Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख : उपदेशाच्या डोसात कोरोनाचे प्रश्‍न

अग्रलेख : उपदेशाच्या डोसात कोरोनाचे प्रश्‍न

गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाशी दोन हात करता करता गर्भगळित झालेला सर्वसामान्यआता निर्बंधांनी मेटाकुटीला आलाय. दोन वर्षांच्या कालखंडात आरोग्य जपण्यासाठी जो खटाटोप करावा लागला. त्यापेक्षा अधिक खटाटोप आता आयुष्य जगण्यासाठी त्या सर्वसामान्य माणसाला करावा लागत आहे. कोरोनाने घरबंद केल्यानंतर जे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले, कामधंदे बंद पडले त्यावेळी सर्वसामान्यांचे जे हाल झाले ते उभ्या जगाने पाहितले. या कालखंडामध्ये अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, हाताला काम मिळाले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घामाला जे मोल मिळायचे ते मोल त्यांना मिळालच नाही. घरामध्ये असलेली जमापुंजी संपुष्टात आली पहिल्या लाटेने जे हिरावलं त्यापेक्षा अधिक दुसर्‍या लाटेत गमवावं लागलं. आता संभाव्य तिसर्‍या लाटेची वाट पहात सर्वसामान्य अर्धमेल्यागत जिवन जगत आहे. ही परिस्थिती कोणालाही सुधारता येणार नाही का? असा प्रश्‍न आता जिथंतिथं उपस्थित होत आहे. या प्रश्‍नाबरोबर


उपदेशाचे डोस
जिथे तिथे दिले जात आहेत. आजपर्यंत उपदेश काही लोकच देत असायचे, परंतु आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा प्रत्येक माणूस उपदेश देताना दिसून येत आहे. कोरोनामध्ये अमुक केले तर तमुक होईल, त्या लोकांनी गर्दी टाळली असती तर कोरोना इतका वाढला नसता याची चर्चा उपदेश देणारे गर्दी करूनच करताना दिसून येतात. सर्वसामान्य ज्या पद्धतीने पारावर, चावडीवर गप्पा मारताना हे उपदेश देतात त्याप्रमाणे दिल्लीच्या भवनातही असे उपदेशाचे डोस सातत्याने मिळताना दिसून येतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी मन की बात तर कधी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशवासियांना आणि देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपदेश देतच असतात. काल-परवा नरेंद्र मोदींचे काही मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली. या बैठकीत पर्यटनस्थळाच्या गर्दीबरोबर चिंता व्यक्त करताना मोदींनी ते आवरायचे सांगितले. एवढेच नव्हे तर तिसर्‍या लाटेची चर्चा करणार्‍यांना त्यांनी खडसावलेही. ते बरेच झाले. तिसरी लाट येणार-येणार म्हणून दहशतीत असलेल्या सर्वसामान्यांसाठी हे खडेबोल दिलासादायकच परंतु हे खडेबोल सर्वप्रथम मोदींनी निती आयोगाला सुनावले असते तर अधिक बरे झाले असते. कारण सर्वप्रथम दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निती आयोगाने तिसर्‍या लाटेसंदर्भात भाष्य केले होते. आधीच दोन वर्षांपासून घरबंद असलेला माणूस उद्योग धंद्यांनी उद्ध्वस्त झाला त्यात आता निर्बंधाच्या आधारे थोडेफार काम करताना अथवा उद्योग-धंदे करताना दिसून येत आहे. त्यात तिसर्‍या लाटेच्या दहशतीबरोबर उपदेशाच्या डोसाने अक्षरश: तो बिथरून गेला. म्हणूनच अनेक ठिकाणच्या व्यापार्‍यांनी


