बीड (रिपोर्टर) तहसील कार्यालयातून उत्पन्न प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कर्मचारी आगाऊ पैसे घेत असल्याचे वृत्त काल रिपोर्टरमध्ये प्रकाशीत झाल्यानंतर याची दखल तहसीलदार सुहास हजारे यांनी घेतली व या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नियमानुसार शासकीय फिस भरूनही कर्मचारी उत्पन्नाचे व भूमीहिन प्रमाणपत्र देण्यासाठी आगाऊ पैसे घेत आहेत. हे पैसे आपल्या नातेवाईकांच्या गुगल पे किंवा फोन पेवर टाकण्यासाठी सांगत असे. याबाबतचे वृत्त काल सायं. दैनिक बीड रिपोर्टरमध्ये प्रकाशीत झाल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये एकच खळबळ उडाली होती. या वृत्ताची दखल तहसीलदार सुहास हजारे यांनी घेत त्यांनी संबंधित कर्मचार्यांची चौकशी सुरू केली आहे. नातेवाईकांचे नंबर चेक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अनेक महिन्यांपासून तहसीलमधील काही कर्मचारी सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या लुटण्याचे काम करत आहेत. अशा कर्मचार्यांना जरब बसणे आवश्यक आहे.