गणेश सावंत
मो. नं. 9422742810
वड्यावगळीच्या पैदासीचे विस्तारीकरण होतेय का? बापाला लपवून सापाचे उदात्तीकरण केले जातेय का? या विस्तारीकरणाला आणि सापाच्या उदात्तीकरणाला आत्ताच का पोसले जातेय? सापाच्या उदात्तीकरणाचे नाच कोणाच्या बीनवर नाचवले जातायत हे प्रश्न पडण्याचे मुख्य कारण औरंगजेबाचे पिलावळ महाराष्ट्रात ठिकठिकाणी वळवळ करतायत, या पिलावळांचे जन्मदाते कोण? हे पिलावळे कुठले उद्दिष्ट समोर ठेवून अशांततेचे कारण बनतायत, जिथे अखंड महाराष्ट्र हा स्वाभिमानावर आणि स्वतकर्तृत्वावर उभा राहिलाय, चार पातशाह्यांसह औरंगजेबाला गाडून ज्या महाराष्ट्राने स्वातंत्र्याचा खुला श्वास घेतला त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी औरंगजेबाचे उदात्तीकरणाचे निमित्त पुढे करत एकमेकांसमोर जात आणि धर्म दाखवला जातोय. माहिती तंत्रमानाच्या आणि विज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात धार्मिक द्वेष आजच्या पिढीला परवडणारा नाही. हे माहित असताना आणि मुख्य विकसित प्रश्न ज्वलंत असताना आजच्या तरुणांची माथी भडकवून स्वत:ची पोळी भाजणारे अख्ख्या पिढीचा विध्वंस करू पाहत आहेत. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे, तिथे ते डोक्यावर घेऊन नुसते नाचताना दिसतात. एकवचनी, एकपत्नी असलेले प्रभू राम जिथे चराचरात असायला हवेत, त्याच प्रभू रामाच्या नावावर राजकारण केलं जातय. यातून पिढी घडण्यापेक्षा पिढी बिघडण्यामध्ये आजच्या नेतृत्वांचेच षडयंत्र असेल तर काय म्हणावे. गेल्या दोन-तीन महिन्यांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात
औरंगजेबाची पिलावळे
जिथं तिथं वळवळ करताना दिसून येतायत. नगरमध्ये कोण औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाचवल्याचे कारण पुढे केले जातेय, बहुजनांचे नायक छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात मोबाईलवर औरंगजेबाचा डीपी ठेवला म्हणून दंगल घडतेय, बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये 14 वर्षाचं पोरगं औरंगजेबाचं उदात्तीकरण करतय, या सर्व घटनाक्रमांचा विचार केला तर जातीय दंगलीच्या षडयंत्राचा इथे घमघमाट सुटतय. आज खर्या अर्थाने तरुणाईला विकसित देशांबरोबर स्पर्धा करण्याइरादे ते ते विषय पुरवणे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु तसे न होता महाराष्ट्राच्या मातीत गाडलेले विषय समोर करून माथे भडकवण्याचा धंदा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला आणि चार पातशाह्यांना जेरीस आणले नव्हे नव्हे तर दिल्लीच्या औरंगजेबाला महाराष्ट्रात यावं लागलं आणि इथच स्वत:ला गाडून घ्यावं लागलं, हा इतिहास आहे. हा इतिहास सांगताना एखाद्या विशिष्ट धर्माला औरंगजेबाला जोडून आम्हीच हिंदुत्वाचा पुरस्कार करतो, हे सांगणे मुर्खपणाचे लक्षण म्हणावे लागेल. इतिहास सांगायचाच असेल, तर तो आणखी सकारात्मक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सांगता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थकारणाबाबत, समाजकारणाबाबत, शेती निष्ठतेबाबत, स्वराज्य रक्षणाबाबत, त्यांच्या मॅनेजमेंटबाबत अशा काही असंख्य गोष्टी आहेत, की त्यातल्या एका एका विषयात पीएच.डी. होईल. महाराजांच्या कुठल्याही गडावर गेले तर तिथे पाण्याचा स्त्रोत दिसून येतो. पाण्याबाबतचं नियोजन हे महाराजांकडून तुम्ही आम्ही शिकलो, परंतु आजही महाराष्ट्रातले काही जिल्हे सातत्याने तहानलेले असतात. याकडे कोणाचे लक्ष जात नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे बदमुर्खच. त्यांच्यावर कारवाई ती कठोर असायलाच हवी. परंतु जसा अफजल
