Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीयनिसर्गाचा कोप

निसर्गाचा कोप

निसर्गात नेहमीच बदल होतो. काही बदलामुळे मानसाला मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात. माणसाने नेहमी निसर्गावर एक प्रकारे अत्याचारच करणे सुरु केले. जेव्हा पासून तंत्रज्ञानाचं युग आलं, तेव्हा पासून जास्तच निसर्ग बदलू लागला. वाढत्या औद्योगीकरणामुळे हवामान दुषीत होत आहे. नद्यांचे मुळ स्वरुप बदललं. पाऊस कमी, जास्त पडू लागला. दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षापासून देशात चांगला पाऊस पडत असला तरी काही ठिकाणी ढगफुटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान होवू लागलं. अलीकडच्या काळात ढगफुटीचे आणि वीजा पडण्याचे प्रमाण वाढले. नद्यांना महापुर येवू लागले, माणसं वाहून जावू लागले. नदीच्या काठी माणसाने पक्के घरे बांधले. पुर आला की, लोकांच्या घरात पाणी घुसू लागलं. मोठ्या नदीच्या पात्रातील पुराचं पाणी लवकर ओसरत नाही. या पुरात होत्याचं नव्हतं होतं. पुर्वी लोक नदी काठी राहत होते, कारण नदीच्या जवळ पाण्याची सोय होती, आज तसं नाही. विज्ञानाच्या प्रगतीमुळे बोअर, विहीरींची संख्या वाढली. त्यामुळे नदी काठी घरे बांधणे तितके महत्वाचं नाही. तरी लोक अतिक्रमण करुन किंवा प्लॉटींग पाडून नदीच्या जवळ घरे बांधून स्वत:चा जीव धोक्यात घालतात हा माणसांचा हावरट आणि वेडपटपणा नाही का? वाढती लोकसंख्या हा एक महत्वाचा मुद्दा आहे. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर तितकाच होवू लागला. मात्र याचा विचार केला जात नाही. राज्यकर्ते सत्तेला जास्त महत्व देवू लागले. सत्तेतून समाजकरण, निसर्गाचा बचाव केला जात नाही. राजकारण हा देशाचा आणि जगाचा महत्वाचा भाग बनला आहे. कोणत्याही देशात राजकारणालाच जास्त महत्व दिलं जातं. निसर्गावरील आघात थांबवा असं निसर्गप्रेम नेहमीच ओरडून सांगत असतात,पण जागतीक संघटना किंवा त्या-त्या देशातील राज्यकर्ते निसर्गाची होणारी हाणी टाळत नसल्याने निसर्ग आपलं रौद्ररुप दाखवू लागला आहे.

दरड कोसळणं, अतिवृष्टी

राज्यात डोंगराळ भाग जास्त आहे. ज्या भागात डोंगर आहेत. त्या भागातील डोंगर पोखण्याचं काम बिल्डर मंडळी करु लागली. डोंगर पोेखरणं म्हणजे निसर्गाचा र्‍हास करणं असचं आहे. काही ठिकाणी माणसांनी डोंगरावर घरे बांधली. डोंगरावर घरे बांधणारांना जास्तीचा पाऊस पडल्यामुळे धोका निर्माण होवू शकतो याचा विचार संबंधीत घरे बांधणारे करत नाही. आजचं भागत आहे. उद्याचं, उद्या बघू अशी मानसीकता लोकांची झाली. दरड कोसळ्ण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या. डोंेगर पोखरुन रस्ते तयार करणे, घरे बांधणे यामुळे अशा घटनांना आमंत्रण मिळू लागलं. दरडी कोसळल्यामुळे आता पर्यंत कित्येकांचा मृत्यू झालेला आहे. यातून लोकांनी कुठलाही बोध घेतला नाही. माळीण सारखं अख्ख गावचं दरड कोसळ्ल्यामुळे गाडलं गेलं आहे. हा भयानक प्रकार होता. ही घटना आज आठवली की, अंगावर काटा येतो. यावर्षी राज्यातील कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या पाच-सहा दिवसापुर्वी पावसाने धुमाकुळ घातला. जास्तीच्या पावसाने दरडी कोसळून कोकणात मोठे नुकसान झाले. नद्यांना पुर आले. लोकांचे घरे, माणसे वाहून गेले. दरड कोसळल्यामुळे कित्येक घरे मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली. त्यात माणसं ही गाडले गेले आहेत. अजुनही मृतदेहांचा शोध सुरुच आहे. आता पर्यंत १४९ लोकांचा मृत्यू झाला. लोकांचे संसार उध्दवस्त झाले. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आता पुन्हा सावरणं ही मोठी कसरत आहे. काही कुटूंंबातील सगळेच सदस्य मरण पावले. काहींचा पिता तर काहींचे माता, भाऊ, बहीण, लहान मुले यात मरण पावले आहे. महाराष्ट्रावर आलेलं हे मोठं संकट आहे. कोरोनाचा संकटकाळ संपला नाही, तोच पुन्हा दुसरा संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यकर्त्यांनी घटना स्थळी भेटी देवून लोकांचे सांत्वन केले असले तरी ज्यांच्या घरातील लोक मरण पावले ते थोडे परत येणार आहेत? दु:ख पदरी ठेवून पुढचं पाऊल टाकण्याची वेळ संकटातून वाचलेल्या लोकांवर आली आहे. ज्यांचे संसार उध्दव झाले जे संकटातून वाचले त्यांचे पुर्नवसन किती दिवसात होईल?

