Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- बालमजुरी, बालविवाह वाढले कोरोनात शिक्षण करपतयं!!

प्रखर- बालमजुरी, बालविवाह वाढले कोरोनात शिक्षण करपतयं!!

शाळेतून घेतलेल्या शिक्षणातून मुलांची जडण-घडण होते, पुर्वी शाळेविना शिक्षण होतं, त्यावेळी तशी परस्थिती होती, पण आजचा काळ बदलला. त्यामुळे बदलत्या परस्थितीवर माणुस स्वार झालेला आहे. शिक्षणाची पध्दत बदललेली आहे. तंत्रज्ञानाने बदल घडवले असले तरी ऑनलाईन शिक्षण पध्दत अजुन पुर्णंता रुजलेली नाही. त्याचा तितका विकास झाला नाही. काही अडचणीच्या काळात ऑनलाईन शिक्षण फायद्याचं ठरु शकतं. पुर्णंता ऑनलाईन शिक्षण हे मारक ठरू शकते. पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ऑफलाईन शिक्षण फायद्याचं ठरणारं असतं. लहान-लहान मुलांना ऑनलाईचं शिक्षण तितकं समजणारं नसतं. ऑनलाईन शिक्षणाचा फायदा किती विद्यार्थ्यांना होतो? सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्याला कारण कोरोना आहे. कोरोना जगाच्या मानगुटीवर अगदी घट्ट बसला. तो अजुनही पिच्छा सोडायला तयार नाही. दोन वर्षापासुन जग अस्थिर आहे. सगळीच व्यवस्था कोलमडून पडली. कोरोना आला खरा पण तो लवकर जाणार नाही हे ही तितकचं खरं आहे. कोरोनाची माणसांना सवय लावून घ्यावी लागणार आणि त्यानूसार जगावे लागणार, असं तज्ञ मंडळी सांगत आहेत. त्यामुळे पुर्णंता घरात बसून प्रश्‍न सुटणारे नाहीत. घरात किती दिवस बसणार? दोन वर्षापासून नुसतं लॉकडाउनची प्रक्रिया राबवली जाते. लॉकडाऊन करुनही कोरोनाला हद्दपार करता आलं नाही. आता तिसर्‍या लाटेचा धोका सांगितला जातो. कोरोनाच्या काळात शिक्षणाचं मोठं नुकसान झालं, हे नुकसान भरुन निघणारं नाही. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना विना परिक्षेचं पास करावं लागलं. यंदा मुलांना पास करण्यात आले, पुढचं काय? यावर्षीही शैक्षणीक वर्ष अजुन सुरु झालेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. #मुलांना काही येईना? शाळेला सुट्टी म्हटलं की, मुलांना आनंद होत असतो. सुट्टी एक किंवा दोन दिवसांची असते. मात्र कोरोनामुळे दोन वर्षापासुन शाळेला कुलूप आहे. नवीन-नवीन मुलांना या सुट्टयांचा आनंद वाटत होता. आता मात्र मुलचं सुट्टयांना कंटाळले. शाळा कधी भरेल असा प्रश्‍न मुलं आपल्या पालकांना विचारु लागले. शहरी भागात ऑनलाईच्या माध्यमातून पालक मुलाकडून अभ्यास करुन घेतात. शहरातील गरीब पालकांचे मुलं ऑनलाईनपासून लांबच आहे. ज्यांच्याकडे चांगला मोबाईल नाही. त्यांचा आणि ऑनलाईन शिक्षणाचा संबंध येत नाही. ज्यांची संध्याकाळच्या भाकरीची भ्रांत आहे. त्यांच्या मुलांचं अवघड आहे. अशीच अवस्था ग्रामीण भागातील मुलांची झाली. ग्रामीण भागात मुलांची संख्या जास्त आहे. काही बोटावर मोजण्या इतक्याच ग्रामीण भाागातील मुलांना ऑनलाईन काय भानगड आहे, हे माहीत आहे. पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुलांना ऑनलाईन बाबत पुर्णंता अज्ञान आहे. ज्यांचे पालक शिकलेले, म्हणजे ज्यांना शिक्षणाबद्दल आस्था आहे त्यांच्या घरी ऑनलाईनचं शिक्षण माहित झालं. इतर मुलांच्या बाबतीत पुर्णंत: शिक्षण दोन वर्षापासून बंद आहे. बहुतांश मुलं जुना अभ्यासक्रम पुर्णंता विसरुन गेले. त्यांना पाढे येत नाही. इंग्रजीचे शब्द येत नाही. चौथी पर्यंतच्या मुलांना मराठी वाचता येईना, बेरीज, वजाबाकीचे गणीत सोडवता येईना, अशी वाईट अवस्था मुलांची झाली. शाळा असल्यावर मुलांवर शिक्षकांचा धाक असतो. घरापेक्षा मुलं शिक्षकांचे जास्त ऐकतात. शाळेत काय शिकवलं याची प्रॅक्टीस रोज करत असतात. तसं घरात होत नाही. ज्यांचे आई-वडील मजुरी करतात. शेतात काम करतात. त्यांना आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ कुठं आहे? एखाद्याला असला तरी अभ्यासक्रमाचं ज्ञान मजुरांना आहे का? पालक आहे तसं चालू द्या ह्या भुमिकेत दिसून येत आहे.

