Friday, January 28, 2022
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाच्या नावाखाली कर्मचार्‍यांच्या दांड्या जि.प., पं.स., तहसील कार्यालयात खुर्च्या रिकाम्या

कोरोनाच्या नावाखाली कर्मचार्‍यांच्या दांड्या जि.प., पं.स., तहसील कार्यालयात खुर्च्या रिकाम्या

जिल्हाधिकारी साहेब, कामचुकार कर्मचार्‍यांवर कारवाई होईल का?

बीड (रिपोर्टर):- बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या समुह संसर्गाने आधीच मेटाकुटीला आलेल्या जिल्हावासियांच्या मुळावर शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांची गैरहजेरी दिसून येत असल्याने सर्वसामान्यांचे छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे काम होत नाही. कार्यालयात ५० टक्के कर्मचारी हजर राहण्याबाबतचा सक्त आदेश असताना बीडच्या तहसीलसह जिल्हा परिषदमधील वेगवेगळ्या विभागातल्या कार्यालयामधील खुर्च्या सताड रिकाम्या दिसून येत आहेत. शेतकर्‍यांसह विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांचे अनेक कामे या दोन्ही प्रमुख कार्यालयामध्ये असतात. परंतु अधिकारी आणि कर्मचारीच कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे त्या लोकांची कामे अडून पडतात. आजपर्यंत दांड्या मारण्यात मश्गुल असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांवर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आज रिपोर्टरने वेगवेगळ्या कार्यालयात जावून परिस्थितीची पाहणी केली तेव्हा कार्यालयात कर्मचार्‍यांची शंभर टक्के अनुपस्थिती दिसून आली.

कोरोनाचा संसर्ग गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. सध्या कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होत असल्याने राज्य शासनाने शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती असावी, असे सक्तीचे आदेश बजावण्यात आलेले आहेत मात्र या आदेशाचे बीड जिल्ह्यामध्ये पालन होत नसल्याचे दिसून येते. ५० टक्क्यातही कर्मचारी कधीही येऊ लागले आणि कधीही जाऊ लागले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे आहे तशीच खोळंबून पडलेली आहेत. जिल्हा परिषदेमध्ये दररोज अनेक नागरिकांची ये-जा असते. या ठिकाणी काही नागरिक शैक्षणिक कामासाठी येत असतात. कार्यालयात आल्यानंतर शिक्षण विभागातील टेबल रिकामे दिसून येतात. कर्मचार्‍यांची वाट पहात कित्येक नागरिक घरी निघून जातात मात्र कर्मचारी काही कार्यालयाकडे फिरकत नाहीत. त्याचबरोबर जि.प.चा पशुसंवर्धन विभाग, बांधकाम विभाग, (पान ७ वर) आस्थापना विभाग यासह इतर विभागात शुकशुकाट दिसून दिसून येतो. ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे हाल आहेत त्याचप्रमाणे तहसीलचेही आहेत. तहसील कार्यालयात राशन कार्डासह इतर कामांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र सदरील कार्यालयात कर्मचारी हजर नसतात. कार्यालयात बसण्यापेक्षा कर्मचारी हॉटेल, टपर्‍या आणि इतर ठिकाणी फिरताना दिसून येत आहे. पंचायत समितीसह शहरातील अन्य कार्यालयात कर्मचारी हजर नसल्याचे आज दिसून आले आहे. ५० टक्केची सक्ती असताना किमान २० ते २५ टक्के तरी कर्मचार्‍यांची उपस्थिती असावी, निव्वळ शंभर टक्के अनुपस्थिती असेल तर शासकीय कामकाज कसे होणार? कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीबाबत वरिष्ठ अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करतात. आपल्या कार्यालयात कर्मचारी हजर असतात का याची शहानिशा वरिष्ठ करत नसल्यामुळेच कर्मचारी दांड्या मारण्यात पटाईत झाले असल्याचे दिसून आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी लक्ष घालून कोरोनाच्या नावाखाली दांड्या मारणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!