल टार्गेट का?

Most Popular

error: Content is protected !!