बीड(रिपोर्टर): सासरच्या जाचाला कंटाळून एका 21 वर्षीय विवाहित महिलेने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये चांगलाच राडा झाला. मयत महिलेच्या आईने सासूला चपलाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कोमल अतुल लोखंडे (वय 21 वर्षे), रा.परभणी ह.मु. परळी या महिलेने विषारी औषध प्राशन केल्याने तिला अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणाहून तिला जिल्हा रुग्णालयामध्ये घेवून येत असतांना रस्त्यात तिचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालय परिसरात दोन्हीकडचे नातेवाईक जमा झाले होते. यावेळी मयत महिलेच्या सासूला तिच्या आईने रुग्णालय परिसरासमोरच चपलाने मारहाण केली यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.