Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- विधानसभेचं विद्यापीठ

अग्रलेख- विधानसभेचं विद्यापीठ

गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०

पैशातुन सत्ता, सत्तेतून पैसा अशी व्याख्या बनवून राहिलेल्या आजच्या राजकारणाकडे आणि राजकारण्यांकडे पाहिलं जात असतांना खरच राजकारण निखळ पाण्यासारखं स्वच्छ राहिलं आहे का? हा प्रश्‍न जेंव्हा केंव्हा महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पडला असेल तेंव्हा अपवाद म्हणून गणपतराव देशमुखांसारख्या समाजकारण करणार्‍या लोक प्रतिनिधीला उत्तर म्हणून समोर आणलं जात होतं. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या सात दशकात अनेक स्थित्यांतरे घडली, उलथापालत झाली, काहींचे होत्याचे नव्हते झाले तर काहींचे नव्हत्याचे होते झाले. परंतू एक नव्हे, दोन नव्हे तीन ते चार पिढ्यांचं नेतृत्व करणारे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास केला तरी कसा? प्रतिमा स्वच्छ आणि चारित्र्यावर थोडासाही डाग पडू दिला नाही तो कसा? याचा अभ्यास आजच्या राजकारण्यांनी नक्कीच करायला हवा. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल अकरा वेळेस एकाच विधानसभा मतदार संघातून निवडूण येत ५५ वर्षे विधी मंडळामध्ये कामकाज करणारे गणपतराव उभ्या महाराष्ट्रासाठी आबा म्हणून ओळखले जायचे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि उभ्या महाराष्ट्राने


विधानसभेचं विद्यापीठ
गमावलं. एखाद्या विद्यापीठाचे एखादे कुलगुरू असतात आणि काही विद्यापीठांचे नेतृत्व करणारे एक कुलपती असतो. राजकारणाच्या विद्यापीठाची गणपतराव देशमुख हे कुलगुरू नव्हे तर कुलपतीच होते. राजकारणाचा बाज हा पक्षाच्या ध्येय धोरण आणि वैचारिक पायावर आधारित असतो हे सर्वश्रुत आहे म्हणून की काय, मार्क्सवादी पक्षाच्या विचारधारेशी संलग्न असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून राजकारणापेक्षा समाजकारण करण्याचे धोरण आबांनी ६० च्या दशकामध्ये अंगीकारले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी पार पाडल्यानंतर समाजकारणाबरोबर राजकारणात येवून कष्टकर्‍यांसह गोरगरीबांचे प्रश्‍न सोडवणे हे आपले आद्यकर्तव्य असल्याचे जाणून आबांनी इ.स.१९६२ साली विधानसभेची निवडणुक लढवली. स्व.यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असलेल्या विधीमंडळात १५ मार्च १९६२ रोजी आमदारकीचा प्रारंभ करत आबांनी सर्व प्रथम महाराष्ट्राच्या विधी मंडळामध्ये पाय ठेवला. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आबा जेंव्हा बोलायला उठले आणि त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाचे धोरण राजकारण्यांनी कसे अंगीकारले पाहिजे? त्याची निकड किती? हे जेंंव्हा आपल्या भाषणातून विधीमंडळालाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला सांगितले. तेंव्हा यशवंतरावांनी आबांच्या भाषणाची दखल घेतली. त्याच वेळी उभ्या महाराष्ट्राला एक निस्वार्थी समाजकारणी माणुस राजकारणात मिळाला. आबांचं कार्य हे साहेब म्हणून मिरवण्याचं नव्हतं तर कर्तव्य कर्मासाठी आयुष्य झिजवण्याचं होतं. १९६२ सालापासून सांगोल्याचं नेतृत्व करणार्‍या या माणसाने त्या मतदार संघातीलच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील प्रश्‍न असणार्‍या लोकांशी जी नाळ जोडून ठेवली ती आज पावेत कायम म्हणूनच गणपतराव देशमुख हे राजकारणातले