नियोजनाचा अभाव

कुठलंही शहर वसवतांना नियोजन करायला हवं, पण नियोजनाचा अभाव असल्यामुळे माणसांना त्याचा जबरदस्त फटका बसत आहे. शहरे हे अजगरासारखे वाढू लागले. ग्रामीण भागातील लोक शहरात येवू लागले. त्यामुळे लोक कुठं ही सिमेंटचे जंगले तयार करु लागले. शहराच्या ठिकाणी पाण्याचा व्यवस्थीत निचरा होत नाही. त्यामुळे पाणी कोंडून लोकांच्या घरात घुसतं. रस्त्यावर पाणी जमा होतं. नाल्या व्यवस्थीत नसतात. शहराच्या जवळ ज्या काही नद्या, नाले आहेत, ते बुजले जात आहे. नद्या बुजवल्यामुळे पावसाचे पाणी कुठं जाणार? जास्तीचा पाऊस पडला तर मग शहरात आणि शहराच्या बाहेर पाणीच,पाणी होवून हाहाकार माजतो. नगर पालिका, महानगर पालिका आपल्या विकासाच्या अजेंडयावर ठाम राहत नाही. निवडणुकी पुरत्या नुसत्या बाता मारल्या जातात. निवडणुका झाल्या की, पुन्हा जशास तसे असं होत असल्याने शहरात राहणार्‍या लोकांचे पावसाळ्यात मोठे हाल होत असतात. आठ-आठ दिवस काही ठिकाणाचं पाणी कमी होत नाही. पाण्यात लोकांना प्रवास करावा लागतो. पाण्यातच राहण्याची वेळ लोकांवर येते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारखे शहरे नेहमीच तुंबतात. या शहरातील लोकांच्या समस्या बारा ही महिेने कायम असतात. बडे शहरे ज्या प्रमाणे वाढतात. त्या प्रमाणात लोकांना सुविधा मिळत नाही, मग त्यातून लोकांचे हाल होतात. जुन्या इमारती कोसळून लोक मरत आहेत. मुंबईत असे प्रकार वाढले. या पावसाळ्यात अनेक इमारती पडून लोकांचा जीव गेला. शहरातील समस्या जाणून घेवून त्यानूसार नगर प्रशासनाने कामे केली पाहिजे. जितकं प्रशासनाच्या हातात आहे ते प्रशासन का करत नाही?