बालमजुरांचे प्रमाण वाढले

लॉकडाऊनमुळे रोजगार गेले. शहरातील लाखो कामगार आपल्या गावी परतले. शहरात पुर्वीसारखे रोजगार राहिले नाहीत. त्यामुळे बहुतांश मजुर अजुनही आपल्या गावीच आहेत. गावात रोजगाराचं तितकं साधन नसतं. पडेल ती कामे कामगारांना करावी लागतात. कंपनीत काम करणार्‍या मजुरांना इतर छोटे कामे करण्यास कमीपणा वाटतो, पण विलाज नाही. घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तीवरच कुटूंबाचा गाडा चालत असतो. रोजगाराअभावी कर्ती माणसं घरी असल्यामुळे कुटूंब चालवणं मुश्कील झालं. ज्यांची मुलं मोठी आहेत. ती मुलं आपल्या वडीलांना हातभार लावण्यासाठी मजुरीचे कामे करतांना दिसत आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामात लहान-लहान मुलं पाहावयास मिळतात. शेतीतील लागवड करण्यापासून ते इतर कामे लहान मुलं करत आहे. त्यात मुलीचं प्रमाण जास्त आहे. शाळा बंद असल्याने सातवी, आठवीच्या मुली शेतात खुरपणीचं काम करतात. खुरपणीतून रोज दोनशे ते अडीशचे रुपये मिळतात. ज्या शेतकर्‍याकडे जनावरांची संख्या जास्त आहे. त्या शेतकर्‍यांचे लहान-लहान मुलं जनावराकडे दिसतात. काही मुली दुरवरुन जनावरासाठी गवत आणतात. कोरोना आल्यापासून सुदैवाने पाऊस चांगला पडत आहे, ही एक निसर्गाची मेहरबानीच म्हणाची. पाऊस वेळेवर पडला नसता, तर मग अवघड झालं असतं. शेती उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था काही प्रमाणात तग धरुन आहे. चांगल्या पावसामुळे शेतीत मजुरांची गरज भासू लागली. ज्यांनी कधी शेतीत काम केले नाही, ते लोक आज शेतीत काम करतांना दिसतात. मराठवाड्यात कापसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कापूस खुरपणीपासून ते वेचणीला जवळपास लहान मुलीच जास्त दिसून येतात. कोरोनामुळे शाळेत जाण्याच्या वयात मुलांना काम करण्याची वेळ आली. एकदा का मुलांना काम करण्याची सवय लागली की, ती मुलं पुन्हा शाळेकडे फिरकतील असं वाटत नाही. शाळेत गेली तरी त्यांचं मन शाळेत रमण असं वाटत नाही.

