Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeसंपादकीयदेह मृत्याचे भातुके कळो आले कौतुके राजकारणातल्या गावकुटाळांनो,पिंडीवरचे विंचू का होताय?

देह मृत्याचे भातुके कळो आले कौतुके राजकारणातल्या गावकुटाळांनो,पिंडीवरचे विंचू का होताय?

गणेश सावंत
अखंड विश्‍वाच्या सजीव सृष्टीवर कोरोनासारख्या अदृश्य शत्रूने हल्ला चढवून विश्‍वभरातल्या जनमाणसांना सळो की पळो करून सोडलय, गेल्या आठ महिन्याच्या कालखंडात भारत देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक देशात कोरोना महामारीने उच्छाद् मांडलाय. हे उघड सत्य डोळ्यांदेखत पाहत असताना या अदृश्य शत्रूशी एकजुटीने समयसुचकतेने लढा देण्याऐवजी राजकारणातले गावकुटाळ या महामारीचा आपल्या राजकारणासाठी कसा फायदा होईल, कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांच्या टाळूवरचे लोणी कसे खाता येईल, जळत्या सरणावर आपल्या स्वत:च्या भाकर्‍या कशा भाजता येतील, हेच उद्योग सध्या महाराष्ट्रातले अनेक राजकारणी करताना दिसून येत आहेत. सत्ताधारी असोत की विरोधक अशा वैष्वीक महामारीत तिचा सामना करण्यापेक्षा सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना या वैष्वीक महामारीला तोंड देण्यासाठी हिंमत देण्यापेक्षा जात-पात-धर्म-पंथ समोर ठवेून राजकारण करत असल्याने पुन्हा एकदा राजकारणातल्या गावकुटाळांमुळे कोरोनासारखा अदृश्य शत्रू तोंड वर काढत आहे. मात्र पिंडीवर विंचू म्हणून बसलेल्या गावकुटाळांमुळे ज्या लोकांना या अदृश्य शत्रुशी लढायचं आहे त्यांनाही लढता येत नाही. हे आता उघड होत आहे. सुरुवातीपासून केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने कोरोनासारख्या वैष्वीक महामारीकडे दुर्लक्ष केले. जगाच्या पाठीवरून मुंबई, दिल्ली आणि अन्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर ये-जा सुरु ठेवली आणि तेथूनच ही वैष्वीक महामारी भारतात घुसली. मात्र यानंतर या महामारीने शहरभरांना आपल्या विळख्या घेण्यास सुरुवात केली तेव्हा ही
महामारी
विशिष्ट समाजामुळेच फैलावत असल्याचे बेजबाबदार विधाने भाजपाच्या जबाबदार व्यक्तींकडून केले गेले. तब्लीग जमात आणि मुस्लिम समाजाला गेल्या चार महिन्यांपासून आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. देशभरात गावोगावात मुस्लिम विरोधात संशयकल्लोळ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यात येऊ लागले. मात्र कोरोना महामारी ही कुठली जात पाहत नव्हती, पंथ पहात नव्हती ना धर्म पहात होती, ती केवळ माणूस जात आणि सजीव सृष्टीवर हल्ला चढवत होती. सजीव सृष्टीतल्या सर्वश्रेष्ठ प्राणी म्हणून गणल्या गेलेल्या माणसांना मरणशय्येवर झोपवत होती आणि आहे. यमाच्या दारात नेऊन ठेवत आहे. सरकार व्यवस्था चालवणार्‍या तथागथीत बुद्धीजिवींना याची जाण नसावी, हे दुर्दैव म्हणण्यापेक्षा जाण असून आपलं राजकीय भविष्य अबाधित ठेवण्या हेतू या महामारीचं पहिल्याच दोन महिन्यात देशात जे राजकारण झालं त्या राजकारणापोटी अखंड हिंदुस्तानातले सर्व जात-पात-धर्म-पंथातले लाखो लोक यमसदनी गेले. वैष्वीक महामारीला रोखण्यापेक्षा ही कोणामुळे फैलावते आणि कुठली जात किती बेजबाबदार आहे, कुठला धर्म किती बेजबाबदार आहे हे दाखवण्यात जो रस जातीयवादी राजकीय गावकुटाळांनी दाखवून दिला त्याचा फटका अखंड देशातील सर्वसामान्य माणसांना बसला. कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करताना केंद्र सरकारने केलेलं अचानक लॉकडाऊन आणि त्यानंतर देशभरातील कामगारांची झालेली फजिती आणि त्या फजितीत पडलेले मुडदे आजही सरकार म्हणवून घेणार्‍यांना जाब विचारत आहे. मात्र एवढं सर्व झाल्यानंतर माणसातला माणूस जागा होईल, त्याच्यातला सत्व जागा होईल आणि माणसाला माणूस म्हणून पाहिल, असे वाटत असताना या वैष्वीक महामारीला आता तरी तुम्ही-आम्ही तोंड देऊ हा विश्‍वास निर्माण होत असतानाच महाराष्ट्रात पुन्हा वैष्वीक महामारीच्या खांद्यावर बंदुका ठेवून राजकीय गावकुटाळांनी आपलं राजकारण सुरू ठेवलं. त्यावेळेस जात आणि धर्म होता, या वेळेस महाराष्ट्रातले मंदिरे समोर केली गेले अन् भक्तीचा डांगोरा पिटवण्याऐवजी
धर्मांधतेचा घंटा
बडवण्याचे काम महाराष्ट्र भाजपाने सुरू ठेवले. गेली पाच वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले अभ्यासाच्या नावावर प्रत्येक प्रश्‍नाला झुलवत ठेवणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा चमु या वैष्वीक महामारीला रोखण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसह वंचितांबरोबर गोरगरिबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा फडणवीस आणि त्यांच्या चमुने राज्यातलं सरकार कसं अस्थिर होईल, त्यांना अनंत अडचणी कशा आणता येतील याकडे लक्ष ठेवले आणि गेल्या दोन महिन्यापंासून राज्यातले मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद केले. कोपरापर्यंत गरगटे वरपणारे, सागुतीचे बेत आखणारे जेव्हा मंदिर उघडण्यासाठी घंटा नाद करत होते तेव्हा ही भक्ती होती की, आसुरी आनंदाची नांदी आणावयाची होती हेच कळत नव्हतं. दिपावलीपूर्व महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये कोरोना परतीच्या पावलाने जात असताना दिसून येत होता. शहरे अनलॉक झाली होती, सर्व व्यवहार सुरळीत चालले होते, मात्र पुन्हा माणसातलं माणूसपण हरवलं गेलं, वैश्‍विक महामारीकडे दुर्लक्ष होऊ लागलं अन् पुन्हा गेल्या आठ दिवसांपासून मुंबई महानगरीसह राज्यातल्या अनेक शहरांमधील कोरोनाचे आकडे वाढत चालले. मंदिरे उघडली गेली, भक्तांची रेलचेल वाढली, ईश्‍वरासमोर निर्भयपणे माणूस भक्तीभावाने जावू लागला. मात्र या निर्भयपणातली निर्दयता ती सोशल डिस्टन्सची दिसून येतेय. दुर्दैव याचं वाटतं, या वैश्‍विक महामारीत कोरोनासारख्या अदृश्य शत्रुचा वध करायचा असेल तर एकत्र नव्हे तर एकट्या एकट्याने त्याचा खात्मा करता येतो. परंतु राज्यातल्या ठाकरे सरकारला हे यश येईल आणि आपलं राजकारण संपुष्टात येईल या भीतीने भारतीय जनता पार्टी ज्या बेजबाबदारपणे कोरोनाला दुर्लक्षित करीत आहे हे मोठे पाप कुठे फेडणार? हा सवालच. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या घरांमध्ये
देह मृत्याचे
भातुके