किती बदललं

निसर्गाने माणसाला किती दिलं? पण निसर्गाला माणसाने काय दिलं? उलट निसर्ग संपवायला माणुस निघाला? दर्‍या, खोर्‍या, डोंगर, नद्या, नाले, ही सगळी निसर्गाची देण आहे. यातून निसर्ग किती छान वाटतो. मात्र आज बघितलं तर निसर्गावर रोजच घाव पडत आहेत. डोंगर संपुष्टात येवू लागले. नद्या, नाले बुजले जात आहेत. पुर्वी झाडांची काय दाटी असायची, झाडांच्या गर्दीत लोकांना वाटा शोधाव्या लागत असे. आज सगळीकडे नुसतं भकास दिसून येतं. झाडांची संख्या किती असावी असा प्रश्‍न नेहमीच निर्माण होत आहे. राज्यात दोन ते तीन टक्केच वनराई आहे. नियमानुसार ३० ते ३५ टक्के झाडे असावे. जेणे करुन झाडांची संख्या चांगली असेल तर पर्यावरण चांगलं राहिल. झाडेच नसतील तर पर्यावरण कसं चांगलं राहिल? विकासाच्या हावरटपणामुळे माणसांनी झाडावर कुर्‍हाड चालवली. झाडे तोडली पण तितके झाडे पुन्हा लावलीच नाहीत. हायवे रस्ते करण्यात आले. या रस्त्यावरुन आज गाड्या चांगल्या पळतात, रस्ते बनवण्यासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात आली. निसर्गावर वार करुन विकास होत असेल तर त्या विकासाला काय अर्थ आहे? चांगली जमीन प्लॉटींगमध्ये जात आहे. अतिरिक्त खत, औषधामुळे जमीनीचा पोत खराब होवू लागला. राना-वणात राहणारा माणुस विज्ञानामुळे प्रचंड बदलला? बदलत्या जीवनशैलीमुळे कितीतरी जीव,जंतूच्या जाती नष्ट झाल्या आहेत. जंगल संपुष्टात येवू लागल्याने प्राणी शहराकडे येवू लागले. माणसाने जिथं,तिथं आपलं वर्चस्व निर्माण करुन ठेवलं त्यामुळे वातावरण बदलत आहे. त्याचे फटके आज सहन करावे लागत आहे.

आता तरी जागं झालं पाहिजे

आता पर्यंत ६० टक्कयापेक्षा जास्त पर्यावरणाचा नाश झाला असल्याचे तज्ञ सांगत आहेत. जागतीक पातळीवर पर्यावरण वाचवण्यासाठी विशेष काही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे जगातील प्रत्येक देशाला कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो. पेट्रोल, डिझेलसाठी आखाती देशात नुसते खड्डेच खुड्‌े खोदून ठेवण्यात आले. कोळशाच्या खाणी खोदल्या जातात. यामुळे त्या-त्या भागातील जमीन धोकादायक बनली. समुद्रातून गॅस काढला जातो. बोअरच्या माध्यमातून जमीनीतील जुना पाण्याचा साठा उपसला जातो. समुद्राची खोली, रुंदी माणसाने शोधून काढली. नको, त्या ठिकाणी माणसाने हात घातला, त्यावर आपला हक्क सांगितला. त्यामुळे निसर्गाचा जो खरा अंश आहे तो संपवण्याचं काम होवू लागलं. लाखो वर्षापासून माणुस पृथ्वीतलावर वास्तव्य करत आहे. गुहेत राहणार्‍या माणसात इतका बदल होईल असं कुणीच विचार केला नव्हता. गेल्या दोनशे वर्षापुर्वीच्या माणसाला आजच्या जगाचं चित्र काढ म्हटलं असतं तर त्याला ते काढता आलं नसतं. आज माणुस बसल्या-बसल्या जगात कुठेही संपर्क साधू शकतो. जेणे करुन पुर्वी हे कधीच झालं नव्हतं, ते आज होत आहे. जग जोडण्यासाठी माणसाला कित्येक वर्षाचा कालावधी घालावा लागला. जेव्हा विज्ञानाचा शोध नव्हता तेव्हाचा माणुस पुर्णंता जुन्या वाटचालीवर प्रवास करुन आपलं जीवन जगत होता. त्यामुळे निसर्ग अबाधीत होता. दगडाच्या हत्यारापासून माणसाने शिकारीला सुरुवात केली. तेव्हा पासूनच त्याच्यात बदल होत गेला. आज माणसं संपवण्याचे शस्त्र माणसाने निर्माण करुन ठेवले. पृथ्वीच्या भोवती नेमक्या काय हालचाली होतात याचं निरीक्षण माणुस करत आहे. त्याने अनेक ग्रहांचा शोध लावला, हे सगळं करत असतांना. माणसाने पृथ्वीचा र्‍हास थांबवलेला नाही. जग येत्या काही वर्षात आणखी खुप पुढे जाणार आहे. पुढच्या भविष्यात काय दडलेलं आहे हे सांगणं कठीण आहे. निसर्गाचा बिघडलेला समतोल पाहता, पुढचा प्रवास धोक्याचाच आहे हे मान्य करावं लागेल. आज निसर्ग जागो,जागी कोपत असून तो धोक्याचा इशारा देत आहे, हे धोक्याचे इशारे माणसाने समजुन घेतले पाहिजे, नसता विनाश अटळ आहे.

Most Popular

error: Content is protected !!