आजादशत्रु
ठरले. आजादशत्रु ही महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख जशी आहे तशी ती जगाच्या पाठीवर देशाच्या राजकारणाचीही आहे. अनेक वेळा अनेक राजकारण्यांबाबत आपण घृणास्पद आणि चीड निर्माण होणारे प्रकार, घटना ऐकतो आणि पाहतो. राजकारण हे एक बदनाम आहे. युद्धात आणि राजकारणात सर्वकाही क्षम्य असतं म्हणून सत्तेसाठी साम, दाम, दंडाचा वापर करत अनेक राजकारणी सत्ता मिळवण्यात यशस्वी होतात. परंतू लोकमत मिळवण्यामध्ये ते सातत्याने अपयशी असतात. कुठे ना कुठे त्या राजकारण्यांचे शत्रु कायम पहायला मिळतात. कुणी थेट गळा धरतो तर कोणी केसाने गळा कापतो परंतू या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये असे काही राजकारणी होवून गेले आहेत आणि आहेत की, त्यांचा कोणी गळाही धरू शकत नाही आणि केसाने गळा कापण्याचे स्वप्नातही आणुन शकत नाही. त्यामध्ये स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचाही समावेश करावा लागेल. अटलबिहारींना आजादशत्रु म्हणून देशभरातच नव्हे तर जगभरात ओळखले जाते. त्या प्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात गणपतराव देशमुख यांनाही ओळखण्यात येते. गणपतरावांनी अकरा वेळेस निवडुण येतांना लोकांची विश्‍वासर्हता कमावली तरी कशी? त्याचे गमक काय? हे प्रश्‍न सत्तेसाठी स्वार्थलेल्या राजकारण्यांना कायम पडले. परंतू गणपतरावांचे विजयी यशाचे गमक स्वार्थलेल्या राजकारण्यांनी कधीच उमजून घेतले नाही.


गणपतराव म्हणजे?

हा राजकारणात पदार्पण करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा अभ्यासाचा विषय असेल. साधी राहणी आणि उच्च विचार असणार्‍या गणपतरावांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीही सत्तेचा दर्प आंगाला लागू दिला नाही. सत्ता म्हणजे काय हो? असं साधं प्रश्‍नातलं उत्तर देत बोलणारे आबा सत्ता म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चालवलेल्या राजकारभरातला सेवक म्हणत आबांनी उभं आयुष्य काम केलं. इथं ग्रामपंचायतीचा सरपंच झाला की स्कार्पिओ घेणारा राजकारणी आपण नेहमी पाहतो. परंतू गणपतरावांनी सरशेवट एसटी बसने प्रवास कायम ठेवला. पैशातून सत्ता मिळवली नाही आणि सत्तेतून पैसा मिळवला नाही. जेंव्हा केंव्हा विधी मंडळामध्ये गेले तेंव्हा-तेंव्हा त्यांनी लोकांचे प्रश्‍न मांडले. कष्टकर्‍यांचा, सर्वसामान्यांचा आणि शेतकर्‍यांचा आवाज बनून राहिलेल्या गणपतरावांनी आमदारकीची येणारी पेन्शन लोकांसाठी वापरली. देशाचे राष्ट्रपती राहिलेले ए.पी.जे अब्दुल कलाम यांची विचारश्रेणी आणि गणपतरावांची विचारश्रेणी यात बहुतांशी साम्य दिसून येईल. इथं एकवेळेस निवडुण येतांना चांगल्या-चांगल्यांना घाम फुटतो तिथं एकाच मतदार संघात अकरा वेळेस निवडुण येणारा हा व्यक्त हेच सांगुन जातो. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमवण्याचा जो कोणी उद्देश ठेवील तो राजकारणामध्ये कायम स्वरूपी दिसणार नाही. परंतू जो लोकहिताचे प्रश्‍न घेवून विधीमंडळात जाईल तो कायम लोकांच्या हृदयात राहिल. आबांनी उभ्या आयुष्यामध्ये केवळ लोकांचे प्रश्‍न आणि समस्या हेच आपले मुख्य लक्ष असल्याचे सांगून काम केले. म्हणूनच आबांना आज विधी मंडळाचां विद्यापीठ म्हटलं जातं. परवा आबांचं वृद्धापकाळाने निधन झालं, काल त्यांच्या पार्थिवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज आबा शरिराने आपल्यात नसले तरी त्यांचा ५५ वर्षाचा समाजकारणाबरोबरचे राजकारण हा इतिहास महाराष्ट्राला दिशादर्शक राहणार आहे. अशा या आजादशत्रुला आणि विधीमंडळाच्या विद्यापीठाला रिपोर्टरचा लाल सलाम!

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!