बंड पुकारण्याचा
विचार केला. मुंबर्ध, पुणे, कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरातील व्यापार्‍यांनी आम्ही निर्बंध पाळणार नाहीत, आता बस्स झाले, आमचे उद्योग धंदे कोलमडले, आमची आर्थिक हानी झाली, कर्ज घेतलेल्या व्यवसायिकांचे दिवाळे निघाले. त्यामुळे आता आम्ही निर्बंध पाळणार नाहीत, ही भूमिका त्यांनी घेतली. खरं तर व्यापार्‍यांनी बंडाचे हत्यार आधीच उगारायला हवे होते. त्यांचा संयम आतापर्यंत राहिलाच कसा? हा प्रश्‍न कोणालाही पडेल, परंतु या देशातला प्रत्येक माणूस हा देशप्रेमी आणि परिस्थितीची जाण असलेला आहे. त्यामुळे आपल्यामुळे आपल्या कुटुंबालाच नव्हे तर अन्य कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गेल्या दोन वर्षांपासून या उद्योग धंदे व्यवसाय करणार्‍यांनी आपल्या दुकानांना टाळे ठोकले. भलेही दिवाळे निघाले तरी हरकत नाही, परंतु जीव वाचला पाहिजे या भूमिकेत सर्वजण काम करत राहिले. परंतु आता या लोकांच्या नाकापर्यंत पाणी आलं आहे. आता ते सहन करण्याच्या मानसिकतेत नाहीत. अशा वेळी कोरोनाची भीती दाखवून गर्दी टाळणे हे शासन आणि प्रशासन व्यवस्थेला शक्य होणार नाही. आता कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखायची असेल तर लसीचे उपाययोजन होणे अत्यावश्यक आहे. देशभरातल्या नागरिकांचे दिवाळे काढण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारने हे लोक दिवाळी कशी साजरी करतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनाचा समुहसंसर्ग इतक्यात जाईल, हे सांगणे जेवढे कठीण आहे तेवढेच


कोरोनाला
सोबत घेऊन

आपले उद्योग-धंदे-व्यवसाय, कामधंदे आता करावे लागतील. ज्या पद्धतीने सर्वसामान्यांच्या घराच्या अर्थव्यवस्थेसह देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाने खीळ घातली आहे. त्या पद्धतीनेच देशभरातील भावी पिढीच्या भविष्यालाही कोरोनाने अक्षरश: जेरबंद केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळा,महाविद्यालये पुर्णत: बंद आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता येत नाही. तुटपुंज्या ऑनलाईन ज्ञानार्जनातून त्यांच्या ज्ञानात भर पडेलच हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादी पिढी उद्ध्वस्त होऊ नये, त्या पिढीचे भविष्य धुळीस मिसळू नये यासाठी आता प्रशासन व्यवस्थेला आणि शासन व्यवस्थेला कोरोनाविरुद्ध हाबुक ठोकावा लागेल. त्याबरोबर कोरोनाविरुद्ध डाव मारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि हा डाव मारायचा असेल, कोरोनाला धोबीपछाड करायची असेल तर सध्या तरी लस हा एकमेव धोबीपछाड असलेला डाव आहे आणि तो डाव टाकण्यामध्ये सरकार अपयशी पडत आहे. अद्याप देशभरात तीस-पस्तीस टक्केही लसीकरण झालेले नाही. आम्ही केवळ लसीवर भाष्य करतो आणि कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लादतो. आता केंद्राने उपदेशाचे डोस बंद करावेत, जबाबदारी स्वीकारावी आणि राज्या-राज्याला वेळेत लसीचा पुरवठा करावा तेव्हाच


कोरोना, गर्दी
आणि प्रश्‍न

सुटतील किंवा त्याचे समाधानकारक उत्तर सरकारांसह प्रत्येक व्यक्तीला मिळत राहील. जबाबदारी झटकून अथवा निर्बंधांचे हुकूम सोडून आता कोरोना संपणार नाही तर आर्थिकदृष्ट्या माणसे संपतील याची दक्षता आता सरकारांनी घ्यायलाच हवी. सरकार चालवताना कुठल्या काटेरी कुंपणावरून चालावे लागते हे ज्याला त्यालाच माहित असते. असे जरी म्हटले जात असले तरी दोन वर्षांचा कोरोनाचा अनुभव पहाता आता कोरोनाला भिऊन घरात राहण्यापेक्षा कोरोनाशी दोन हात करण्याइरादे लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. तेवढेच आज मितीला सरकारच्या माथी कुठलेही प्रश्‍न मारणार्‍या सर्वसामान्य नागरिकांनीही कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ आम्ही निर्बंध पाळणार नाहीत, आम्ही दुकाना उघडणार, हा अट्टाहास करण्यापेक्षा कोरोना काळामध्ये समुहसंसर्ग न होता आपल्याला कसे चालता येईल, आपल्याला कसे वागता येईल याकडे जोपर्यंत प्रत्येकाचे लक्ष जात नाही तोपर्यंत कोरोना, गर्दी याचे उपाययोजन होणार नाही आणि प्रश्‍न सुटणार नाहीत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!