Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeकोरोनाना.मुंडेंच्या आदेशानंतर प्रशासन ऍक्शन मोडमध्ये

ना.मुंडेंच्या आदेशानंतर प्रशासन ऍक्शन मोडमध्ये


जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेकपोस्टची तयारी; केजमध्ये मुख्याधिकारी रस्त्यावर,बीड शहर मात्र वार्‍यावर
बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काही कठोर निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासन ऍक्शनमोडमध्ये आल्याचे दिसून येत असून प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी आदेश काढत जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट आणि अँटीजेन टेस्टची तयारी सुरू झाली आहे. तर ईकडे केजमध्ये मुख्याधिकारी विकेंड लॉकडाऊनसाठी रस्त्यावर उतरले आहेत. बीड शहरात मात्र विकेंड लॉकडाऊन वार्‍यावर असल्याचे दिसून येते. ज्या तालुक्यामध्ये रूग्ण वाढिची संख्या जास्त आहे त्याठिकाणी उपाय योजन महत्त्वाचं असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासन आता कामाला लागलं आहे.


जिल्ह्यामधील आष्टी गेवराई शिरूर आणि पाटोदा या तालुक्यात कोरोना च्या दुसर्‍या लाटेतील बाधित रुग्णांची संख्या अद्याप कमी झाली नाही. ही रुग्णसंख्या तातडीने आटोक्यात आणणे गरजेचे आहे. या रुग्ण संख्येचा अतिरिक्त ताण तिसर्‍या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आष्टी, गेवराई, शिरूर आणि पाटोदा या चार तालुक्यांमध्ये संलग्न असलेल्या नगर तालुक्यातील लोकांचे येणे जाणे हे निर्बंधित व्हावे व त्यावर नियंत्रण आणावे या दृष्टिकोनातून आष्टी, गेवराई, शिरूर आणि पाटोदा या तालुक्यांच्या सीमांवर चेक पोस्ट लावणे गरजेचे आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी काढले आहेत. त्या नुसार आज दुपार नंतर जिल्हाच्या सीमाभागात चेकपोष्ट लावण्यात येणार आहेत.
नगर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात चेक पोस्ट लावण्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांना खालीलप्रमाणे आदेशित करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यामधील आष्टी, गेवराई, शिरूर आणि पाटोदा या तालुक्यांमधील सर्व क्षेत्रीय पोलीस अधिकार्‍यांनी अहमदनगर जिल्हयांस लागून असलेल्या सीमावर्ती भागातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्गावर चेक पोस्ट निर्माण करावेत. संबंधित तहसिलदार यांनी सदर चेक पोस्ट च्या ठिकाणी पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा परिषद यांच्याकडील कर्मचार्‍यांची नियुक्ती दोन शिफ्टमध्ये करावी व याबाबतचे आदेश दि.३१.०७.२०२१ रोजी पर्यंत निर्गमित करावेत . तसेच संबंधित तहसिलदार यांनी चेकपोस्ट ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही करावी. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सदर चेकपोस्ट ठिकाणी अँटीजन टेस्ट करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही अनुसरावी. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागांची राहील. दरम्यान उपरोक्त आदेशाचे पालन न करणार्‍या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.असे आदेश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी निर्गमित केले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!