खानाचा वध तसा कृष्णाजी
भास्कर कुलकर्णीचा मुडदा
हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य जडणघडणीतला महत्वाचा विषय. इथे मात्र अफजल खानाचा कोथळा आपण बाहेर काढलेला दाखवतो, परंतु अफजल खानाचा वकील असलेला कृष्णाजी मास्कर कुलकर्णी याने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीने वार केला तो चुकवत छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णीचा मुडदा पाडला. तो घरभेदी होता, हिंदू असताना तो अफजल खानाचा वकील होता. खान तर शत्रू होताच हो, त्याचा मुडदा पडणे अथवा त्याचा कोथळा बाहेर पडणे हे स्वराज्य रक्षकाचे आद्यकर्तव्य होते. मात्र स्वराज्यात राहून स्वराज्य निर्मात्याला विरोध करत खानाची नोकरी पत्करणार्या अथवा शत्रूची नोकरी पत्करणार्या व्यक्तीचा विषय किती मोठा असायला हवा. परंतु तो इतिहासात लपवण्याचा प्रयत्न केला गेलाय. विषय हिंदू आणि मुसलमानाचा आहे, आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आज खपवला जातोय. परंतु माझे शिवराय, कुठल्या एका जातीचे अथवा धर्माचे नव्हते तर ते अखंड महाराष्ट्राचे आणि स्वराज्य धर्म उभारणारे होते. जो स्वराज्याला आडवा येईल, जो स्वराज्याबाबत नडेल, जो स्वराज्यातील रयतेला पिडा देईल, त्याचा चौरंगा महाराजांनी केला. मग तो हिंदू असो वा मुसलमान. रांझेगावच्या पाटलाचं उदाहरण देता येईल. त्या बलात्कार्याला हातपाय तोडण्याची शिक्षा महाराजांनी दिली आणि अमलात आणली. जावळीच्या खोर्यातले मोरे असोत अथवा अन्य कोणी असतो जो स्वराज्याशी नडला तो महाराजांनी तोडला. हे इतिहासाचे दाखले एवढ्यासाठीच, आमच्या माथ्यामध्ये आणि आमच्या रिकाम्या मस्तकामध्ये इतिहास घुसवण्यापेक्षा इतिहासाचे अर्धवट दाखले देत जी धर्मांधता घुसवली जातेय ती अत्यंत धोकादायक आहे. धर्माची अफू खावून जातीय द्वेषाची नशा जेव्हा एखादा व्यक्ती करतो तेव्हा त्या घराचे नव्हे त्या राज्याचे नव्हे तर त्या राष्ट्राचे नुकसान होत असते. अशा
जात्यांद्यांना धर्म नसतो.
त्यांना जात नसते, हे जात्यांध गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. ती एक अशी प्रवृत्ती आहे, जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसून येते. वेगवेगळ्या जातीचे दोन वेगवेगळे मुले-मुली पळून गेले, लग्न केले तर दोन धर्मामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो, या धर्माच्या मुलाने त्या धर्माच्या मुलीला जीवंत मारले, तर तो एक मोठा विषय होतो, जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणली जाईल, असा मोठा केला जातो. मात्र तिथेच एका जातीचे दोघे असले की तिथे याने तिची हत्या केली, तर तो विषय तेवढा मोठा वटत नाही, अरे दोघेही गुन्हेगारच, त्यांची प्रवृत्ती ही ठेचलीच पाहिजे, मात्र इथे धार्मिक द्वेषाची जी पेरणी झालीय ना ती अत्यंत धोकादायक आहे. परवा परवा महाराष्ट्रामध्ये एक घटना उघडकीस आली, साने नावाच्या व्यक्तीसोबत सरस्वती वैद्य नावाची लिव इन रिलेशनमध्ये राहत होती. या क्रूर सानेने त्या मुलीची हत्या केली, तिच्या शरीराचे