बालविवाह सर्रास होवू लागले

मुलगी थोडी मोठी झाली की, आई, वडील तीचं लग्न करण्याची घाई करतात. ग्रामीण भागात सर्रासपणे बालविवाह लावून दिले जातात. ज्या मुलींचं वय शाळेत जाण्याचं असतं. तिच्या गळ्यात लग्नाचं लचांड अडकवलं जातं. मुलीचं लग्न वयाच्या अठरा वर्षानंतरच करावं असा शासनाचा नियम आहे,तसा कायदा करण्यात आला, पण नियमाचं पालन करतयं कोण? ज्या ठिकाणी बालविवाह होऊ लागला. त्याची माहिती प्रशासन किंवा बालकांच्या हक्कासाठी काम करणार्‍या समाजसेवकांना झाल्यानंतर ते विवाह रोखतात. गेल्या वर्षभरात अनेक बालविवाह रोखण्यात आले. काही जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. बालविवाहच्या कायद्याचं उल्लघन करत लपून-छपून बालविवाह करण्याचे प्रमाण वाढले, पुर्वीपेक्षा लॉकडाऊमध्ये बालविवाह जास्त वाढले. सध्या मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे मुलांना मुली लवकर भेटत नाही. अनेक वरपिता मुलींच्या शोधात असतात. काही वरपिता स्वत: लग्नाचा खर्च करुन मुली करायला तयार असतात. कमी खर्चात लग्न होवू लागलं. हुंडा नाही. ही संधी पाहून काही वधूपिते आपल्या मुलीचे लग्न करण्यास तयार असतात. कमी वयात झालेले लग्न मुलीच्या मानसीक, आरोग्यावर परिणाम करणारे असतात. तरी याचा कुठलाही विचार केला जात नाही, हे कुठं तरी थांबलं पाहिजे.

पालकांची सहमती, शासन नाही म्हणतंयं!

शाळेअभावी मुलांचे होणारे नुकसान हे प्रत्येक पालकांना दिसते. शाळा कधी सुरु होतील याचा विचार पालक करत आहेेत. शाळा काही अजुन सुरु झाल्या नाहीत. आठवी ते बारावीच्या वर्गाला परवानगी दिली असली तरी शाळेत मुलं चांगल्या प्रमाणात दिसत नाहीत. शाळा सुरु कराव्या की,नाही या बाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यात ८१ टक्के पालकांनी शाळा सुरु कराव्यात, असं मत व्यक्त केलं होतं. पालकांची सहमती असतांना शाळा सुरु होत नाही. सत्ताधारी पुढारी आपल्या पक्षाचे विविध कार्यक्रम घेत आहे. निवडणुका होतात. अनेक कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडतात. त्या कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहत असतात. असं असतांना शाळा सुरु करण्या बाबत शासन रिस्क घेत नाही. रुग्ण कमी, जास्त झाले की, निर्बध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्बंधाला सगळेच कंटाळले आहेत. कोरोना दहा वर्ष संपला नाही तर दहा वर्ष शाळा भरवण्यात येणार नाही का? योग्य त्या उपाययोजना आखून शाळा सुरु करायला हरकत नाही. दोन वर्षापासून कोरोनाशी झुंज दिली जाते. दोन वर्षात देशाच्या आरोग्य व्यवस्थेत किती सुधारणा झाल्या? आरोग्याच्या बाबतीत आपला देश खुप मागे आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागा अजुन भरण्यात आल्या नाही. पुर्वीच्या कर्मचार्‍यांवरच काम धकवलं जातं. देशातील लसीकरणाचा वेग मंद गतीने सुरु आहे. केवळ दोन ते तीन टक्के लोकांना अद्याप पर्यंत लस दिली गेली. अशा पध्दतीने काम केल्यास कसा कोरोना अटोक्यात येणार? कोरोनाला रोखण्यासाठी अंग झटकून काम करण्याची गरज आहे. परस्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी आणखी किती दिवस लागणार? मुलांच्या भवितव्याचा विचार करुन शासनाने ठोस पावले उचलावीत. विद्यार्थ्यांचे कोवळे जीवनमान शाळेअभावी करपतेय याचे भान सत्ताधार्‍यांनी ठेवावे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!