Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडलसीकरणानंतरच महाविद्यालय सुरू होणार-उच्च शिक्षणमंत्री सामंत

लसीकरणानंतरच महाविद्यालय सुरू होणार-उच्च शिक्षणमंत्री सामंत

वित्त विभागाची मान्यता मिळताच प्राध्यापकांची भरती
बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता युवा सेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला चार व्हेंटीलेटर दिल्याचे सांगून शिवसेना राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत असल्याचे सांगत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज बीड येथे पत्रकारांशी संवाद साधत बीडला शिवसेनेची एकच जागा असली तरी शिवसेना राजकारणाबरोबर समाजकारण मोठ्या प्रमाणावर करते. येथे जागा वाढवून घ्यायच्या का नाही? हे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री हे ठरवतील. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढवायच्या की नाही? हे ही तेच निर्णय घेतील. असे सांगून महाविद्यालयीन प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतरच महाविद्यालये उघडणार असल्याचे सांगून प्रत्येक जिल्ह्याला येणार्‍या लसीच्या कोठ्यापैकी 25 टक्के लस ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवा अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
   राज्यात फक्त दोनच ठिकाणी तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रिंटिंग आणि टेक्नॉलॉजी पदवीचा कोर्स आहे. बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथील 60 जागांपैकी 30 जागा कमी केल्या आहेत. कमी केलेल्या जागाही तंत्रनिकेतनच्या संचालकांशी बोलून त्या पुर्ववत केल्या जातील. राज्यात रखडलेली वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती वित्त विभागाच्या मान्यतेनंतर लगेचच सुरू केली जाईल. आतापर्यंत साडेचार हजार जागांच्या प्राध्यापक भरतीला सरकारने मान्यता दिली असली तरी फक्त 1600 जागा भरलेल्या आहेत. उर्वरित जागा भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून संचिका वित्त विभागाकडे गेलेली आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनंतरच निर्णय घेतला जाईल. राज्यामध्ये तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा काही ठिकाणी कमी होत आहे. मात्र याबाबतचे कारणे जाणून घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेतले पाहिजे किंवा तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थी वळला पाहिजे यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्नही केले जातील, असे सामंत यांनी या वेळी सांगितले. राज्यामध्ये एकमेव असलेल्या पत्रकारिता प्रशिक्षणासाठी पुणे येथील रानडे इन्स्टिट्युट प्रख्यात आहे. या इन्स्ट्यिुटमध्ये देशभरातील पत्रकार प्रशिक्षणासाठी येतात. मात्र हेही इन्स्टिट्युट एका गुत्तेदाराच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न  चालू आहे तो कदापिही सहन केला जाणार नाही, असेही सामंत या वेळी म्हणाले. प्राध्यापकांच्या भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षणासाठी 200 पॉईंट रोष्टर पद्धत राबविण्यासाठी समिती नियुक्तीचे वृत्त निराधार असून हे आतापर्यंत अशी समिती नियुक्त केलेली नाही. ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी 311 कोटी कालच संबंधितांकडे वर्ग केल्याचेही या वेळी सामंत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला युवा सेनेचे अंकित प्रभू, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, दुसरे शिवसेना जिल्हाप्रमुख आबासाहेब जाधव, बाळासाहेब अंबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!