तुकडे केले, ते कुकरमध्ये शिजवले अन् कुत्र्याला खावू घातले, किती ही संतापजनक घटना. तळपायाची आग मस्तकाला गेली, साने हा हिंदू, सरस्वती हीही हिंदू. या घटनेतील क्रुरता ही मानवजातीला लाजवणारी. इथे विरुद्ध धर्माचा मुलगा असता अथवा मुलगी असती तर दोन्ही धर्माच्या लोकांनी जातीय आणि धार्मिक रंग देत उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर अखंड हिंदुस्तानाला वेठीस धरले असते. सोडा ओ, मानवजातीत जन्मलेले असे कुकर्मा ठेचलेच पाहिजेत. कारण त्यांना जात नसते, त्यांना धर्म नसतो. कु्ररता, नीचता हीच त्यांची जात असते. ही प्रवृत्ती मानवातून बाहेर पडली पाहिजे. तेव्हा आम्हाला
खरे राम
सापडतील. जगाच्या पाठीवर अखंड हिंदुस्तान असा एक देश आहे ज्या देशाला भुगोला बरोबर इतिहास आहे, कर्तृत्व आहे, स्वाभिमान आणि सामर्थ्य आहे. म्हणूनच या देशात राम आहे. मात्र इथेही करुणेचा आणि त्यागाचा सागर असलेल्या प्रभू रामाला मसल्स् दाखवून जय श्रीरामचे त्वेष दाखवतात तेव्हा खरेच आम्हाला राम कळले का? प्रभू रामाचे आचारण आपण करतोय का? हे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. प्रभू रामाच्या उभ्या आयुष्यात काय आहे? म्हणजेच रामायणात काय आहे? हा प्रश्न पडण्यापेक्षा रामायणात काय नाही, हा प्रश्न पडला तर अधिक बरे होईल. कारण रामायणात त्यागाची मुर्ती राम आहे, सहन करणारी सिता आहे, लढणारी सिता आहे. सुख आहे-दु:ख आहे, मित्र आहे, दगा फटका आहे, युद्ध आहे, सरशी आहे, पिछेहाट आहे, अमृत आहे, विष आहे, हनुमानाच्या रुपाने स्वामी भक्त आहे. या उलट रावणाचा सख्खा भाऊ बिभिशन रामाला मिळाला. बिभिशनामुळे रामाचा विजय सुकर झाला, म्हणून आपण म्हणतो ‘घर का भेदी लंका ढाये’, रामायणात प्रभू रामावर टिका आहे, राम आणि रामायण हे संपुर्ण विचार स्वातंत्र्य आहे. रामावर खुद्द रामायणातच वालीची रोखठोक टिका आहे, संतप्त सितेचे तिक्ष्ण व तीव्र टीका आहे. लक्ष्मण इतका प्रक्षुब्ध होतो, की आपल्या पित्याला म्हणजेच दशरथाला काम लंपट पिता म्हणतो, त्याला तात्काळ राजाच्या पदावरून पदच्यूत करुया, असे रामाला म्हणतो. रामायणाला हिंदू धर्माच्या विचार स्वातंत्र्याचा पाया रचला. एवढं काही शिकण्यासारखं असताना प्रभू रामालाही धर्माच्या जोखडात बांधलं जातय, प्रभू राम जर उच्चवर्णीयांचेच देव असते, कर्तेधर्ते असते तर त्यांनी शरबीच्या हातचे उष्टी बोरे खाल्ली असती? करुणेचा सागर असलेल्या या प्रभू रामाने त्या आदिवासी महिलेला गळ्याला लावलं असतं? विचार करा, विचार करा,
प्रभू राम आणि
छत्रपती शिवराय
यांच्या नावावर जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवण्यापेक्षा प्रभू रामाचे आचरण, छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आजच्या पिढीने अंगीकारणे गरजेचे आहे. तिथेच राम आहे अन् तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. जे तरुण प्रभू राम आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालतील त्यांचे विचार आचरणात आणतील, त्या तरुणांना जगाच्या पाठीवर कुठल्याही क्षेत्रात पराजय मिळणे अशक्य आहे. जिथे तिथे जय आणि जयच दिसेल. फक्त धार्मिक द्वेषातून पिढीने बाहेर पडावं. आणि राजकीय सत्ताकारणाची बेरीज करू पाहणार्या राजकीय कोल्हे-कुत्र्यांची प्रभू राम आणि छत्रपती शिवरायांच्या विचारानेच त्रेधातिरपिट करावी.