कळो आले कौतुके । काय मानलिये सार । हिची वाटते आश्‍चर्य । नाना भोगांची संचिते । करुणी ठेविलेय आयते । तुका म्हणे कोंडी उगवून न सक्ती बा पुढे ॥ शरीर हे नश्‍वर आहे. एक ना एक दिवस हा देह अनंतात विलीन होणार आहे हे प्रत्येकाला माहित असते. त्यात सांगण्यासारखं नवं काहीच नसतं परंतु ईश्‍वराने दिलेल्या या देहाचे आणि देहातल्या प्रत्येक इंद्रियाचे काम हे सदाचाराचे असले पाहिजे. डोळ्याने चांगले पाहितले पाहिजे, कानाने चांगले ऐकले पाहिजे, तोंडाने चांगले बोलले पाहिजे, हातांनी गरजुंना मदत केली पाहिजे, पायांनी सदाचाराचा मार्ग धरला पाहिजे, निर्भयपणे यशाचं शिखर गाठलं पाहिजे आणि डोक्यातल्या मेंदुने ‘सर्वास पोटास लावणे आहे’  हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय आखलं पाहिजे. परंतु सध्या कोरोना महामारीत या सर्व गोष्टींची गरज असताना केवळ स्वार्थासाठी, सत्तेसाठी सत्याचा गळा दाबून जे बेजबाबदारपणाचं वर्तन राजकारण्यांकडून केलं जातय ते माणसाला माणूस म्हणून हिणवणारा म्हणावं लागेल. देशाचे गृहमंत्री अमित शहांना कोरोना झाला, महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक राजकारण्यांना कोरोनाने विळख्यात घेतलं, तरीही कोरोनावर राजकारण खेळण्याचा उद्योग सुटत नाही, हे दुर्दैव नव्हे काय, आज मितीला कोरोनाशी दोन हात करण्याची गरज आहे, सोशल डिस्टन्स पाळणे, तोंडाला मास्क लावणे, गर्दी न करणे हे साधे सोपे कोरोनाविरुद्धचे शस्त्रे प्रत्येकाकडे असताना गर्दीचे ठिकाण उघडण्याचा हट्ट धरणे म्हणजे यमाचे दार उघडून ‘येऊ का घरात’ म्हणण्यासारखे आहे. 

Most Popular

error: Content is protected !!